महाराष्ट्राचे 21 वे मुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस यांनी आज शपथ घेतली. मी पुन्हा येईन म्हणणारे देवेंद्र फडणवीस तिसऱ्यांदा आले आणि मुख्यमंत्री पदावर विराजमान झाले. आजच्या शपथविधी सोहळ्यात योग्य मान-सन्मान न झाल्यावरून शिवसेना शिंदे गट नाराज झाला आहे. शिवसेना प्रवक्ते किरण पावसकर यांनी जाहीरपणे आपली नाराजी बोलून दाखवली. मात्र, आज लगेच पहिल्या दिवशी मी तक्रार करणार नाही, असेही त्यांनी म्हटले. दरम्यान, आजच्या शपथविधी सोहळ्याला पंतप्रधान नरेंद्र मोदींसह केंद्रीयमंत्री, भाजपचे दिग्गज नेते, वरिष्ठ नेते, सेलिब्रिटी, उद्योगपती यांची मोठी गर्दी होती. याशिवाय आमदार, खासदार आणि महायुतीचे कार्यकर्तेही मोठ्या संख्येने आझाद मैदानावर उपस्थित होते.
दुसरीकडे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आपण नाराज नसल्याचं सांगितलं. मात्र, एकनाथ शिंदे यांची आजची देहबोली पुन्हा एकदा नाराज असल्यासारखीच होती. शिंदे यांचे काही फोटो व्हायरल होत आहेत, त्यामध्ये शपथविधीवेळी देखील त्यांचा चेहरा गंभीर दिसून येत आहे. त्यामुळे, महायुतीमध्ये तिसरा पक्ष आल्याने शिवसेना शिंदे गट अगोदरपासूनच नाराज असल्याची चर्चा होती. आता, महायुती 2 सरकारमध्ये सुरुवातीपासूनच नाराजी नाट्य उमटल्याचे पाहायला मिळत आहे.महाराष्ट्राचे 21 वे मुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीसांनी शपथ घेतली. मंत्रालयातील दालनात पदभार स्वीकारला अन् राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत प्रशासनाला अधिक गतीने आणि जोमाने काम करण्यास त्यांनी सांगितले. जनतेच्या अपेक्षांची पूर्ती करण्यासाठी आपल्याला अधिक वेगाने काम करावे लागेल, असे ते अधिकाऱ्यांना म्हणाले. त्यानंतर, पत्रकारांच्या विविध प्रश्नांवर उत्तर देताना महाराष्ट्र घडविण्यासाठी डोक्यात असलेल्या संकल्पनांवर त्यांनी भाष्य केलं. तसेच, विरोधी पक्षांच्या प्रश्नांना प्राधान्यक्रमाने स्थान देऊन त्यांचा सहभाग महत्वाचा असल्यासंदर्भात त्यांनी भाष्य केलं. सिंचनातील नदी जोड प्रकल्प, सौर ऊर्जेचे 16 हजार मेगावॅटचे प्रकल्प असतील. सामाजिक क्षेत्रातील लाडकी बहीण योजना असेल, मुलींच्या शिक्षणातील 100 टक्के फी देण्याबाबतचे निर्णय पुढे सुरु ठेवायचे आहेत. आम्ही आमच्या वचननाम्यात, जाहीरनाम्यात जी आश्वासनं दिली आहेत ती पूर्ण करण्याच्या दृष्टीनं पावलं उचलायची आहेत. त्या दृष्टीनं पुढील काळात योग्य वेळी योग्य निर्णय करुन दिलेली आश्वासनं पूर्ण करणार आहोत. महाराष्ट्रातील जनतेला आश्वासित करु शकतो, सर्व समाजाला सोबत घेऊन चालणारं सरकार पाहायला मिळेल, अडचणी अनेक येतात, त्यावर मार्ग काढत मार्गक्रमण करु, 14 कोटी जनतेला आश्वासित करु इच्छितो की हे सरकार पारदर्शकपणे जनतेच्या कल्याणासाठी काम करेल, असा विश्वास देवेंद्र फडणवीसांनी व्यक्त केला.
स्थिर सरकारची पाच वर्ष पाहायला मिळतील. जनतेची अपेक्षा देखील तिच आहे. राज्याला स्थिर सरकार मिळावं अशी जनतेची अपेक्षा आहे. लाडकी बहीण योजना सुरु ठेवणार आहोत, 2100 देखील देणार आहोत, बजेटच्या वेळी त्याचा विचार करु, आर्थिक सोर्सेस योग्य प्रकारे चॅनेलाईज झाल्यानंतर ते करता येतं. जी आश्वासनं दिली आहेत ती पूर्ण करु, निकषात असतील त्यांना लाभ मिळेल, निकषाच्या बाहेरच्या बहिणी मिळाल्या तर त्याचा पूनर्विचार करु, मात्र सरसकट पूनर्विचार करणार नाही, मी उद्धव ठाकरे, शरद पवार, राज ठाकरे, पृथ्वीराज चव्हाण यांसह सर्वच प्रमुख नेत्यांना फोन करून शपथविधी सोहळ्याचं निमंत्रण दिलं. त्यावेळी, सगळ्यांनी माझं अभिनंदन केलं, पण ते वैयक्तिक कारणास्तव शपथविधीला येऊ शकले नाहीत. असे देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले.
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पत्रकार परिषदेला संबोधित केलं. यावेळी त्यांनी विविध मुद्यांवर भाष्य केलं. ते म्हणाले एक ऐतिहासिक शपथविधी महाराष्ट्राने पाहिला. सर्वांना न्याय देणारं सरकार, आनंद देणारं सरकार असा अडीच वर्षाचा कार्यकाळ झाला. प्रगत महाराष्ट्राचे नेतृत्व करण्याचे सौभाग्य मला, शेतकऱ्याच्या मुलाला मिळाले हे माझे भाग्य आहे, गेल्या अडीच वर्षात राज्यात आणि देशात एकच सरकार असल्याने भरभरून पाठबळ दिले, त्यासाठी मी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमित शाह यांचे मी धन्यवाद देतो, अभिनंदन करतो,कारण हे दोघे आमच्या पाठीशी उभे राहिले, म्हणून हा कार्यकाळ यशस्वी झाला, एकीकडे विकास प्रकल्प, लाडके भाऊ, लाडक्या बहिणी समाजाचा प्रत्येक घटक या सरकारच्या मागे राहिल्या. देवेंद्र फडणवीस यांचं अभिनंदन करतो. फडणवीस आणि अजित पवार यांनी खूप सहकार्य केले. अडीच वर्षांपूर्वी त्यांनी माझे नाव सुचवले आज मी त्यांचे नाव सुचवले याचा मला आनंद आहे, अडीच वर्षातील महायुती सरकार यशस्वी झालं आणि गतिमान, त्याची कारकीर्द यशस्वी ठरली. त्यामुळं न भूतो न भविष्यात असे बहुमत मिळाले कारण या सरकारचे काम हे आहे. यावेळी आम्ही चाळीस चे साठ झालो याचे देखील मला अभिमान आहे. आमच्यासाठी सत्ता हे साध्य नसून जनसेवेचे साधन आहे, जनतेचे सरकार असून जनतेसाठी काम केल्यानं अडीच वर्षांची कारकीर्द यशस्वी झाली, असं एकनाथ शिंदे म्हणाले. गेली अडीच वर्ष सीएम म्हणजे कॉमन मन म्हणून काम केलं, पदापेक्षा कामाला जास्त महत्त्व दिले. आता मी डीसीएम आहे, आता मी डेडीकेटेड टू कॉमन मॅन म्हणून काम करणार, माझा देवेंद्र फडणवीस यांना पाठिंबा असेल. मोदी, शहा, नड्डा यांचे खूप सहकार्य लाभले होते. मी देवेंद्र फडणवीस यांचं अभिनंदन करतो, वेगवान सरकार म्हणून हे सरकार काम करेल अशी इच्छा व्यक्त करतो, असंही एकनाथ शिंदे यांनी म्हटलं.
0 टिप्पण्या