मूर्तीपूजा किंवा कर्मकांड आले की ते करण्याचे विधी आले, विधी आले की तो विधी पार पाडू शकणारा पुरोहित आला, पुरोहित आला की पुरोहिताचे पोट आले आणि पुरोहिताचे पोट आले की ते भरण्यासाठी पुन्हा नवनवे विधी, नवनव्या मूर्तीपूजा आणि नवनवे कर्मकांड आले, असे हे चक्र आहे. जगातला आणि विशेषतः भारताचा सबंध सांस्कृतिक संघर्ष हा पुरोहितशाहीविरोधी, वर्णव्यवस्थेच्या माध्यमातून मनुष्य आणि ईश्वर यांच्यात निर्माण झालेल्या दलालशाहीविरुद्धचा समतावादी, मानवतावादी विचारांचा संघर्ष आहे. देव, देवस्थाने, देवादिकांच्या मूर्त्या ह्या शोषणाचे मूळ होत असलेले पाहून अनेकांनी मूर्तीपूजेला विरोध केला. हे मूर्तीपूजाविरोधक नास्तिकच होते असे नाही. मध्ययुगात मूर्तीपूजेला विरोध करणारे महंमद पैगंबर यांनी एकेश्वरवादाची संकल्पना मांडली, अमूर्त ईश्वराची साधी, सोपी व पुरोहित न लागणारी प्रार्थना पद्धती देवू केली. भारतात १२ व्या शतकात महात्मा बसवण्णांनी देवाला थेट लोकांच्या गळ्यात इष्टलिंगाच्या स्वरुपात बांधले. माणसांचा देव माणसांच्या गळ्यात इष्टलिंग स्वरुपात बांधला, माणूस आणि देव यांच्यातला दलाल संपवला आणि देहालयाचे देवालय करुन टाकले. बुद्धांचे कामही असेच सोप्पे आणि मूलभूत आहे. त्यांनी देव आहे की नाही हा विवादच माजू दिला नाही. त्यावर कुठलेही भाष्य केले नाही. जीवन आहे, जीवनात दु:ख आहे आणि दु:ख मुक्तीचा मार्गही आहे असे सांगत दु:ख मुक्तीचा विवेकवादी, विज्ञानवादी मार्ग धम्माच्या रुपाने देवू केला. आधुनिक काळात महात्मा ज्योतिबा फुल्यांनी देवाला 'निर्मिक' असे संबोधले. सबंध सृष्टीची निर्मिती करणाऱ्या शक्तीचा स्विकार करीत ह्या शक्तीबद्दलची कृतार्थता व्यक्त करण्यासाठी आणि माणूसकीची, सत्याची, न्यायाची व समतेची शिकवण देण्यासाठी त्यांनी 'सार्वजनिक सत्यधर्माची' स्थापना केली. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी बौद्ध धम्माची नव्याने ओळख करुन देत स्वातंत्र्य, समता अन बंधुतेवर आधारित 'नव बौद्ध धम्म' सांगत धम्मचक्रप्रवर्तन केले. भगतसिंग हे नास्तिक. त्यांचे 'मी नास्तिक का आहे?' हे पुस्तक वाचल्यावर त्यांचा सारा रोष देवा-धर्माच्या आडून केल्या जात असलेल्या शोषणावर आणि विषमतेच्या समर्थनावर आहे हे लक्षात येते. तुकोब्बाने तर 'मोक्षपदा हाणो लाथा' असे थेटपणे सांगितले. रंजल्या-गांजल्यांना आपले म्हणणाराच खरा संत आहे आणि तिथेच खरे देवत्व आहे असे सांगितले. 'तिर्थी धोंडा पाणी, देव रोकडा सज्जनी' हीच संतांची शिकवण राहिली. गाडगे महाराज, तुकडोजी यांनी कर्मकांडापेक्षा सदाचाराला महत्व दिले. प्रबोधनकारांनी 'देवळांचा धर्म आणि धर्माची देवळे' या पुस्तकातून आपल्या खास ठाकरी शैलीत देव-देवळांच्या आणि धर्माच्या आडून होणाऱ्या अमानुष बाबींचा समाचार घेतला. येशू असो, नानक असोत की झरतुष्ट्र, सगळ्यांची शिकवण मानवतेचीच. पण या सगळ्या महात्म्यांचेच पुढे दैवतीकरण करुन त्यांच्या मूळ शिकवणूकीला बगल देत पुन्हा त्यात कर्मकांड घुसडवण्यात आले.
देव, धर्म, सृष्टी आणि माणूस यांच्यातील सबंधांबद्दल निकोप दृष्टीकोन रुजवणाऱ्यांच्या बाबतीतच हे झाले असे नाही तर सामाजिक, राजकीय, शैक्षणिक, सांस्कृतिक क्षेत्रात समतेसाठी लढणाऱ्या महामानवांनाही पुतळ्यांमध्ये आणि जातीच्या राजकारणामध्ये कोंडवण्यात आले. महामानवांचे पुतळे बांधले की महामानवाला खरे अभिवादन आणि तो महामानव ज्या जातीतला आहे त्या जातीतल्या लोकांवर प्रचंड मोठे उपकार अशी भावना सर्वत्र रुजवली गेली आहे. त्यामूळे देशभरात देव-देवळांप्रमाणेच महामानवांच्या पुतळ्यांची गर्दी सर्वत्र वाढलेली दिसते.
खरं तर महामानवांचे जीवनचरित्र, त्यांचा जीवनसंघर्ष, त्यांनी घालून दिलेली मूल्ये, त्यांचे विचार, त्यांचे कार्य लोकांपर्यंत पोहोंचवण्यासाठी साहित्याची, संशोधन केंद्रांची, वाचनालयांची, सांस्कृतिक कार्यक्रमांची, विविध माध्यमांचा प्रभावी वापर करण्याची सर्वाधिक आवश्यकता आहे. पण हे सगळे तळागळात रुजले तर विषमतावादी धर्मांधांचे आणि सत्तांधांचे मनसुबे जनता उधळवून लावेल म्हणून विचारांऐवजी पुतळ्यांचे, अस्तित्वाच्या लढाईऐवजी पोकळ अस्मितेचे स्तोम माजवले गेले. सर्वसामान्य जनता याला सरळसरळ बळी पडत गेली.
पुतळे बांधून महामानवांचे दैवतीकरण साध्य होते, महामानवांना ठराविक जातीत बंदिस्त करणे साध्य होते आणि पुतळ्यांची विटंबना झाली की समाजात गोंधळ उडवून देत जनतेच्या मूळ मुद्द्यांना दुर्लक्षितही करता येते. असे सर्व प्रकारचे शोषकांच्या हिताचे राजकारण पुतळ्यांच्या आडून केले जाते. भारतात आजवर पुतळा बसवण्यावरुन, पुतळा न बसवल्यावरुन, पुतळ्याची विटंबना झाल्यावरुन आणि या सगळ्याआडून कळीचे मुद्दे दुर्लक्षित करण्याचे षडयंत्र केल्यावरुन घडलेल्या घटनांची आकडेवारी काढल्यास पुतळ्याच्या राजकारणाचे गांभीर्य लक्षात येईल.
महामानवांच्या प्रतिमा आणि पुतळे पुढच्या पिढ्यांना महामानवाची ओळख करुन देण्यासाठी आवश्यक आहेत. पण असे पुतळे उभे करण्याऐवजी त्या-त्या महामानवांच्या कार्याशी सबंधिंत घटनांचे शिल्प उभे करुन त्याशेजारी पुस्तके व इतर माध्यमातून महामानवांचे कार्य, विचार व इतिहास सांगणारी साधने निर्माण करायला हवीत. महामानवांचे विचार रुजवण्याची आवश्यकता असताना प्रतिमा व पुतळ्यांचे स्तोम माजवण्याचे जाणीवपूर्वक प्रयत्न शोषकांकडून केले जातात.
देव-देवतांच्या मूर्त्या, पुतळे याबद्दलचे स्तोम कमी की काय म्हणून आता 'बॅनरबाजी, फ्लेक्सबाजी, होर्डिंगबाजीला' उत आला आहे. महामानवांच्या जयंती, पुण्यतिथीनिमित्त महामानवांच्या फोटोशेजारी राजकीय नेतेमंडळी, त्यांची पिलावळ यांच्या फोटो मिरवून महामानवांना अभिवादन करण्याचा अचाट प्रकार सर्वत्र पहावयास मिळतो आहे. खरं तर महामानवांचा फोटो असलेल्या बॅनरवर इतर कुणाचाही फोटो लावण्यास बंदी आणणारा आणि महामानवांच्या फोटोसह त्या महामानवाच्या विचारांचा सार सांगणारा मजकूर टाकण्यास सक्ती करणारा कायदाच व्हायला हवा. पण ही मागणी ना जनतेतून होते, ना कुठले लोकप्रतिनिधी याबद्दल आवाज उठवतात.
विज्ञान-तंत्रज्ञान दिवसेंदिवस प्रगतीच्या भराऱ्या घेत असतानाच्या काळात आपण मात्र त्याच तंत्रज्ञानाचा उपयोग करुन प्रतिमापुजन आणि विचारभंजनाला अधिकाधिक घट्ट करीत आहोत. मूर्त्या, पुतळे आणि बॅनरबाजीच्या सवंग राजकारणात गुरफटले जात आहोत. ही मानसिकता बदलली नाही तर येणाऱ्या पिढ्यांना फक्त प्रतिमा कळतील. विचारांच्या आणि विवेकाच्या पातळीवर त्यांचे अवमूल्यनच होत राहील.
© ॲड. शीतल शामराव चव्हाण
(मो. 9921657346)
0 टिप्पण्या