मंत्रालयातील पत्रकार कक्षात कै विजय वैद्य यांच्या नावाने संदर्भ ग्रंथालय सुरू करण्यात आले. त्यावेळी ज्येष्ठ पत्रकार सदानंद खोपकर म्हणाले, पत्रकारांनी एक क्षण तरी विजय वैद्य होण्याचा प्रयत्न करावा. मंत्रालयातील पत्रकार कक्षात त्यांच्या नांवाने संदर्भ ग्रंथालय सुरू झाल्याने त्यांच्या स्मृती चिरंतन राहील, अशा शब्दांत ज्येष्ठ राजकीय विश्लेषक योगेश त्रिवेदी यांनी ज्येष्ठ राजकीय विश्लेषक पत्रकार विजय वैद्य यांना आदरांजली वाहिली. संदर्भ ग्रंथालयाचे उद्घाटन योगेश त्रिवेदी यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी अध्यक्षस्थानी संघाचे अध्यक्ष प्रमोद डोईफोडे हे होते. हे ग्रंथालय सुरू करण्यासाठी अशोक शिंदे, नासिकेत पानसरे आणि प्रितम नाचणकर यांनी अहोरात्र मेहनत घेतली. विजय वैद्य यांचे चिरंजीव विक्रांत वैद्य हेही यावेळी आवर्जून उपस्थित होते.
ग्रंथालयात अनेक प्रकारचे जवळपास १२०० ग्रंथ आहेत. विक्रांत वैद्य यावेळी म्हणाले, विधिमंडळ कामकाजातील नोंदी तसेच त्या संबंधित ग्रंथसंपदा ग्रंथालयात अधिक प्रमाणावर वृद्धिंगत व्हावी. मंत्रालय आणि विधिमंडळ वार्ताहर संघाचे अध्यक्ष प्रमोद डोईफोडे यांनी प्रास्ताविक केले. यावेळी त्यांनी ग्रंथालय आधुनिक काळाशी सुसंगत करण्यासाठी तसेच ग्रंथसंपदा वाढविण्याचे प्रयत्न संघाच्या वतीने भविष्यात केले जातील याची ग्वाही दिली. संघाचे कार्यकारिणी सदस्य खंडुराज गायकवाड यांनी आभार मानले तर सूत्रसंचालन अशोक शिंदे यांनी केले. यावेळी ज्येष्ठ पत्रकार सुयश पडते, विनया पंडित-देशपांडे, महेश पवार, अशोक अडसूळ,संपादक भीमराव धुळप आदी मान्यवर उपस्थित होते.
0 टिप्पण्या