Top Post Ad

गणराज्य दिनी कृतीशील होण्यासाठी वचनबद्ध होऊया!

२६ जानेवारी १९५० रोजी भारतीय संविधान देशात लागू झाले. त्या दिवसाला इंग्रजी मध्ये 'रिपब्लिक डे' (Republic Day) म्हणतात. रिपब्लिक म्हणजे गणराज्य. परंतु अनेक वर्षे या दिवसाला मराठीत प्रजासत्ताक दिन असे म्हटले जाते. हे अत्यंत चुकीचे आहे. प्रजासत्ताक म्हणजे प्रजेची सत्ता. प्रजा

या शब्दाला इंग्रजी मध्ये सब्जेक्ट (subject) असे म्हटले जाते. प्रजा म्हणजे राजाची हुकुमत ज्यांच्यावर चालते तो जनसमूह. स्वातंत्र्य मिळाल्यानंतरही भारतात लॉर्ड माऊंट बॅटन हा इंग्लंडच्या राणीचा प्रतिनिधी म्हणून इथला कारभार पहात होता. तोपर्यंत भारतीय जनता ब्रिटिश राजसत्तेची प्रजा होती. परंतु भारतीय संविधानाने इथल्या देशी आणि विदेशी सर्व राजेशाह्यांना नाकारले, बरखास्त केले. त्यामुळे २६ जानेवारी १९५० पासून भारतीय लोक कुणाची प्रजा राहिलेली नाही. आम्ही रिपब्लिक भारतात राहतो. म्हणजे ख-या अर्थाने आम्ही रिपब्लिकन आहोत. स्वतंत्र व सार्वभौम भारताचे सार्वभौम गण आहोत. 

            गणराज्य म्हणजे काय? गणराज्य म्हणजे देशी आणि विदेशी राजेशाहीचे मांडलिक नसणे, गुलाम नसणे होय. गणराज्य म्हणजे सर्व गण म्हणजे सर्व लोक एकत्र येऊन सहमतीने देश चालवितात. जिथे कुठल्याही समस्येवर सहमतीने उपाय शोधून तो राबविला जातो ते गणराज्य. गणराज्य म्हणजे जिथे सर्वांच्या कल्याणाचा विचार केला जातो अशी व्यवस्था होय. एवढेच नव्हे तर लोकांच्या सामाजिक, आर्थिक व राजकीय शोषणाची सर्व साधने जिथे नाकारली जातात ते गणराज्य होय. धर्म व संस्कृती यांच्या नावाने लोकांचे चालणारे शोषण जिथे संपते ते गणराज्य होय. 

          गणराज्य दिनाला प्रजासत्ताक दिन म्हणणे म्हणजे राजेशाही मानणे होय. देशी प्रस्थापित राज्यकर्त्यांनी स्वातंत्र्यानंतर ब्रिटिशांच्या हातून सत्ता आपल्या हाती घेतली आणि भारतीय जनतेच्या शोषणाची विविध साधने त्यांनी निर्माण केली. त्यामुळे भारतीय जनतेला अजूनही आपल्या स्वातंत्र्याचा खरा अर्थ उमगलेला नाही. सामंतशाहीमधील गुलामगिरीच्या मानसिकतेतून अजूनही भारतीय जनता बाहेर‌ पडलेली नाही.  

         कुंभमेळ्याच्या निमित्ताने पुन्हा एकदा गलिच्छ संस्कृतीचे दर्शन झाले. अघोरी मूत पितात, विष्ठा खातात, रक्त पितात, नग्न रहातात, घाणेरडे रहातात, नशेत बुडालेले असतात. त्यांची  पूजा केली जाते. अशा विकृतीला धर्म म्हटले जाते. याला अध्यात्म म्हटले जाते. हा तर मानसिक रोग आहे. आणि यावर सरकार करोडो रुपये खर्च करते. कष्ट करून जगण्याची कसरत करणाऱ्यांच्या श्रम, घाम व धन यातून राष्ट्राची संपत्ती निर्माण होते.  कुंभमेळयासारख्या अघोरी प्रकारांवर खर्च करणे म्हणजे या राष्ट्रीय संपत्तीची बरबादी करणे होय ! 

           या अशा संस्कृतीने देशातील लोकांना पुराणकाळात बुडवून ठेवले आहे. आधुनिक विज्ञानाच्या सर्व सुख सोयींचा मनसोक्त आनंद लुटणा-या शिक्षित, उच्च शिक्षित, बंगले, कार, कार्पोरेट जीवन जगणारे सुद्धा जेव्हा या विकृतीला शरण जातात तेव्हा या देशातील लोकशाहीच्या भवितव्याबाबत काळजी वाटायला लागते. 

           लोकशाही म्हणजे केवळ ढाचा नव्हे. लोकशाही ही व्यवस्था आहे. रक्ताचा एकही थेंब न सांडता लोकांच्या सामाजिक व आर्थिक जीवनात क्रांतीकारी बदल घडवून आणण्यासाठी उपलब्ध असलेली ती एक उत्कृष्ट अशी व्यवस्था आहे. तर गणराज्य ही मानसिकता आहे. गण म्हणजे असा जनसमूह जो बंधुत्वाच्या नात्याने घट्टपणे जोडला गेला आहे, जिथे प्रत्येक निर्णय सर्वांच्या सहमतीने घेतला जातो, जिथे प्रत्येक व्यक्ती समूहाच्या कल्याणसाठी बांधील असते, जीथे न्याय, स्वातंत्र्य, समता व बंधुत्व या जीवन मुल्यांवर प्रत्येक व्यक्तीची असिम निष्ठा असते व तेच जीवनाचे अधिष्ठान असते; अशा व्यक्तींनी घडलेला समाज म्हणजे गणराज्य होय! 

              या पार्श्वभूमीवर देशातील वातावरणाचा विचार केला तर काय दिसते? २६ जानेवारी १९५० रोजी या देशात भारताचे संविधान लागू झाले. संविधानाने प्रत्येक व्यक्तीला मूलभूत अधिकार दिले आणि हजारो वर्षे गुलामीचे जीवन जगणा-या या देशातील प्रत्येक व्यक्तीला सार्वभौमत्वाचा दर्जा दिला. संविधानाने प्रत्येक व्यक्तीला प्रतिष्ठा प्राप्त करून दिली, सन्मानाने जगण्याचा हक्क दिला. 

            परंतु या सांविधानिक लोकशाहीच्या गणराज्य क्रांतीला  मनुस्मृतीच्या समर्थकांकडून नेहमीच विरोध होत आला आहे. सडक्या विचारधारेच्या आर एस एस व त्याच्या सामाजिक, सांस्कृतिक, आर्थिक व राजकीय पिलावळीने संविधानाच्या विरोधात सातत्याने प्रचार सुरू ठेवला आहे. संविधान बदलण्यासाठीच आपण निवडणूक लढवून संसदेत जाणार असल्याचे राष्ट्रद्रोही विधान याच पिलावळीने निवडणूकीच्या प्रचार मोहीमेत केले आहे. लोकशाही संपुष्टात आणून मनुस्मृती प्रणित (अ)धर्म राज्य आणण्यासाठी तरुणांना भडकविले जात आहे.  तरुणांच्या हाताला काम देण्याऐवजी कावड यात्रेसारख्या बीनउपजाऊ कार्यक्रमात तरुणांना बांधले जात आहे. बेरोजगारी वाढत चालली आहे. प्रत्येक व्यक्तीला जगण्यासाठी सम्यक आजिविका उपलब्ध करून देणे हे सरकारचे काम आहे. परंतु त्या बाबतीत केवळ पोकळ घोषणा देऊन तरुण बेरोजगारांच्या तोंडाला पाने पुसली जात आहेत. गुन्हेगारी वाढत आहे. ही बेरोजगारी, ही गुन्हेगारी या देशात अराजक माजवत आहे. या अराजकाला प्रत्यक्ष व अप्रत्यक्षरीत्या सरकार कारणीभूत आहे.  

            भारतीय जनता असंख्य प्रश्नांनी त्रासलेली आहे. शिक्षणाचे खाजगीकरण, गरीबांच्या मुलांना शिक्षण न परवडणे,  अभ्यासक्रमाचे ब्राह्मणीकरण, धार्मिक तेढ, धर्मांधता, जातियता, जातीय अत्याचार, लैंगिक अत्याचार, महागाई, प्रदुषण, पाण्याचे दुर्भिक्ष आसे एक ना हजार समस्या आ वासून उभ्या आहेत. जगावं की मरावं? अशा दयनीय अवस्थेत लोक दिवस ढकलत आहेत. जागतिक जिवनमान निर्देशांकात १९३ देशांमध्ये भारत १३२ व्या स्थानावर आहे. दिवस रात्र मोदि मोदी करणा-या विकाऊ पत्रकारांना  जनतेच्या या सर्व प्रश्नांशी काही देणंघेणं राहिलेले नाही. पत्रकारितेच्या नावावर गडगंज संपत्ती मिळवायची हे ह्यांचे धंदे.  

      अशा समस्याग्रस्त परिस्थितीमध्ये आजचा गणराज्य दिन आपला साजरा करीत आहोत. साजरा करणे निश्चितच आवश्यक आहे. परंतु आता या देशातील लोकांनाच सरकारवर अंकुश ठेवावा लागेल. लोकशाहीमध्ये चर्चा फार महत्वाची गोष्ट आहे. भारतीय संविधानाने आपल्याला अभिव्यक्तीचे स्वातंत्र्य दिले आहे. अनेक माध्यमांतून आपण व्यक्त होत राहूया. भारताचे गणराज्य सुदृढ, धनवान,  सुसंस्कृत, प्रज्ञावान, शीलवान करण्यासाठी आपण या गणराज्य दिनी कृतीशील होण्यासाठी वचनबद्ध होऊया!

 भारताचे गणराज्य                               

 प्रेमरत्न चौकेकर 

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

 READ / SHARE  / FORWARD 
JANATA  NEWS  xPRESS

निरंतर सेवेच्या आर्थिक मदतीकरिता 
for Donation
G pay 8108603260 

संपादक: सुबोध शाक्यरत्न  
M : 8108658970

Email- pr.janata@gmail.com