Top Post Ad

आदिवासी हितासाठी निसर्गदेवता व पंचमहाभूतांना आवाहन

   आज आदिवासी जमात संकटात सापडली आहे.जल जंगल जमीन यावरच्या परंपरागत अधिकारांचा प्रश्न सुटलेला नाही . रोजगाराचा अभाव  असल्याने स्थलांतर पाचवीलाच पुजलेले आहे. सरकारी योजना,सवलती, राखीव जागा ,शिक्षण यांचीअंमलबजावणी धिम्या गतीने चालू आहे. त्यातच महाराष्ट्रातील शिंदे फडणवीस अजितदादा सरकारने आदिवासी जमातीला नव्या संकटात टाकण्याचे ठरवले आहे. आदिवासी जमातीच्या  राज्यघटनेचे संरक्षण असलेल्या यादीमध्ये धनगर जातीची घुसखोरी करण्याचा सरकारने प्रयत्न चालवला आहे. आधीच बोगस आदिवासी, डी लिस्टिंग अशा भाजपच्या पाठिंब्याने चाललेल्या आदिवासी विरोधी कारवाया आहेतच. खरेखुरे आदिवासी अजूनही सवलतींपासून व शासकीय योजनांच्या लाभापासून दूरच आहेत. त्यात या भाजप निर्मित समस्यांमुळे आदिवासी जमात अडचणीत आलेली आहे. आजही आदिवासी पुरुषांची निरक्षरता 65 टक्के व स्त्रिया 80 टक्के निरक्षर आहेत.उच्च शिक्षणामध्ये आदिवासींची पहिली पिढी आता कुठेतरी स्थिरावत आहे. नोकऱ्यांसाठी स्पर्धेत आता कुठेतरी आदिवासी तरुण शहरात येऊन उतरू लागला आहे. आणि त्याच वेळेस फडणवीस साहेबांनी 2014 पासून आदिवासींच्या जीवाला घोर लावला आहे. त्यांनी धनगर समाजाला तुम्हाला आदिवासींच्या यादीत घेतो असे आश्वासन दिल्याचे समजले व त्यातून धनगर जातीला आदिवासींमध्ये घुसखोरी करण्यास प्रोत्साहन मिळाले.त्यातच आता धनगर जातीने १) आम्हाला आदिवासी जमातीत साडेतीन टक्के जागा राखीव द्या २) आमची आदिवासींत सी कॅटेगिरी करा ३) आदिवासींसाठी असलेल्या बजेट मधील आठ टक्के निधीत धनगरांना वाटा द्या ४)धनगरांना आदिवासी राजकीय प्रतिनिधित्व देण्यासाठी मतदारसंघ द्या अशा प्रकारच्या मागण्या धनगर पुढारी  गोपीचंद पडळकर राजरोसपणे करत आहेत. 

 


त्यांनी तर कहरच गाठला आहे, एक आदिवासी व्यक्तीला एकदा राखीव जागांचा लाभ किंवा सवलत मिळाली असेल तर त्या कुटुंबात पुन्हा सवलत देऊ  नका,त्यांना सवलतीतून बाहेर काढा असे मागणी पडळकर करत आहेत. म्हणजे बापाला शिक्षणात राखीव जागा मिळाली तर मुलांना उच्च शिक्षणात राखीव जागांची सवलत देऊ नका, बापाला नोकरी मिळाली असेल तर पोरांना वाऱ्यावर सोडा, शेतकरी म्हणून आदिवासीला पंप मिळाला असेल तर त्याला पाईपलाईन देऊ नका आणि त्याच्या मुलालाही शेतीसाठीच्या सवलतीतून बाहेर काढा अशा प्रकारच्या मागण्या करून हे पुढारी आदिवासींना देशोधडीला लावण्याचे षडयंत्र आखत आहेत. हे भयानक संकट महाराष्ट्रातील आदिवासी जमातीवर आले आहे.ब्रिटिशांनी जंगलातून बाहेर काढले आता कुठेतरी शेती स्थिर होत होतो तर तिथूनही बाहेर काढण्याचे आणि नव्या जगामध्ये प्रवेश करण्यासाठी असलेल्या राखीव जागांमधूनही बाहेर काढायचे असे कारस्थान धनगर पुढार्‍यांनी फडणवीस यांच्या आशीर्वादाने आखले आहे.आदिवासींना गाडण्याचा हा चंग आहे आणि केवळ मतांसाठी फडणवीस करत आहेत.

खरंतर 1980 मध्ये मंडल आयोगासमोर साक्ष देताना धनगर नेत्यांनी स्वतःला ओबीसी म्हटले. 1991 मध्ये त्यांनी स्वतःला भटक्या विमुक्त घोषित करून मूळ भटके विमुक्त मसनजोगी,गोसावी, नंदीबैलवाले, कुडमुडे जोशी अशा पिढ्यानपिढ्या खरोखर भटकंती करणाऱ्या समूहाच्या राखीव जागांमध्ये प्रवेश मिळवला  आणि  नियम धाब्यावर बसून त्यांनी या सर्व मूळ भटक्यांच्य सवलती ,निधी लाटला आणि मूळ भटक्यांना देशोधडीला लावले असे मूळ भटक्यांचे नेते म्हणत आहेत. आता तशाच कॅटेगिरीची मागणी करत आदिवासींमध्ये ते येऊ इच्छितात. 2014 मध्ये फडणवीस साहेबांच्या आशीर्वादाने त्यांनी ही मागणी केली 2024  मराठ्यांच्या विरोधामध्ये यांचे पुढारी स्वतःला ओबीसी म्हणून घेतात आणि ते आंदोलन संपले की दुसऱ्या दिवशी आदिवासींच्या सवलतीत आम्हाला जागा द्या म्हणून आंदोलन करतात. हे नेमके  कोणत्या कॅटेगिरीचे/जातीचे आहेत हे ठरवण्याचे अधिकार यांनी स्वतःलाच घेतलेले आहेत. या देशांमध्ये डॉ बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेली राज्यघटना असं काही आहे की नाही असा प्रश्न पडावा अशा पद्धतीने  साधन संपत्तीच्या बळावर हे आदिवासीच्या सवलतीत, नोकऱ्या,शिक्षणात, शेतीत घुसखोरी करत आहेत 

     आणि म्हणूनच या भयानक संकटापासून आदिवासी जमातीला वाचवण्यासाठी आदिवासी समाजातील भगत पुजारी विधी कर्ते आता जारण- तारण- कारण- पूजा विधी करणार आहेत. हे विधी कर्ते निसर्गदेवता याह्यामोगी,कंसारा माता,वाघदेव, डोंगऱ्यादेव यांना मंत्राद्वारे आवाहन करणार आहेत आणि आदिवासींना वाचवण्यासाठी सरकारची दुर्बुद्धी रोखून ठेव , सुबुद्धी दे असे आवाहन हे विधी कर्ते करणार आहेत.धनगरांना आदिवासी जमातीत बसवण्याचा निषेध,पेसा क्षेत्रातील नोकर भरती सुरू करून 25000 आदिवासी तरुणांना रोजगार द्या,  अशा प्रकारच्या मागण्या घेऊन आदिवासी विधी कर्ते पुजारी आत्ताच्या घटस्थापनेच्या म्हणजे नवरात्रीच्या शेवटी  देवीला आवाहन करणार आहेत. घटस्थापना हा आदीमातेचा उत्सव आहे. सर्व भगत पुजारी उपाशीपोटी पूजा विधीला बसलेले आहेत.आणि याच पूजा विधीच्या शेवटी ते या घट उठवण्याचा दिवशी ते आवाहन करणार आहेत. आप,वायू, तेज, इत्यादी पंचमहाभूतांना आदिवासी हितासाठी जागवून त्यांना आवाहन करण्यात येणार आहे. दसऱ्यापासून गावोगाव पूजा विधी मंत्राच्या जागरातूनही शिंदे फडणवीस सरकारचे  दुर्बुद्धी दूर झाली नाही तर मंत्राचा दुसरा टप्प्यामध्ये जावे लागेल आणि त्यात आदिवासी बचाव बरोबरच आदिवासी हिताला धक्का पोहोचवणाऱ्या शक्तींना काबुत आणण्यासाठी नवा मंत्र म्हणावा लागेल आणि या मंत्रांबरोबर या हितशत्रूंची शक्ती ज्या राजकारणात आहे तिथूवन येत्या निवडणुकीत त्यांचा सुपडा साफ करण्याचे उपायविधी योजावे लागतील असा निर्धार आदिवासी हक्क संरक्षणासाठी जागृत आदिवासींनी केला आहे. दिनांक १० ऑक्टो. च्या मध्यरात्रीपासून जारण तारण कारण पूजा विधी महाराष्ट्रातील आदिवासी बहुल विभागांमध्ये सुरू करण्यात येईल असे आजच्या पत्रकार परिषदेत करणसिंग कोकणी, रंजीत गावित, विक्रा गावित यांनी सांगितले.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

 READ / SHARE  / FORWARD 
JANATA  NEWS  xPRESS

निरंतर सेवेच्या आर्थिक मदतीकरिता 
for Donation
G pay 8108603260 

संपादक: सुबोध शाक्यरत्न  
M : 8108658970

Email- pr.janata@gmail.com