मुंबई मराठी पत्रकार संघाच्या वतीने सोमवार, दि. ६ जानेवारी रोजी पत्रकार दिनी देण्यात येणार्या प्रतिष्ठेच्या पुरस्कारांसाठी अर्ज स्वीकारण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. पुरस्काराचे यंदाचे ६१ वे वर्ष आहे. माध्यमसमूह, संपादक, स्वत: पत्रकार अथवा सहकारी पत्रकारही योग्य उमेदवाराचे नाव या पुरस्कारासाठी सुचवू शकतात. २०२४ या वर्षात उल्लेखनीय काम केलेल्या तसेच पुरस्कारास पात्र ठरणार्या पत्रकारांची नावे आवश्यक ती कागदपत्रे व कात्रणांसह मुंबई मराठी पत्रकार संघाच्या पत्रकार भवन, महापालिका मार्ग, आझाद मैदान, मुंबई ४०० ००१ येथील कार्यालयात शुक्रवार, दि. २७ डिसेंबर, २०२४ पर्यंत पाठवावीत, असे आवाहन मुंबई मराठी पत्रकार संघाचे अध्यक्ष संदीप चव्हाण यांनी केले आहे.
पुरस्कारांचा तपशील
१. आप्पा पेंडसे पत्रकारिता पुरस्कार : बृहन्मुंबईतील नागरी समस्यांवरील गेल्या वर्षभरातील उत्कृष्ट वृत्तांत स्तंभ व लिखाण यासाठी दिला जाणारा पुरस्कार.
२. जयहिंद प्रकाशन पुरस्कार : पत्रकारितेला उपयुक्त ठरणार्या विषयावर (उदा. सामाजिक, आर्थिक, पर्यावरण आदी) लेखन लिहिणार्या पत्रकाराचे चालू सालातील उत्कृष्ट पुस्तक, यामध्ये ललित साहित्य किंवा कथासंग्रहाचा विचार केला जाणार नाही.
३. कॉ. तु. कृ. सरमळकर पुरस्कार : कामगार, झोपडपट्टी, भाडेकरू, घरदुरुस्ती व दलितोद्धार या विषयांवरील लिखाणाबद्दल दिला जाणारा पुरस्कार.
४. विद्याधर गोखले : ललित लेखन पुरस्कार : पत्रकाराने केलेल्या ललित लेखनासाठी दिला जाणारा पुरस्कार.
५. रमेश भोगटे पुरस्कार : उत्कृष्ट राजकीय बातम्या व राजकीय वृत्तांताबद्दल दिला जाणारा पुरस्कार. (वर्तमानपत्र आणि वृत्तवाहिनी)
टीप : १) वरील पुरस्कारासाठी संपादक किंवा स्वत: पत्रकार तसेच अन्य सहकारी वर्तमानपत्रातील पत्रकारांची शिफारस करू शकतात. संबंधित माहिती (बातमी, वृत्तांत, लेख इ.) आवश्यक झेरॉक्स प्रतीसह पाठवावी. असे आवाहन संघाचे कार्यवाह शैलेंद्र शिर्के यांनी केले आहे.
*********************
*मंत्रालय आणि विधिमंडळ वार्ताहर संघाकडून उत्कृष्ट पत्रकार पुरस्कारासाठी प्रवेशिका पाठविण्याचे आवाहन*
मंत्रालय आणि विधिमंडळ वार्ताहर संघाच्यावतीने पत्रकारिता क्षेत्रात भरीव योगदान देणाऱ्या पत्रकारांना दरवर्षी राज्यस्तरीय पुरस्कार देवून गौरवण्यात येते. सन २०२३-२०२४ च्या उत्कृष्ट पत्रकार पुरस्कारकरिता आपली नामांकने व शिफारशी येत्या २५ डिसेंबर २०२४ पूर्वी पुढील पत्त्यावर पाठवावीत. असे आवाहन मंत्रालय आणि विधिमंडळ वार्ताहर संघाच्या वतीने करण्यात आले आहेत.
१) जीवनगौरव पुरस्कार - (राज्यस्तरीय)- एक, २) उत्कृष्ट पत्रकारिता पुरस्कार (राज्यस्तरीय ) - वृत्तपत्र प्रतिनिधी- एक, वृत्तवाहिनी माध्यम प्रतिनिधी पुरस्कार -एक, आणि ३) उत्कृष्ट पत्रकारिता पुरस्कार (केवळ मंत्रालय आणि विधिमंडळ वार्ताहर संघाच्या सदस्यांकारिता ) एक, अशा एकूण चार पुरस्कारांचा समावेश आहे.
१) *कृ. पां. सामक जीवनगौरव पुरस्कार* जेष्ठ पत्रकारांचे पत्रकारितेतील योगदान किमान २५ वर्षे असावे. त्यांचे वय ६० वर्षे पूर्ण असावे. पत्रकाराने राज्यस्तरावर पत्रकारिता क्षेत्रात केलेले उल्लेखनीय कार्य पाहून पुरस्कारासाठी निवड केली जाईल. तसेच राज्यातील पत्रकार, विविध पत्रकार संघटना व अन्य मान्यवर व्यक्ती यांच्या शिफारशीही विचारात घेण्यात येतील. यापूर्वी जेष्ठ पत्रकार श्री. वसंत देशपांडे, श्री. विनायक बेटावदकर, कै. विजय वैद्य आणि कै. दिनू रणदिवे आणि श्री.दिनकर रायकर श्री.कुमार कैतकर श्री.अजय वैद्य यांना हा पुरस्कार प्रदान करण्यात आला आहे.
२) *राज्यस्तरीय उत्कृष्ट पत्रकारिता पुरस्कार* (दोन ) सदर पुरस्कार वृत्तपत्र प्रतिनिधी व वृत्तवाहिनी माध्यम प्रतिनिधी यांना प्रत्येकी एक याप्रमाणे देण्यात येतो.पत्रकारितेत पूर्णवेळ सेवा बंधनकारक आहे. यामध्ये पत्रकारांना भाषेचे बंधन राहणार नाही. वृत्तपत्र माध्यम प्रतिनिधीना मागील दोन वर्षाच्या बातम्या /लेख यांची कात्रणं,तर वृत्तवाहिनी माध्यम प्रतिनिधीना चित्रफित /ध्वनीफित ( सी. डी. अथवा पेनड्राईव्ह) देणे बंधनकारक राहील. यावर अर्जदारांचे नाव तसेच संपादक किंवा संस्थेचे प्राधिकृत केलेल्या अधिकाऱ्यांकडून प्रवेशिका सांक्षाकित केलेली असावी.
३) *उत्कृष्ट पत्रकारिता पुरस्कार* (एक ) या पुरस्कारासाठी केवळ मंत्रालय आणि विधिमंडळ वार्ताहर संघाच्या सदस्यांनाच सहभाग घेता येईल. अर्जदाराने दि. १ जानेवारी २०२३ पासून ते अर्ज करण्याच्या दिनांकपर्यत कात्रणे/ध्वनीफित / चित्रफीतसह प्रवेशिका द्याव्यात.
पत्रकारिता क्षेत्रात उल्लेखनीय काम करणाऱ्या पत्रकारांनी आपल्या नामांकनाच्या प्रवेशिका अन्यथा मान्यवरांच्या शिफारशी तपशीलवार माहितीसह पुढील पत्त्यावर येत्या १ जानेवारी २०२५ पर्यत पाठवण्यात याव्यात. चारही पुरस्कार निवडताना पुरस्कार निवड समितीचा निर्णय अंतिम राहील. अशी माहिती अध्यक्ष प्रमोद डोईफोडे आणि सरचिटणीस प्रविण पुरो यांनी दिली आहे.
*प्रवेशिका पाठविण्याचा पत्ता* मंत्रालय आणि विधिमंडळ वार्ताहर संघ, तळमजला, पत्रकार कक्ष, मंत्रालय, मुंबई ४०००३२ किंवा mahamantralaya@gmail. Com
0 टिप्पण्या