महाराष्ट्राचा मुख्यमंत्री कोण होणार यावर अडलेलं घोडं अखेर गंगेत न्हालं. महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रीपदी देवेंद्र फडणवीस यांची निवड झाली आहे. महायुतीच्या नेत्यांनी आज राज्यपालांकडे मंत्री मंडळ स्थापनेचा प्रस्ताव दिला. आणि मुंबईतील आझाद मैदान येथे मंत्री मंडळ शपथविधीच्या तयारीने जोर धरला. मुंबईच्या आझाद मैदानात या कार्यक्रमाची जोरदार तयारी सुरु आहे. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शहा यांच्यासोबतच भाजपचे राज्यातील अनेक मुख्यमंत्री या कार्यक्रमाला हजेरी लावणार आहेत. त्यामुळे तयारीही तशी जोरात सुरू आहे. केवळ प्रवेशपत्रिका असलेल्यांनाच या कार्यक्रमाकरिता प्रवेश दिला जाणार आहे. यावेळी मुख्यमंत्र्यांसह दोन उपमुख्यमंत्री यांचाही शपथविधी होणार आहे.
भव्य मंडप, अलिशान खुर्च्या, सोफे, गालिचा इतकेच नव्हे तर भव्य स्पीकर्स यंत्रणा देखील कार्यरत करण्यात आली आहे. मुंबईच्या आझाद मैदानात महायूतीच्या शपथविधीसाठी मुंबई पोलिसांकडून राहणार चोख पोलिस बंदोबस्त असणार आहे. शपथविधी सोहळ्या दरम्यान होणारी गर्दी लक्षात घेता मुंबई पोलिसांकडून अडिच हजारहून अधिक पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. शपथविधी दरम्यान 10 पोलिस उपायुक्त, 20 सहाय्यक पोलिस आयुक्त, 100 पोलिस निरीक्षक, 150 सहाय्यक व पोलिस उपनिरीक्षकांसह 1500 हून अधिक पोलिस कर्मचारी बंदोबस्तासाठी उपस्थित राहणार आहेत. याच बरोबर सशस्र पोलिस दल, टास्क फोर्ससह इतर सुरक्षा यंत्रणाही सज्ज असणार आहेत.
या शिवाय आझाद मैदान परिसर हा नो फ्लाईंग झोन म्हणून घोषित करण्यात आला असून आजू बाजूच्या उंच इमारतींवरही पोलिस तैनात असणार आहेत. शिवाय ड्रोन द्वारेही पोलिसांची करडी नजर असणार आहे. इतकेच नव्हे तर सीएसएमटी रेल्वे स्टेशनच्या भूयारी मार्गातील सर्व दुकाने आदल्या दिवसापासूनच बंद ठेवण्याचे आदेश देण्यात आले आहेत. शपथविधी सोहळ्याला येणाऱ्यांची संख्या मोठी आहे. त्यामुळे संभाव्य वाहतूक कोंडी टाळण्यासाठी मुंबई पोलिसांनी एक परिपत्रक जारी केलं आहे. यात आझाद मैदान आणि आसपासच्या परिसरातील वाहतुकीत मोठे बदल करण्यात येणार आहेत. हे बदल दुपारी १२ वाजल्यापासून ते कार्यक्रम संपेपर्यंत लागू राहणार आहेत. वाहतूक पोलिसांनी नागरिकांना खासगी वाहनांचा वापर टाळण्याचे आवाहन केले आहे. आझाद मैदान परिसरात पार्किंग नसल्यानं सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेचा वापर करावा, असेही आवाहन पोलिसांनी केले आहे.
0 टिप्पण्या