महाराष्ट्र विधानसभा सार्वत्रिक निवडणूक २०२४ च्या पार्श्वभूमीवर माननीय भारत निवडणूक आयोग आणि बृहन्मुंबई महानगरपालिका यांच्या संयुक्त विद्यमाने, मतदार शिक्षण आणि निवडणूक सहभागासाठी सुनियोजित कार्यक्रम (स्वीप) अंतर्गत मतदार जनजागृतीसाठी आज (दिनांक १६ नोव्हेंबर २०२४) मोटर सायकल रॅली काढण्यात आली. या मोटरसायकल रॅलीच्या माध्यमातून दिंडोशी (१५९), मालाड पश्चिम (१६२), गोरेगाव (१६३), अंधेरी पूर्व (१६६) आणि अंधेरी पश्चिम (१६५) या मतदारसंघात मतदान जनजागृती करण्यात आली.
महानगरपालिकेचे सहआयुक्त (परिमंडळ ४) विश्वास शंकरवार यांच्या सूचनेनुसार या मोटरसायकल रॅलीचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी उप आयुक्त (घनकचरा व्यवस्थापन) किरण दिघावकर, सहायक आयुक्त चक्रपाणी अल्ले उपस्थित होते.विधानसभा सार्वत्रिक निवडणूक २०२४ मध्ये मतदानाचे प्रमाण अधिक वाढवण्याच्या उद्देशाने मुंबई महानगरात विविध उपक्रम राबविण्यात येत आहेत. याच पार्श्वभूमीवर मालाड पश्चिम स्थित पी उत्तर विभाग कार्यालय येथून मोटारसायकल रॅलीचे आयोजन करण्यात आले होते. विविध परिसरातून मतदान जनजागृतीपर घोषणा देत मोटर सायकल रॅली निघाली. 'मतदानासाठी वेळ काढा, आपली जबाबदारी पार पाडा', 'माझे मत माझा अधिकार', 'चला मतदान करूया, आपला विकास करूया', '१८ वर्षे केले पार, चला वापरूया मतदानाचा अधिकार', 'मुंबईकर व्होट कर' अशा विविध घोषणा यावेळी देण्यात आल्या.
मालाड पश्चिम येथील पी उत्तर कार्यालय येथून सकाळी दहा वाजेच्या सुमारास मोटरसायकल रॅलीला प्रारंभ झाला. प्रारंभी मोटरसायकल रॅलीतील सहभागी सर्वांना विधानसभा सार्वत्रिक निवडणूक २०२४ पार्श्वभूमीवर ' स्वीप ' उपक्रम अंतर्गत मतदान करण्यासंदर्भात शपथ देण्यात आली. स्वामी विवेकानंद मार्गे ही रॅली जुहू चौपाटी येथे दुपारी बारा वाजेच्या सुमारास पोहोचली. जुहू चौपाटी या ठिकाणी मतदान जनजागृतीचा संदेश देणाऱ्या सेल्फी पॉईंटसह स्वाक्षरी मोहीम राबविण्यात आली. उप आयुक्त किरण दिघावकर म्हणाले की, मतदान प्रक्रिया ही लोकशाहीचा पाया आहे. हा पाया भक्कम करण्यासाठी आणि राज्याचे भविष्य घडविण्यासाठी प्रत्येक पात्र नागरिकांनी मतदानाचा हक्क बजावला पाहिजे. मतदानाचा दिवस हा सुट्टी म्हणून न पाहता तो एक उत्सव म्हणून पाहावा. मतदान करणे हे आपले कर्तव्य असून प्रत्येक नागरिकांनी निवडणूक प्रक्रियेत उत्स्फूर्तपणे सहभागी झाले पाहिजे, असे आवाहन दिघावकर यांनी केले.
0 टिप्पण्या