आगामी विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने उत्तम व्यवस्थापन करावे, मुंबईतील कामकाज हे आदर्शवत (मॉडेल) उदाहरण ठरेल, असे नियोजन करावे, आगामी निवडणुकीच्या अनुषंगाने प्रथमच बृहन्मुंबई महानगरपालिका प्रशासनावर मोठी जबाबदारी सोपवण्यात आली आहे आणि ती योग्यप्रकारे पार पाडली जावी. माननीय निवडणूक आयोगाच्या निर्देशांनुसार, सर्व बाबींचे काटेकोरपणे पालन केले जात आहे. तथापि, कोणत्याही छोट्यामोठ्या बाबींकडे दुर्लक्ष होता कामा नये. विशेषतः यापूर्वीच्या मतदानावेळी आलेले पूर्वानुभव लक्षात घेता, मतदारांसाठी प्रत्येक मतदान केंद्रांवर निश्चित किमान सुविधांची (Assured Minimum Facility) पूर्तता प्रशासनाने करणे आवश्यक आहे. एकाच ठिकाणी दहापेक्षा अधिक मतदान केंद्र असलेल्या ठिकाणी गर्दीचे योग्य व्यवस्थापन करण्याच्या दृष्टीने प्रवेश आणि बाहेर जाण्याच्या मार्गाची व्यवस्था करावी. जेणेकरुन मतदारांच्या रांगा लागणार नाहीत आणि त्याचा परिणाम मतदानाच्या प्रमाणावर होणार नाही. प्रत्येक मतदान केंद्रांवर पिण्याच्या पाणी, स्वच्छतागृहे यांची पुरेशी सोय असावी. स्वच्छतागृहे स्वच्छ राहतील याची दक्षता घ्यावी. एकूणच मतदारांची गैरसोय होणार नाही, अशारितीने सर्व नागरी सेवा पुरवाव्यात, असे निर्देश असे निर्देश जिल्हा निवडणूक अधिकारी तथा बृहन्मुंबई महानगरपालिका आयुक्त भूषण गगराणी यांनी सर्व उप आयुक्त आणि सहायक आयुक्त यांना दिले.
आगामी विधानसभा निवडणुकीसाठी मतदान केंद्रांचे सुसूत्रीकरण करण्यात आले आहे. त्या अंतर्गत महानगरपालिका शाळा, खासगी शाळा व महाविद्यालये यासह गृहनिर्माण संस्थांच्या परिसरामध्ये मतदान केंद्र असतील. गृहनिर्माण संस्थांच्या परिसरामध्ये असलेल्या मतदान केंद्रांबाबत तसेच तिथे अपेक्षित असलेल्या सुविधांच्या व्यवस्थापनासाठी तेथील पदाधिकाऱ्यांशी योग्य समन्वय साधावा. ऐनवेळी कोणत्याही प्रकारची अडचण उद्भवणार नाही, याकडे कटाक्षाने लक्ष द्यावे. नियोजित सर्व मतदान केंद्रांच्या ठिकाणी संबंधित परिमंडळ उपआयुक्त, सहायक आयुक्त यांनी निवडणुकीच्या आधी जावून पाहणी करावी, ज्याद्वारे सेवा-सुविधांचा आढावा घेवून पूर्तता करता येईल. गरज असल्यास पोलीस व इतर संबंधित शासकीय प्राधिकरणांशी समन्वय साधता येईल, एकूणच, माननीय निवडणूक आयोगाच्या निर्देशांप्रमाणे मतदान केंद्रांवर मतदारांना सर्व निश्चित किमान सुविधा पुरवाव्यात. मुंबईतील निवडणूक विषयक कामकाज आदर्शवत ठरावे, यासाठी आपापल्या स्थानिक स्तरावर सुव्यवस्थित मतदान केंद्र व आवश्यक उपाययोजना कराव्यात, अशा सूचनाही यावेळी गगराणी यांनी दिल्या.
0 टिप्पण्या