सर्वसामान्य नागरिकांच्या तक्रारींचे निराकरण तातडीने व्हावे यासाठी केंद्रशासनाने Good Goverence Week 2024 हा सप्ताह महापालिका स्तरावर राबविण्याचे निर्देश दिले आहेत, त्यानुसार महापालिका कार्यक्षेत्रात दिनांक 19 ते 24 डिसेंबर या कालावधीत सदर अभियान राबविण्यात येणार असल्याची माहिती आयुक्त सौरभ राव यांनी दिली. याबाबत आज आयुक्तांच्या दालनात बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. या बैठकीस अतिरिक्त आयुक्त प्रशांत रोडे, उपायुक्त जी.जी. गोदेपुरे, उमेश बिरारी, अनघा कदम, दिनेश तायडे, मधुकर बोडके, सचिन सांगळे, डॉ. पद्मश्री बैनाडे, वैद्यकीय आरोग्य अधिकारी चेतना नितील, उपनगर अभियंता विकास ढोले, शुभांगी केसवाणी उपनगरअभियंता पाणीपुरवठा विनोद पवार, कार्मिक अधिकारी दयानंद गुंडप, मुख्य पर्यावरण अधिकारी मनिषा प्रधान आदी उपस्थित होते.
केंद्रशासनाने 'प्रशासन गाव की और' अभियान राबविण्याचे निश्चित केले असून स्थानिक स्वराज्य संस्थाच्या माध्यमातून हे अभियान प्रभावीपणे राबविण्यात येणार असून ठाणे महानगरपालिकेने देखील याची पूर्वतयारी केली असून दिनांक 19 ते 24 डिसेंबर या कालावधीत विविध विषयांवर कार्यक्रमाचे आयोजन केले आहे. तरी ठाणेकर नागरिकांनी सार्वजनिक कामांबाबत असलेल्या तक्रारी / समस्या अथवा सूचना महापालिकेकडे सादर करावयाच्या आहेत, या तक्रारींचे निराकरण महापालिकेच्या माध्यमातून प्राधान्याने करण्यात येणार आहे. तसेच केंद्र / राज्यशासन व महापालिकेकडून राबविण्यात येणाऱ्या विविध योजनांबाबत सविस्तर माहिती प्राप्त व्हावी यासाठी दिव्यांग व्यक्ती, त्यांचे पालक व संबंधित संस्था यांच्यासाठी विशेष माहिती सत्राचे आयोजन करण्यात यावे असेही आयुक्तांनी नमूद केले.
या सप्ताहादरम्यान 19 डिसेंबर रोजी सार्वजनिक आरोग्य विभाग, छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालय/ राजीव गांधी वैद्यकीय महाविद्यालय कळवा, जन्म मृत्यूविभाग, फायलेरिया विभाग, पशुवैद्यकीय विभाग, घनकचरा व्यवस्थापन विभाग, परवाना विभाग , मालमत्ता करवसुली आदी विभागांच्या तक्रारीचे निराकरण करण्यात येणार आहे. तर 20 डिसेंबर रोजी शहर विकास विभाग, सार्वजनिक बांधकाम विभाग, पाणीपुरवठा विभाग, मलनिस्सारणविभाग, अग्निशमन विभाग, वृक्षप्राधिकरण व उद्यान विभाग, पर्यावरण विभाग, माहिती व तंत्रज्ञान या विभागांच्या तक्रारीचे निराकरण करण्यात येणार आहे. 21 डिसेंबर रोजी समाज विकास विभाग, दिव्यांग व्यक्ती कल्याणकारी योजना, महिला व बालविकास कल्याणकारी योजना आदी विभागांच्या तक्रारींचे निराकरण केले जाणार आहे. 22 डिसेंबर रोजी आस्थापना विषयक बाबी तर 23 डिसेंबर रोजी Good Goverence या विषयावर शासन सेवेत कार्यरत अथवा सेवेतून निवृत्त झालेल्या तज्ज्ञ अधिकारी यांचे ठाणे महानगरपालिकेमध्ये अधिकारी कर्मचारी यांचेकरिता विशेष व्याख्यान आयोजित केले जाणार आहे. 19 ते 24 डिसेंबर या कालावधीत दर दिवशी सकाळी 11 ते 1 या वेळेत नरेंद्र बल्लाळ सभागृहात सर्व शिबीरांचे आयोजन केले जाणार असल्याचे आयुक्त सौरभ राव यांनी नमूद केले. तसेच ज्या नागरिकांना उपरोक्त नमूद दिवशी उपस्थित राहता येणार नाही त्यांनी आपल्या तक्रारी 8657881701 या भ्रमणध्वनीवर व्हॉटसॲपच्या माध्यमातून पाठवाव्यात असेही आयुक्तांनी नमूद केले.
...................................................................................
0 टिप्पण्या