मुंबई महानगर प्रदेशातील वायू गुणवत्ता निर्देशांकात (एक्यूआय) दिसून येत असलेली वाढ महत्वाचा विषय आहे. नागरिकांचे जीवनमान सुकर ठेवण्यासाठी वायू प्रदूषण नियंत्रणात ठेवणे अत्यंत गरजेचे आहे. त्यामुळे, मुंबई महानगर प्रदेशात कार्यरत सर्व महानगरपालिका, पोलिस तसेच अन्य सर्व संबंधित यंत्रणांनी वायू प्रदूषण नियंत्रणास प्राधान्य देऊन अत्यंत काटेकोर उपाययोजना कराव्यात, असे निर्देश बृहन्मुंबई महानगरपालिका आयुक्त तथा प्रशासक भूषण गगराणी यांनी दिले आहेत. वायू प्रदूषण नियंत्रणासाठीच्या समन्वय समितीची पाचवी बैठक आयुक्त. गगराणी यांच्या अध्यक्षतेखाली बृहन्मुंबई महानगरपालिका मुख्यालयात आज २४ डिसेंबर रोजी पार पडली. महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाचे सदस्य सचिव डॉ. अविनाश ढाकणे, नवी मुंबई महानगरपालिका आयुक्त कैलाश शिंदे, मीरा भाईंदर महानगरपालिका आयुक्त संजय काटकर, बृहन्मुंबई महानगरपालिका सह आयुक्त (आयुक्त कार्यालय) चंद्रशेखर चोरे, सहसंचालक (वायू प्रदूषण नियंत्रण) डॉ. व्ही. एम. मोटघरे यांच्यासह विविध यंत्रणांचे अधिकारी आदी बैठकीला उपस्थित होते.
मुंबई महानगर प्रदेशातील वायू प्रदूषण नियंत्रणासाठी उपाययोजना करण्यासाठी माननीय उच्च न्यायालयाच्या निर्देशांनुसार, बृहन्मुंबई महानगरपालिका आयुक्त यांच्या अध्यक्षतेखाली समन्वय समितीची स्थापना करण्यात आली आहे. या समितीमध्ये महानगर आयुक्त (एमएमआरडीए), उपाध्यक्ष तथा व्यवस्थापकीय संचालक (सिडको), उपाध्यक्ष तथा मुख्य कार्यकारी अधिकारी (म्हाडा), मुख्य कार्यकारी अधिकारी (एसआरए), व्यवस्थापकीय संचालक (महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळ), परिवहन आयुक्त, महानगरपालिका आयुक्त (ठाणे, नवी मुंबई, कल्याण-डोंबिवली, मीरा-भाईंदर, वसई-विरार, पनवेल, उल्हासनगर, भिवंडी-निजामपूर महानगरपालिका), पोलिस आयुक्त (मुंबई, ठाणे, नवी मुंबई, मीरा-भाईंदर), सह पोलिस आयुक्त (वाहतूक, मुंबई), पोलीस अधीक्षक (ठाणे, पालघर, रायगड), आयुक्त, आरोग्य सेवा तथा व्यवस्थापकीय संचालक (राष्ट्रीय आरोग्य अभियान), प्रतिनिधी (भारतीय तंत्रज्ञान संस्था,मुंबई), प्रतिनिधी (इन्स्टिट्यूट ऑफ केमिकल टेक्नालॉजी, मुंबई), प्रतिनिधी (नीरी), अधिष्ठाता (सर जे. जे. रुग्णालय) आदींचा समावेश आहे.
समन्वय समितीच्या बैठकीत मुंबई महानगरातील विविध यंत्रणांकडून वायू गुणवत्ता सुधारण्यासाठी केल्या जात असलेल्या उपाययोजनांचा आढावा घेण्यात आला. यावेळी महानगरपालिका आयुक्त. भूषण गगराणी म्हणाले की, माननीय उच्च न्यायालयाने मुंबई महानगर प्रदेशातील वायू प्रदुषणाची दखल घेत सर्व यंत्रणांनी वायू प्रदूषण नियंत्रणासाठी अत्यंत प्रभावीपणे उपाययोजना करण्याचे निर्देश दिले आहेत. माननीय उच्च न्यायालयाच्या निर्देशांचे तंतोतंत पालन करत सर्व यंत्रणांनी ज्या भागात वायू गुणवत्ता निर्देशांक खालावलेला आहे त्या परिसराकडे विशेष लक्ष देऊन उपाययोजना कराव्यात. त्या परिसरातील ५ किलोमीटर अंतर परिसरातील वायू प्रदुषणासाठी कारक ठरणाऱ्या घटकांकडे प्रकर्षाने लक्ष द्यावे. वायू प्रदूषण नियंत्रण ही मुंबई महानगर क्षेत्रातील सर्व यंत्रणांची सामुहिक जबाबदारी आहे. एखाद्या यंत्रणेने खूप प्रभावी कामगिरी केली तरी दुसरीकडे, एखाद्या भागात वायू गुणवत्ता निर्देशांक खालावलेला असल्यास त्याचे परिणाम संपूर्ण महानगर प्रदेशावर होईल. त्यामुळे, प्रत्येक यंत्रणेने सामुहिकपणे आणि अत्यंत काटेकोरपणे उपाययोजना करण्यासाठी प्रयत्न करावेत, अशा सूचनाही श्री. गगराणी यांनी दिल्या.
0 टिप्पण्या