Top Post Ad

रस्‍त्‍यांवर नव्‍याने चर खोदकामास मनाई... महानगरपालिका आयुक्‍तांचे निर्देश

मुंबई महानगर क्षेत्रात मोठ्या प्रमाणावर होत असलेली विकास कामे, बांधकामे यासह हवेतील बदलामुळे वायू गुणवत्ता स्तर खालावल्‍याचे निदर्शनास आले आहे. वायू प्रदूषण नियंत्रणात आणण्यासाठी बृहन्मुंबई महानगरपालिकेने तातडीच्या, अल्पकालीन आणि दीर्घकालीन उपाययोजना लागू केल्या आहेत. याचाच एक भाग म्‍हणून बृहन्‍मुंबई महानगरपालिकेने चर खोदण्यासंदर्भात नवीन धोरण जाहीर केले आहे. त्यानुसार, चर खोदकामास परवानगी देण्यास तात्‍काळ प्रभावाने मनाई करण्‍यात आली आहे. पाणी पुरवठ्याच्‍या मुख्य जलवाहिनी गळतीचे कामकाज वगळता नवीन चर खोदण्याच्या परवानग्या दिल्या जाणार नसल्‍याचे महानगरपालिका आयुक्‍त तथा प्रशासक भूषण गगराणी यांनी स्‍पष्‍ट केले आहे.


    वातावरणातील बदलांमुळे बृहन्मुंबई क्षेत्रासह (मुंबई शहर आणि उपनगर) मुंबई प्रदेशातील हवेच्या गुणवत्तेवर विपरित परिणाम होऊन वायू प्रदूषणात वाढ होत असल्याचे निदर्शनास येत आहे. या पार्श्वभूमीवर, वायू प्रदूषण नियंत्रणासाठी बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या वतीने मार्गदर्शक तत्वे आणि प्रमाणित कार्यपद्धती यापूर्वीच लागू करण्यात आली आहे. त्यामध्ये बांधकामांशी संबंधित बाबींचा देखील समावेश आहे. आता महानगरपालिका प्रशासनाने त्याहीपुढे जाऊन वायू प्रदुषणासाठी कारणीभूत ठरत असलेल्या छोट्यामोठ्या घटकांवरही अधिक लक्ष केंद्रीत केले आहे.

चर खोदण्याच्या कामामुळे वायू प्रदूषणात वाढ होत असल्याचा निष्‍कर्ष आहे. या कारणास्‍तव धूळ प्रतिबंध कार्यवाहीसाठी चर खोदकामास तात्‍काळ प्रभावाने मनाई करण्‍याचे निर्देश महानगरपालिका आयुक्‍त तथा प्रशासक श्री. भूषण गगराणी यांनी प्रशासकीय विभागांचे सहायक आयुक्‍त, रस्‍ते व वाहतूक विभागाचे उप प्रमुख अभियंता यांना दिले आहेत. ही मनाई पुढील आदेश येईपर्यंत लागू असेल.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

 READ / SHARE  / FORWARD 
JANATA  NEWS  xPRESS

निरंतर सेवेच्या आर्थिक मदतीकरिता 
for Donation
G pay 8108603260 

संपादक: सुबोध शाक्यरत्न  
M : 8108658970

Email- pr.janata@gmail.com