*आज ऐतिहासिक लॉन्ग मार्च सातवा दिवस. एक आठवडा लोटला आहे. 100 किलोमीटरचा टप्पा पार करण्यात आलेला आहे. त्यानिमित्त महत्वपूर्ण मुद्दे मी आपल्यासमोर ठेवून इच्छितो. गेली ३२ दिवस धरणे आंदोलन आणि गेली ७ दिवस लाँग मार्च मध्ये सामील भीमसैनिकांचा एकच ध्यास आहे की जातीयवादाच्या द्वेषाने व विषाने ग्रस्त पोलीस दलातील एका मनुवादी टोळीने सरकारच्या च छत्रछायेखाली भारतीय संविधान व कायद्याला फाट्यावर मारून महिला आबालवृद्ध ओल्या बाळंतनी युवक विद्यार्थी यांना आमानूषपणे क्रूरपणे मारहाण केली, बेकायदा कोंबिग ऑपरेशन च्या नावाखाली दहशतवाद्यांना ही लाजवेल अशी दहशत जनसामान्य नागरिकांमध्ये पोलिसांनी निर्माण केली केली, त्या सर्व ॲट्रॉसिटी विरुद्ध आमचा आक्रोश लॉन्ग मार्च द्वारे महाराष्ट्राची राजधानी मुंबई येथे एकमुखाने आम्ही मांडणार आहोत. जाब विचारणार आहोत.
सोमनाथ भैय्याचा कस्टडीयल मर्डर, व त्यामुळे निर्माण झालेल्या निंदाजनक निराशाजनक वातावरणाचा विपरीत परिणाम होऊन बहुजनांचे लोकनेते वाकोडे साहेब यांचे निधन झालं. या दोन्ही मृत्यूला सरकार जबाबदार आहे हे उघड आहे. म्हणून धरणे आंदोलनच नव्हे तर लॉंग मार्च चा देखील प्राधान्याने पहिला मुद्दा दोषी पोलिसांच्या विरुद्ध कठोरतील कठोर कारवाई करणे, आणि बेजबाबदार महाराष्ट्र सरकारला जवाब दो हा घेराव करणे हाच आहे.
ज्या महिला, पुरुष, युवकांना खोटी एफ आय आर टाकून जेलमध्ये दाबण्यात आलं, रात्र रात्र त्यांना झोपू दिले नाही, त्यांच्या अन्न पाण्यामध्ये माती मिसळली मूत्र मिसळले, त्यांना मारलं, त्या भीमसैनिकाना न्याय मिळाला पाहिजे हा देखील महत्वपूर्ण असा दुसरा मुद्दा आमचा आहे.
भारतीय संविधानानुसार नागरिक सार्वभौम आहे. शहीद सोमनाथ सूर्यवंशी शहीद लोकनेते वाकोडे बाबा हे या स्वतंत्र व सार्वभौम भारताचे आणि संविधान शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानानुसार निर्माण झालेल्या रूल ऑफ लॉ अंतर्गत नागरिक होते. या नागरिकांचा सर्वांगीण विकास करण्याची जबाबदारी ज्या सरकारवर आहे. या सरकारने ती जबाबदारी पूर्ण केली नाहीच, उलट रक्षकच भक्षक म्हणून त्यांचा जीव घेतला. तसं दूषित वातावरण निर्माण केलं. जातीग्रस्त वातावर निर्माण केलं. राष्ट्रीय कायद्यानुसार आणि नैसर्गिक न्यायानुसार देखील सरकारला compensation देणे भागच आहे. तो काय त्यांचा आमच्यावर उपकार होणार नाही. तो आमचा हक्क आहे. कोणी त्या compensation ला ' सरकारी उपकार ', सरकारी उपकाराची हौस म्हणत असेल तर हे जन्मजात मूर्खपणाचे लक्षण आहे हे उघड आहे. असे म्हणणारा बदमाश आहे. Compensation - तो आमचा हक्क आहे. तो आमचा अधिकार आहे हे ज्याचां संविधानावरती आणि कायद्यावर विश्वास आहे तोच कबूल करू शकतो. ज्याला संविधानावरती विश्वास नाही देशामध्ये anarchy निर्माण व्हावी अशी ज्यांची सूप्त इच्छा आहे ते मात्र आमच्यावरती सरकारी भरपाई चे भोई म्हणून आरोप करत आहेत, हे निश्चितच आंबेडकरवादी नाहीत ही वस्तुस्थिती आहे.
न्यायासाठी जे जे काय करता येईल ते ते आम्ही करणार आहोत. सर्व संविधानाला मानणाऱ्या नागरिकांना आमचा आवाहन आहे की आपण या लॉंग मार्चमध्ये तन-मन धनाने सहभागी व्हावं. सहकार्य करता येत असेल तर करावे अन्यथा बाहेर कट्ट्यावर बसून, घरात बसून ' क्रांती आता मीच घडवणार ' असा फुकाचा आव आणून सल्ले देण्याचे धंदे बंद करावे. उंटावर बसून शेळ्या हाकण्याचे काम बंद करावे.
महात्मा फुले शब्दात सांगायचे झाल्यास घाल मोड्या दादा पण, ताई पण- बंद करावं अर्थातच मायेच्या ममतेने देण्यात येणारे सल्ले यावर आम्ही विचार करणार हे वेगळे सांगण्याची आवश्यकता नाही, पण कोण आईच्या काळजाप्रमाणे हितासाठीचे सल्ले आणि कुठल्याशा उटोपियातील फाजील क्रांतीच्या फॅन्टॅसीने अंध होऊन दिलेले सल्ले यातला फरक आम्हाला कळतो.
म्हणून सर्व संविधान वादी भीमसैनिकांना कळकळीची नम्र विनंती आपण तन-मनधनाने ह्या लॉंग मार्चमध्ये सहभागी व्हा. लॉन्ग मार्च मार्गावर असणाऱ्या समस्त गावकरी मंडळींना आमचे नम्र विनंती आहे की आपण अर्थ दान अन्नदान देत आहातच सोबतच आपल्या प्रत्येक गावातील किमान पाच माणसे तरी या लॉंग मार्चमध्ये पाठवण्याचे कार्य आपण करावं, या लॉंग मार्चमध्ये हिरीरीने सामील व्हावे अशी आशा एक भीमसैनिक म्हणून मी या पोस्टद्वारे आपल्यासमोर ठेवत आहे.
जय भीम जय भारत जय संविधान.
आशिष विजयराव वाकोडे,
लाँग मार्च
0 टिप्पण्या