Top Post Ad

महानगरपालिका हद्दीत तात्पुरत्या स्वरूपातील जाहिराती प्रदर्शित करण्यासाठी जागा उपलब्ध

बृहन्मुंबई महानगरपालिका प्रशासनाने महानगरपालिका हद्दीत तात्पुरत्या स्वरूपातील जाहिराती प्रदर्शित करण्यासाठी जागा उपलब्ध करून दिल्या आहेत. या ठिकाणी १,०१७ जाहिरात फलक, २,३११ बस आश्रयस्थानके आणि ३२,५३१ किऑक्स प्रदर्शित करण्यास परवानगी देण्यात आली आहे. राजकीय तसेच बिगरराजकीय जाहिरात फलक महानगरपालिकेने परवागी दिलेल्‍या अधिकृत जागेवरच प्रदर्शित करावेत, असे आवाहन बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या वतीने करण्यात येत आहे. सार्वजनिक ठिकाणी विनापरवाना बॅनर्स, फलक,पोस्‍टर्स लावणा-यांविरोधात कठोर कारवाई करण्‍यात येत असल्‍याचे देखील महानगरपालिकेकडून स्‍पष्‍ट करण्‍यात येत आहे


   माननीय उच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार, महानगरपालिका हद्दीतील सार्वजनिक ठिकाणी विनापरवाना कोणतेही फलक, बॅनर, पोस्टर प्रदर्शित करण्यास मनाई आहे. बृहन्मुंबई महानगरपालिका कार्यक्षेत्रातील सार्वजनिक रस्ते तसेच पदपथांवर महानगरपालिकेच्या पूर्व परवानगीशिवाय कोणत्याही विषयाचे जाहिरात फलक (होर्डिंग), बॅनर किंवा पोस्टर लावण्यास प्रतिबंध आहे. अशाप्रकारच्या विना परवानगी जाहिरात फलक, बॅनर, पोस्टर लावणाऱया व्यक्ती किंवा संस्थेविरोधात ‘महाराष्ट्र मालमत्ता विद्रुपीकरण प्रतिबंधक कायदा-१९९५’ मधील तरतुदी तसेच ‘मुंबई महानगरपालिका अधिनियम १८८८’मधील कलम ३२८/३२८-अ, ४७१ अन्वये कायदेशीर कारवाई करण्याची तरतूद आहे. या तरतुदींचा भंग करताना आढळल्यास संबंधितांवर गुन्हा दाखल करणे तसेच न्यायालयीन दावा दाखल करणे या कायदेशीर कारवाईंचा समावेश आहे. 

महानगरपालिका प्रशासन या निर्देशांची काटेकोर अंमलबजावणी करत आहे. तथापि, सातत्याने आवाहन व जनजागृती करूनही या निर्देशांचे उल्लंघन होत असल्याचे निदर्शनास आले आहे. या विनापरवाना जाहिरात फलकांवर महानगरपालिकेच्‍या वतीने सातत्‍याने निष्‍कासन कारवाई करण्‍यात येत आहे. तथापि, संबंधितांकडून महानगरपालिकेच्‍या नियमांचे उल्‍लंघन केले जात असल्‍याने महानगरपालिकेला अकारण रोषास सामोरे जावे लागत आहे. 

उप आयुक्‍त (विशेष) श्रीमती चंदा जाधव म्‍हणाल्‍या की, माननीय न्‍यायालयाच्‍या आदेशाच्‍या अनुषंगाने राजकीय पक्ष, सामाजिक संस्‍था, व्‍यावसायिक पक्षकार आदींचे पदाधिकारी, प्रतिनिधी यांना महानगरपालिका प्रशासनाने लेखी पत्र पाठविले आहे. सार्वजनिक ठिकाणी, रस्‍ते, पदपथांवर विनापरवाना जाहिरात फलक, बॅनर्स, पोस्‍टर्स प्रदर्शित करू नये, अशी विनंती या पत्राद्वारे करण्‍यात आली आहे. जाहिरातदारांनीदेखील विहित प्रक्रियेचे पालन करून परवानगी दिलेल्‍या जागेवरच जाहिराती प्रदर्शित कराव्यात, असे आवाहन करण्यात येत आहे. या संदर्भात २४ विभाग कार्यालयातील अधिका-यांची बैठक घेऊन विनापरवाना फलकांवर कठोर कारवाईचे तसेच माननीय उच्‍च न्‍यायालयाच्‍या आदेशांचे अनुपालन करण्‍याचे निर्देश देण्‍यात आल्‍याचे श्रीमती चंदा जाधव यांनी नमूद केले आहे.  

*टोल फ्री क्रमांकावर तक्रार करण्‍याची सुविधा* 

विनापरवाना आणि अनधिकृत जाहिरात फलक (होर्डिंग) तसेच बॅनरविरोधात तक्रार नोंदविण्यासाठी नागरिकांनी १९१६ या टोल-फ्री क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहन बृहन्मुंबई महानगरपालिका प्रशासनाच्या वतीने करण्यात येत आहे. विनापरवाना प्रदर्शित केलेल्या जाहिरात फलकांविरोधात तक्रार नोंदविण्याची सुविधा महानगरपालिकेच्या अधिकृत संकेतस्थळावर www.mcgm.gov.in आणि @mybmc या समाजमाध्‍यमांवरही उपलब्ध करून देण्यात आली आहे

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

 READ / SHARE  / FORWARD 
JANATA  NEWS  xPRESS

निरंतर सेवेच्या आर्थिक मदतीकरिता 
for Donation
G pay 8108603260 

संपादक: सुबोध शाक्यरत्न  
M : 8108658970

Email- pr.janata@gmail.com