आपल्या चहेत्या अभिनेत्यासाठी त्यांचे फॅन काय काय करत असतात हे आपण अनेकवेळा पाहिले आहे. भलेही ते सुप्रसिद्धी अभिेनेत्यांना याबाबत काही माहिती असो वा नसो पण आपलं प्रेम व्यक्त करण्याचा ही मंडळी कायम प्रयत्न करीत असतात. मात्र आता सोशल मिडीयासारखे माध्यम हातात असल्याने आपल्या चहेत्या अभिनेत्यापर्यंत पोहोचणे बऱ्यापैकी सोपे झाले आहे. अशाच एका अवलिया कलाकाराने आपले सलमान प्रति असणारे प्रेम आज चक्क स्वतःच्या रक्ताने चित्र काढून व्यक्त केले.
अभिनेता सलमान खान यांच्या वाढदिवसानिमित्त डॉ. संतोष कटारे स्वतःच्या रक्ताने सलमान खानचे चित्र काढून त्यांना भेट देणार आहेत. आपल्या मृत्यू पावलेल्या मित्राची ईच्छा पूर्ण करण्यासाठी आपण हे करत असल्याचे त्यांनी आवर्जून सांगितले. चित्रकलेत माहिर असलेले कटारे यांचे आज याबाबत सर्वच थरातून कौतुक होत आहे. आज त्यांनी प्रत्यक्षात स्वत:चे रक्त काढण्यापासून ते संपूर्ण चित्र पूर्ण करेपर्यंतचे संपूर्ण प्रात्यक्षिक प्रसिद्धी माध्यमांना दाखवले. गेल्या १५ वर्षापासून ते ही कला जोपासत आहेत. त्यांना अनेक पुरस्कार मिळाले आहेत. लंडन मधील एका संस्थेचा त्यांना सर्वोच्च पुरस्कार मिळाला आहे. राष्ट्रगीत, घटनेचा सारनामा, देशातील महापुरुष तसेच अभिनेते आणि राजकीय नेते अशी सुमारे ६० चित्रे त्यांनी काढली आहेत. ज्यामध्ये प्रामुख्याने छत्रपती शिवाजी महाराज, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे, येशू ख्रिस्त, भगतसिंग, गुरुनानक देवजी, स्वामी विवेकानंद, मदर टेरेस अशा अनेक महापुरुषांचा समावेश आहे. मुंबईतील वर्ल्ड ट्रेड सेंटर येथे ब्लड आर्टिस्ट म्हणून सिनेअभिनेता अरबाज खान यांच्या हस्ते महाराष्ट्र भूषण पुरस्कार देऊन त्यांना सन्मानित करण्यात आले. त्यांना लंडन येथील संस्थेने ब्लड आर्टिस्ट म्हणून सन्मानित केले आहे. तसेच दुबईमध्ये त्यांना चित्रकला या विषयावर डिलीट पदवी देण्यात आली, तर फ्रान्समधून पीएचडी ची डिग्री देण्यात आली. दिल्ली येथे नेल्सन मंडेला पुरस्काराने त्यांना सन्मानित करण्यात आलेले असून, नाशिक येथेही शिवछत्रपती पुरस्कार देऊन त्यांच्या गौरव करण्यात आलेला आहे.
0 टिप्पण्या