मालाड (पश्चिम) येथील मीठ चौकी जोडमार्गावरील उड्डाणपुलाच्या दुसऱ्या मार्गिकेचे (मार्वेकडून गोरेगावकडे जाणारी) अनौपचारिक लोकार्पण केंद्रीय वाणिज्य व उद्योग मंत्री पीयूष गोयल यांच्या प्रमुख उपस्थितीत आज ११ जानेवारी रोजी करण्यात आले. आज दौऱ्यावर असताना स्थानिक नागरिकांनी उड्डाणपुलाची दुसरी मार्गिका तातडीने खुली करण्याची मागणी गोयल यांच्याकडे केली. स्थानिक नागरिकांच्या मागणीनुसार या उड्डाणपुलाच्या दुसऱ्या मार्गिकेचे अनौपचारीक लोकार्पण करण्यात आले. सहाय्यक आयुक्त (पी उत्तर) किरण दिघावकर यांच्यासह स्थानिक मान्यवर, नागरिक देखील यावेळी उपस्थित होते.
बृहन्मुंबई महानगरपालिकेने मार्वेकडून पश्चिम द्रुतगती महामार्गाकडे अर्थात पश्चिमेकडून पूर्वेकडे जाणाऱ्या मीठ चौकी जंक्शनवर 'टी' आकाराचा उड्डाणपूल उभारला आहे. मार्वे ते पश्चिम द्रुतगती महामार्गाकडे जाणारी मार्गिका आणि मार्वेकडून गोरेगावकडे जाणारी मार्गिका अशी उड्डाणपुलाची रचना आहे. त्यापैकी मार्वे ते पश्चिम द्रुतगती महामार्गाकडे जाणारी एकेरी मार्गिका रविवार, दिनांक ६ ऑक्टोबर २०२४ पासून वाहतुकीसाठी खुली करण्यात आली आहे. तर, आज सकाळी उड्डाणपुलाच्या दुसऱ्या मार्गिकेचे लोकार्पण करण्यात आले. या मार्गिकेची लांबी ३९० मीटर असून रुंदी ०८ मीटर आहे. उड्डाणपुलाची दुसरी मार्गिका (मार्वेकडून गोरेगावकडे जाणारी मार्गिका) सुरु झाल्यामुळे नागरिकांची वाहतूक कोंडीतून सुटका होणार आहे. परिणामी, वेळ आणि इंधनाची बचत होणार आहे. हलक्या वाहनांसाठी या मार्गिकेचा वापर केला जाणार आहे.या उड्डाणपुलाची उभारणी बृहन्मुंबई महानगरपालिकेने केली आहे. या संपूर्ण प्रकल्पासाठी एकूण ५५ कोटी रुपये अंदाजित खर्च आहे. दहिसर ते अंधेरी (पश्चिम) मेट्रो - २ च्या उन्नत मार्गामुळे महानगरपालिकेने बांधलेल्या उड्डाणपुलाच्या उंचीवर मर्यादा आल्या आहेत. परिणामी हलक्या वाहनांसाठीच या उड्डाणपुलाच्या मार्गिकेचा वापर केला जाणार आहे.
0 टिप्पण्या