भारत जोडो अभियानाचे राष्ट्रीय समन्वयक योगेंद्र यादव यांच्या प्रमुख उपस्थितीत आज विदर्भात अकोला येथे महाराष्ट्र डेमोक्रॅटिक फोरमच्या वतीने “लोकशाहीचे रक्षण व आमचे मतदान” या विषयावर सभा आयोजित करण्यात आली होती. भारत जोडो अभियानाचे राष्ट्रीय सचिव डॅा. संजय मं. गो., राज्य समन्वयक उल्का महाजन, विदर्भ संयोजक अविनाश काकडे आदी वक्त्यांची भाषणं झाल्यावर प्रेक्षकांपैकी काही जणांनी 'आम्हाला प्रश्न विचारायचे आहेत' असे म्हणून आरडाओरडा सुरू केला. "आम्ही उत्तरे देऊ, सर्व भाषणे होऊ देत." अशी भूमिका भारत जोडो अभियानाच्या नेत्यांनी घेतली. मात्र ते न ऐकता काही जण विचारमंचावर चढले, त्यांनी माईक ताब्यात घेतला आणि हुल्लडबाजी सुरू केली. ज्या वेगाने हे घडले, त्यावरून ही कृती पूर्वनियोजित असावी असे वाटते. त्यांनी योगेंद्र यादव यांना बोलूही दिले नाही व सभा उधळून लावली. भारत जोडो अभियानातर्फे आम्ही या घटनेचा तीव्र निषेध करतो.
स्थानिक कार्यकर्ते व पत्रकार यांच्या माहितीनुसार ते वंचित बहुजन आघाडीचे कार्यकर्ते होते असे कळते. वंचित बहुजन आघाडीचे नेते याबाबत योग्य ती भूमिका घेतील तसेच संविधान विरोधी शक्ती, भाजप, व संघाविरोधी लढताना शत्रू-मित्र विवेक बाळगतील अशी अपेक्षा आहे. जे आपल्या पक्षाबरोबर नाहीत अशा साहित्यिक, विचारवंत, सामाजिक-राजकीय कार्यकर्त्यांना लक्ष्य करण्याचा अलिकडच्या काळात वंबआच्या कार्यकर्त्यांनी नवाच पॅटर्न तयार केला आहे. अभिव्यक्ती स्वातंत्र्याच्या संवैधानिक हक्काची अशी पायमल्ली वंचितांचं राजकरण करू पाहणाऱ्या पक्षाने करणे यासारखी शोकांतिका नाही.
अशाप्रकारच्या हुल्लडबाजीचा आम्ही तीव्र निषेध करतो. पोलीस यंत्रणेने असे प्रकार होऊ नयेत यासाठी प्रयत्नशील असले पाहिजे. अशाप्रकारच्या दडपशाहीला न भिता भारत जोडो अभियान आपले काम राज्यभरात सुरू ठेवेल असा आम्ही निर्धार व्यक्त करतो.
*हमला चाहे जितना होगा, हाथ हमारा नहीं उठेगा*
*संविधान बचाव, देश बचाव*
जगदीश खैरालिया, वंदनाताई शिंदे, नीता साने, राजेंद्र चव्हाण, मुक्ताश्रीवास्तव, निमिष साने, अनिल शाळिग्राम, सुब्रतो भट्टाचार्य, विशाल जाधव, रवी घूले, शुभदा चव्हाण, अजित डफळे, मर्सिया डीकुन्हा, हुकुमचंद शिरसोदे,हर्षलता कदम, मीनल उत्तूरकर आणि अजय भोसले.
*भारत जोडो अभियान, ठाणे*
0 टिप्पण्या