मुंबईचा पुरातन सांस्कृतिक वारसा, कला इतिहास उलगडून दाखवणारे डॉ. भाऊ दाजी लाड संग्रहालय हे मुंबईतील सर्वात जुनं संग्रहालय आहे. लंडनमध्ये सन १८५१ मध्ये भरलेल्या जागतिक प्रदर्शनाच्या निमित्ताने मुंबईतील संग्रहालयाची संकल्पना उदयास आली होती. त्यानंतर सन १८५५ मध्ये व्हिक्टोरिया आणि अल्बर्ट संग्रहालय या नावाने या संग्रहालयाची स्थापना झाली. सन १८५७ मध्ये टाऊन बराक येथे संग्रहालय जनतेसाठी प्रत्यक्षात खुले झाले. संग्रहालयाच्या सध्या अस्तित्वात असलेल्या इमारतीची पायाभरणी दिनांक १९ नोव्हेंबर १८६२ रोजी तत्कालीन गव्हर्नर सर हेन्री बार्टल फ्रेअर यांच्या हस्ते झाली होती. बांधकाम पूर्ण होवून १८७२ पासून या इमारतीत संग्रहालयाचा प्रारंभ झाला. संग्रहालय स्थापनेत मोलाचा वाटा उचलणारे डॉ. रामकृष्ण विठ्ठल ऊर्फ भाऊ दाजी लाड यांच्या सन्मानार्थ दिनांक १ नोव्हेंबर १९७५ रोजी 'डॉ. भाऊ दाजी लाड संग्रहालय' असे नामकरण करण्यात आले.
या संग्रहालयात विज्ञान, कला व अध्यात्म यांचा संगम आढळून येतो. मातीची लघूशिल्पं, नकाशे, पाषाणावरुन केलेली मुद्रांकनं, छायाचित्रं, दुर्मिळ पुस्तके इत्यादी त्यातील विशेष आकर्षणं आहेत. सहा विविध भागांमध्ये संग्रहालयाची रचना करण्यात आलेली आहे. मुंबईचा इतिहास, औद्योगिक, कला, १९ व्या शतकातील चित्रं, संस्थापकांची दर्शनिका, कमलनयन बजाज मुंबई दर्शनिका आणि कमलनयन विशेष प्रदर्शन दर्शनिका यांचा या रचनेमध्ये समावेश आहे. या संग्रहालयाचे पुनरुज्जीवन व व्यवस्थापनाकरीता बृहन्मुंबई महानगरपालिका, जमनालाल बजाज प्रतिष्ठान आणि इंडियन नॅशनल ट्रस्ट फॉर आर्ट अँड कल्चरल हेरिटेज (इन्टॅक) यांच्यात फेब्रुवारी २००३ मध्ये सामंजस्य करार करण्यात आला होता. त्यानंतर सन २००३ ते सन २००८ या कालावधीत या संग्रहालयाचा जीर्णोद्धार करण्यात आला. पाच वर्षात पुनरुज्जीवन पूर्णत्वास जावून दिनांक ४ जानेवारी २००८ रोजी संग्रहालय जनतेसाठी पुन्हा खुले करण्यात आले होते. या जीर्णोद्धार प्रकल्पाबद्दल संग्रहालयाला सन २००५ मध्ये 'युनेस्को' चा सांस्कृतिक संवर्धन क्षेत्रातील उत्कृष्टतेचा पुरस्कार देखील प्राप्त झाला होता.सांस्कृतिक शिक्षण क्षेत्रातील उत्कृष्टता साध्य करण्यासाठी डॉ. भाऊ दाजी लाड संग्रहालय ही एक समर्पित संस्था म्हणून सातत्याने कार्यरत आहे. विविध प्रदर्शनांच्या माध्यमातून सामाजिक संवाद साधणे, मुलांमध्ये कलेविषयी गोडी निर्माण करणे, मुंबईच्या कलात्मक, सांस्कृतिक, आर्थिक इतिहास व विकासाबद्दल जनकुतूहल निर्माण करणे, विविध संस्कृतींमधील परस्पर सामंजस्य आणि सांस्कृतिक जागरूकता वाढवणे हे संग्रहालयाचे मूळ उद्दिष्ट आहे. मुंबईचा इतिहास, कला, सांस्कृतिक विकास इत्यादी विषयांवर संग्रहालयाच्या माध्यमातून विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात येते. ज्यामध्ये नाट्य, कार्यशाळा, चित्रपट, संगीत आणि चर्चासत्रांचा समावेश असतो. भारतीय हस्तकलेला प्रोत्साहन देणाऱ्या संस्थांना डॉ. भाऊ दाजी लाड संग्रहालयात विनामूल्य प्रवेश दिला जातो. संग्रहालयाच्या मुख्य इमारतीतील कमलनयन बजाज विशेष कला दालनात प्रदर्शने भरवण्यात येतात.
डॉ. भाऊ दाजी लाड संग्रहालयाने आजवर व्हिक्टोरिया अँड अल्बर्ट म्युझियम (लंडन), गुगेनहाइम म्युझियम (न्यूयॉर्क) इत्यादी आंतरराष्ट्रीय संग्रहालये आणि संस्थांसह संयुक्त भागीदारीत मुंबईत प्रदर्शने भरवली आहेत. तसेच, इटली, बेल्जियम, कॅनडा इत्यादी वाणिज्य दुतावासांसोबत तसेच स्विस आर्ट्स कौन्सिल प्रो हेल्व्हेटिया, पोलिश इन्स्टिट्यूट ऑफ न्यू दिल्ली आणि अलायन्स फ्रँसेझ यासारख्या सांस्कृतिक केंद्रे आणि संस्थांच्या सहकार्याने विविध उपक्रम राबवले आहेत. एप्रिल २०१७ मध्ये मराठी भाषेतील विशेष कार्यक्रम मालिका म्हणून 'म्युझियम कट्टा' या उपक्रमाची सुरुवात करण्यात आली. लोककला, सिनेमा, साहित्य, नाट्य, संगीत आणि दृश्यकला यामधील ऐतिहासिक आणि समकालीन सामाजिक व सांस्कृतिक परंपरांचे प्रदर्शन यातून घडवले जाते. महाराष्ट्रातील कलावंत तसेच प्रेक्षकांकडून या उपक्रमाला भरघोस प्रतिसाद मिळाला आहे. या संग्रहालयाच्या माध्यमातून आंतरवासिता (इंटर्नशिप) कार्यक्रम राबविला जात आहे. संग्रहालयामध्ये येणाऱया विविध वयोगटाच्या नागरिकांना मार्गदर्शन करणे, संग्रहालयाच्या उपक्रमांना जनतेपर्यंत पोहोचविणे, कार्यशाळा आयोजन यासाठी पदवी वर्गातील विद्यार्थी, कला शिक्षक यांना या आंतरवासिता कार्यक्रमातून संधी दिली जाते. तसेच, आंतरराष्ट्रीय स्तरावरील शैक्षणिक संस्थांसमवेत मिळून देखील शैक्षणिक साहित्य आदी तयार करण्यासाठी विद्यार्थ्यांना संधी दिली जाते.
बृहन्मुंबई महानगरपालिका संचालित डॉ. भाऊ दाजी लाड संग्रहालयाच्या वास्तुचे नूतनीकरण अंतर्गत दुरुस्ती, पुनरुज्जीवन व जतनविषयक कामांसाठी मार्च २०२३ मध्ये कार्यवाही सुरु करण्यात आली होती. विहित वेळापत्रकानुसार १८ महिन्यांमध्ये सर्व कामे पूर्ण करण्यात आली आहेत. यामध्ये इमारतीच्या छतावर जलावरोध कामे, छताची अंतर्गत दुरुस्ती तसेच त्यावरील नक्षीकाम पूर्ववत करणे, आतील व बाह्य गिलावा (प्लास्टर) दुरुस्ती, खिडक्यांची दुरुस्ती, जोतेक्षेत्राचे संरक्षण (प्लींथ प्रोटेक्शन), रंगकाम, कठडे, उतरंड (रॅम्प) इत्यादींचा समावेश होता. या सर्व कामांसाठी मिळून सुमारे २ कोटी ८० लाख रुपये खर्च करण्यात आले आहेत. नूतनीकरणामुळे या वास्तुला दिमाखदार, सुंदर रुप बहाल झाले आहे. बृहन्मुंबई महानगरपालिका आयुक्त तथा प्रशासक श्री. भूषण गगराणी यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त (शहर) डॉ. अश्विनी जोशी, अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त (पूर्व उपनगरे) डॉ. अमित सैनी यांच्या निर्देशानुसार, उपायुक्त (उद्याने) चंदा जाधव यांच्या देखरेखीखाली नूतणीकरणाचे काम वेगाने पूर्ण झाले आहे. नूतनीकरण प्रकल्पाचे सल्लागार म्हणून वास्तुविशारद विकास दिलावरी यांनी कामकाज पाहिले.
संग्रहालये ही संस्कृती आणि इतिहासाची प्रतीके आहेत. समाजाच्या सांस्कृतिक आणि ऐतिहासिक जडणघडणीची ती साक्षीदार असतात. भावी पिढीला आपला संपन्न इतिहास, वारसा समजण्यासाठी संग्रहालये मोलाची भूमिका बजावतात. बृहन्मुंबई महानगरपालिकेने नूतनीकरण केलेले डॉ. भाऊ दाजी लाड संग्रहालय प्रेरणा व माहितीचा स्रोत ठरण्याबरोबरच पर्यटनाला प्रोत्साहन देईल. मुंबईत येणा-या पर्यटकांसाठी ते आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरेल, संग्रहालयाच्या माध्यमातून त्या देशाची, महानगराची संस्कृती, लोकजीवन आणि इतिहास कळतो. आपला ऐतिहासिक वारसा भावी पिढीला पाहता यावा हा संग्रहालय उभारणीचा उद्देश असतो. नागरी विकास आणि त्याची स्थित्यंतरे भावी पिढीला समजणे आवश्यक आहे. आपला देश संस्कृतीची खाण असून जगातील सर्वात जुनी म्हणजेच १० हजार वर्षांपूर्वीची विकसित अवस्थेतील सिंधू संस्कृती स्थित्यंतरांना सामोरे जात आजही नांदते आहे. हडप्पा, मोहेंजोदाडो, राखीगढी, भिरडाणा इत्यादी प्राचीन स्थळं ही आपल्या विकसित संस्कृतीची उदाहरणे आहेत. आक्रमणांमुळे व अनास्थेमुळे आपण ऐतिहासिक वारसांचे जतन करू शकलो नाही, ही दुर्दैवाची बाब आहे. तथापि, अलिकडच्या काळात या संदर्भात जागृती झाली आहे. पुरातन, ऐतिहासिक, कलात्मक संस्कृतीचे जतन, संवर्धन करणे आपले कर्तव्य आहे, एखाद्या महानगराची श्रीमंती ही तेथील इमारती, रस्ते, श्रीमंत लोकांवरून नव्हे तर तेथील संग्रहालयांच्या माध्यमातून ठरवली जाते. जगातील सर्व महानगरांमध्ये उत्तमोत्तम अशी संग्रहालये आहेत. मुंबईतील असेच एक दर्जेदार, उत्तम संग्रहालय वास्तू नूतनीकरणानंतर नागरिकांसाठी आज खुले होत असल्याचा मनस्वी आनंद आहे. डॉ. भाऊ दाजी लाड हे व्यवसायाने डॉक्टर होते. त्यांनी या संग्रहालयासाठी अनेक दुर्मीळ वस्तू संकलित केल्या. निधी संकलन कामात पुढाकार घेतला. त्यांच्या या कार्याचा सन्मान म्हणून या संग्रहालयास ५० वर्षापूर्वी डॉ. भाऊ दाजी लाड यांचे नाव देण्यात आले. महाराष्ट्रातले सर्वात जुने, तर देशातील तिसरे सर्वात जुने संग्रहालय असा लौकिक असलेल्या डॉ. भाऊ दाजी लाड संग्रहालयाची मुंबईच्या इतिहासात अग्रणी भूमिका राहिली आहे. डॉ. भाऊ दाजी लाड संग्रहालय नामकरणाच्या ५० वर्षानंतर नव्या रुपात, दिमाखात जनतेसाठी खुले करताना मोठा आनंद होत आहे. पर्यटकांसाठी हे संग्रहालय कायम आकर्षण राहिले आहे आणि यापुढेही कायम राहील. यातील दुर्मीळ वस्तू, छायाचित्रे, शिल्पाकृती या माध्यमातून नागरिकांना एक वेगळा अनुभव मिळेल. बृहन्मुंबई महानगरपालिकेने संग्रहालय नूतनीकरण करून उत्कृष्ट कामगिरी केली आहे. नूतनीकरण कामाचा दर्जा हा सर्वोत्कृष्ट आहे. भविष्यात हा दर्जा 'क्युरेटर' कायम राखतील. मोठ्या संख्येने नागरिक संग्रहालयात येतील, तेव्हादेखील दर्जा टिकून राहील, याची दक्षता घ्यावी. संग्रहालय नेहमी अधिक समृद्ध दिसेल असा ठाम विश्वास राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नूतनीकरण केलेल्या डॉ. भाऊ दाजी लाड संग्रहालय वास्तूचे लोकार्पण प्रसंगी केला. (दिनांक ८ जानेवारी २०२५)
0 टिप्पण्या