कायदा आणि पैशांचा दुरुपयोग करून सरकार कोसळवली जात आहेत. पैशांचा जोर असाच राहिला तर येणार्या काळात उद्योगपती अदाणीही पंतप्रधान झाल्यास आश्चर्य वाटायला नको. यंदा तर विधानसभेच्या निवडणुकीसाठी महायुतीच्या उमदेवारांना पोलिसांच्या व्हॅनमधून पैशांचे वाटप केले जातेय. पोलिसांच्या वाहनातून पैसे चेक नाक्यावरून पास होत आहेत. सर्व यंत्रणा गप्प आहे. आमचे काही जवळचे पोलीस आहेत, त्यांनी आम्हाला सर्व माहिती दिली आहे, असा खळबळजनक आरोप शिवसेना (उध्दव बाळासाहेब ठाकरे गटाचे) नेते अनिल परब यांनी केला आहे. पक्षांतर बंदी आणि आमदार अपात्र प्रकरणी न्यायालयात तारीख पे तारीखचा जो सिलसिला सुरू आहे यावर अनिल परब यांनी तीव्र नापसंती व्यक्त केली.
शिवसेना व महाविकास आघाडीची भूमिका सांगत असताना परब म्हणाले, अरबी समुद्रातील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या स्मारकाचे आश्वासन महायुतीने दिले होते. त्यासाठी पंतप्रधान मोदींना मुंबईत बोलून जलपूजन केले गेले. या स्मारकाची एक वीटही उभारली गेलेली नाही. महाराजांच्या हा अवमान शिवप्रेमी सहन करणार नाही आणि म्हणूनच महाराजांची प्रेरणा तरुणापर्यंत पोहचवण्यासाठी प्रत्येक जिल्ह्यात महाराजांचे मंदिर उभारण्याचे वचन उद्धव ठाकरे यांनी दिल्याचे परब म्हणाले.
लाडकी बहीण योजनेला विरोध नाही मात्र लोकसभा निवडणुकीत पराभव पत्करावा लागल्यावर यांना लाडकी बहीण आठवली. हे नाटक जनता विसरणार नाही. आम्ही लाडक्या बहिणीला ३००० रुपये देणार आहोत. बेरोजगार तरुणाला ४००० हजार देणार आहोत आणि हे निर्णय विचारपूर्वक घेतले असल्याचेही ते म्हणाले. कोणत्याही पक्षातील ज्येष्ठ नेत्यावर पातळी सोडून टीका करणे योग्य नाही, त्यासाठी एका आचारसंहितेची गरज असल्याचे प्रतिपादन परब यांनी यावेळी केले.
आमच्या घरात चोरी नाही डाका पडला आहे. उध्दव ठाकरे आता घर सावरायला लागलेत थोडा वेळ लागेल. चोर आणि पोलीस एकत्र आल्यावर न्याय मिळवणं थोडे कठीण जात आहे. मात्र जनतेने यांचे सर्व खेळ ओळखले आहेत, अशी मार्मिक टिप्पणीही त्यांनी एकनाथ शिंदे यांच्या बंडावर केली. शिवसेना पक्ष व चिन्ह ही फक्त बाळासाहेबांची प्रॉपर्टी होती या राज ठाकरेंच्या टिकेचा समाचार घेताना अनिल परब यांनी बाळासाहेबांचे मृत्यूपत्र अंमलात आणण्यासाठी बाळासाहेबांनीच माझी वकील म्हणून नेमणूक केली होती. शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे' इच्छा पत्र ' तयार करताना आपण स्वतः त्यात सहभागी होतो.' जे जे माझे आहे, ते उद्धवला मिळाले पाहिजे' अशी इच्छा व्यक्त करून त्याचे पालन करण्यास आम्हाला बाळासाहेबांनी बजावले होते, शिवसेना पक्ष व त्याचे चिन्ह हे उध्दव ठाकरे यांचेच आहे. कारण शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचीच तशी लिखित इच्छा आहे. त्यामुळे शिवसेना हा पक्ष आणि धनुष्यबाण या चिन्हाचे उद्धव ठाकरे हेच हकदार आहेत.
कोकणातील विनाशकारी प्रकल्प गुजरातला घेऊन का जात नाहीत ? कोकणाचा विकास राहिला दूर, कोकण भकास करणारे प्रकल्पच कोकणात का आणले जात आहेत ? असा सवाल परब यांनी केला. वक्फ बोर्ड बाबत संयुक्त संसदीय समितीच्या अहवाल आल्यावर शिवसेना भूमिका घेणार आहेच. मात्र हिंदू देवस्थानच्या जमिनी कुणाच्या घशात गेल्या हे लवकरच बाहेर येणार आहे, असे परब यांनी सांगितले. जी एस टी बाबत जो गोंधळ सुरू आहे त्यात गरीब व्यापारी भरडला जात आहे. त्यात सुधारणा करणे गरजेचे आहे. ३७० कलम हटवले गेले. मात्र काश्मीरी जनतेचे प्रश्न सुटलेले नाहीत. त्यासाठी चर्चेची गरज आहे, असे मत त्यांनी व्यक्त केले.
0 टिप्पण्या