संपूर्ण महाराष्ट्रात कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न दिवसेंदिवस बिकट होत चालला आहे. रोज कुठे ना कुठे कायदा सुव्यवस्थेबाबत गंभीर प्रश्न निर्माण होत आहेत. सैफ खानसारख्या सेलिब्रेटी व्यक्तीवर अगदी त्याच्या घरात घूसुन त्याच्यावर चाकू हल्ला होत असेल तर सर्वसामान्य जनतेचे काय असा प्रश्न आता सर्वसामान्य जनतेला भेडसावत आहे. ठाण्यात उथळसर नाका येथील माय बार या दुकानाजवळ २२ जानेवारी रोजी रात्री साडेबाराच्या दरम्यान दोन तरुणांवर हल्ला झाला. हल्ला इतका गंभीर आहे की दोन्ही युवकांना रुग्णालयात भरती व्हावे लागले आहे. सुदैवाने ते या हल्ल्यातून बचावले असल्याचे त्यांनी प्रजासत्ताक जनताच्या प्रतिनिधीशी बोलतांना सांगितले. जितेंद्र कांबळे आणि गुरुदत्त पाटील अशी या तरुणांची नावे असून ते अद्यापही रुग्णालयात आहेत. मात्र तीन दिवसांचा कालावधी उलटून देखील आरोपीला पकडण्यात पोलिसांना अपयश आल्याने जखमी तरुणांचे कुटुंबिय भयग्रस्त झाले आहेत. केवळ शाब्दीक बाचाबाचीत हा हल्ला झाला असल्याचे सांगण्यात येत आहे. मात्र अद्यापही पोलिसांनी मुख्य गुन्हेगाराला पकडले नाही किंवा त्यांच्यावर कारवाई केलेली नाही. याबाबत पोलिसांवर कुणाचा दबाव आहे असा सवाल त्यांचे कुटुंबिय करत आहेत.
0 टिप्पण्या