ठाणेकरांसाठी एक खास सांस्कृतिक पर्वणी ठरू पाहत असलेल्या विहंग 'संस्कृती आर्ट फेस्टिवल’ चे आयोजन १० ते १३ जानेवारी २०२५ दरम्यान उपवन येथे करण्यात आले आहे. या फेस्टिवलचे उद्घाटन महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांच्या हस्ते होणार आहे. तसेच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार आदींसह अनेक मान्यवर या फेस्टिवलमध्ये सहभागी होणार आहेत. या फेस्टिवलची सुरुवात प्रसिद्ध शास्त्रीय गायिका शुभा मुद्गल यांच्या स्वरांनी होणार आहे. चार दिवस चालणाऱ्या या महोत्सवात कला, संस्कृती आणि सृजनशीलतेचा आगळा अनुभव घेता येईल. यंदा फेस्टिवलमध्ये कलाप्रेमींसाठी प्रसिद्ध चित्रकार राजा रवि वर्मा यांच्या लिथोग्राफी चित्रांचे प्रदर्शन भरवण्यात आले आहे. यासंदर्भात परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी आज प्रसिद्धी माध्यमांना सविस्तर माहिती दिली.
फेस्टिवल मध्ये विविध कार्यशाळा, नृत्य, स्पर्धा आणि सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. यामुळे कला व संस्कृती क्षेत्रातील नवोदित कलावंतांना प्रोत्साहन मिळणार आहे. कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी स्थानिक नागरिक आणि कलाप्रेमींचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. विदुषी आरती अंकलीकर-टिकेकर, पंडित रितेश-रजनीश मिश्रा, संजू राठोड, अभिजीत भट्टाचार्य, पंडित ब्रिज नारायण, केतकी माटेगावकर, पद्मश्री शाहीद परवेज, मिका सिंग, रणजीत रजवाडा आदी मान्यवर गायक व वादक यंदाच्या फेस्टिवलमध्ये आपली कला सादर करणार आहेत. तसेच कुचीपुडी, भरतनाट्यम्, ओडिसी, मणिपुरी आदी शास्त्रीय नृत्यांबरोबर विविध राज्यातील लोकनृत्यांचा आनंदही रसिकांना येथे घेता येणार आहे. तरी ठाणेकर नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून संस्कृती आर्ट फेस्टिवलचा आनंद घ्यावा, असे आवाहन आयोजकांनी केले आहे.
0 टिप्पण्या