कुळगाव बदलापुर पूर्व पोलिस ठाण्याच्या हद्दीतील आदर्श विद्यामंदिर मध्ये चिमुरड्यांवर झालेल्या लैंगिक आत्याचारा विरोधात सर्वात प्रथम धडाडीने आवाज उचलणाऱ्या पत्रकार श्रध्दा ठोंबरे यांना चौकशीसाठी २ सप्टेंबर रोजी गुन्हे शाखेच्या भिवंडी कार्यालयात चौकशी साठी हजर होण्याचे समंस बजावले. अल्पवयीन मुलीवर झालेल्या लैंगिक अत्याचार प्रकरण शाळा प्रशासन व पोलिस प्रशासन यांच्या संगनमताने दडपण्याचा प्रयत्न केला जात होता. तेव्हा त्या चिमुकल्या जिवांना न्याय मिळवून देण्यासाठी, पत्रकार श्रध्दा ठोंबरे यांनी जोरदार आवाज ऊचलला त्यामुळे शहरातील सर्व सामान्य नागरिक खडबडून जागा झाला आणि बदलापूर मध्ये भुतो न भविष्यती असा विशाल जन आंदोलन ऊभे राहिले आणि राज्यातच नाही तर देशभरात या आंदोलनाचे तीव्र पडसाद उमटले. त्यामुळे 'पोलिस प्रशासन आणि शाळा प्रशासनाचे धाबे दणाणले, तर सरकार मधील मंत्री, विरोधी पक्षनेते यांनी बदलापुर मध्ये धाव घेत. या प्रकरणाची गंभीर दखल घेतली आणि आरोपीला अटक करण्यात आली. पोलिस अधिकाऱ्यांवर निलंबनाची कारवाई करण्यात आली तर शाळा प्रशासनावर देखील पोस्को कायद्या अंतर्गत गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. अनेक आंदोलकांवर गुन्हे दाखल करून त्यांना अटक ही करण्यात आली परंतु प्रामाणिकपणे पत्रकार म्हणून आपले कर्तव्य बजावत असताना पत्रकार श्रध्दा ठोंबरे यांना देखील दंगली सारख्या गुन्ह्यात अडकवण्याचा प्रयत्न म्हणजे, लोकशाहीच्या चौथ्या स्तंभावर फार मोठा घाला आहे.
लोकपालक पत्रकार सुरक्षा संघटनेने पोलिस प्रशासनाच्या या कृत्याचा जाहीर निषेध केला आहे, पोलिस प्रशासन लोकशाहीच्या चौथ्या स्तंभाचा आदर करतील अशी अपेक्षा लोकपालक पत्रकार सुरक्षा संघटनेचे अध्यक्ष प्रदीप गोविंद रोकडे यानी व्यक्त केली आहे. लोकपालक पत्रकार सुरक्षा संघटना श्रध्दा ठोंबरे यांच्या पाठीशी खंबीरपणे उभी असून, वेळ पडल्यास संपूर्ण ताकदीनिशी आम्ही ही लढाई लढु आणि जिंकु देखील असे रोकडे यांनी म्हटले आहे.
पत्रकारांना विनाकारण अशा प्रकरणामध्ये अडकवून शासन दहशत निर्माण करीत असल्याबाबत बृहन्मुंबई यूनियन ऑफ़ जर्नलिस्टस या संघटनेनेही याचा जाहीर निषेध केला आहे. बदलापुरातील पोलिसांचे एकूण वर्तन बघता त्यांची ही कृती संताप जनक आणि निषेधार्य आहे. बृहन्मुंबई युनियन ऑफ जर्नलिस्टस पोलिसांच्या या मनमानीचा निषेध करीत आहे. या घटनेला जबाबदार असणारे पोलीस प्रशासन आणि वार्तांकन करणाऱ्या पत्रकारांशी अर्वाच्य भाषेत बोलणारे व धमकी देणारे माजी महापौर वामन म्हात्रे यांचा बृहन्मुंबई युनियन ऑफ जर्नालिस्ट (BUJ) जाहीर निषेध करीत आहे.
महाराष्ट्रातील ठाणे जिल्ह्यातील बदलापूर या शहरात 12 ऑगस्ट रोजी नर्सरीच्या दोन विद्यार्थिनींवर कथित विनयभंग झाला. ही बातमी प्रकाशित झाली आणि एकच खळबळ उडाली. पोलिसांनी प्रथम माहिती अहवाल ( FIR) नोंदविण्यास टाळाटाळ केली पण नंतर FIR नोंदवून लैंगिक शोषणाचा आरोप असणाऱ्या आरोपीला अटक केली. यासाठी बदलापुरातील सजग जनतेने रस्त्यावर उतरून या घटनेचा तीव्र निषेध केला. विविध माध्यमांनी ही बातमी लावून धरली. अनेक पत्रकार बदलापूर मध्ये माहिती घेत होते. खूप मोठ्या प्रमाणात मीडिया कव्हरेज होत होते. त्यामुळे बदलापूरचे माजी महापौर वामन म्हात्रे संतप्त झाले होते. सकाळच्या पत्रकार मोहिनी जाधव यांच्याशी बोलताना वामन म्हात्रे यांनी खूप खालच्या पातळीवर जाऊन त्यांच्यावर घाणेरडे आरोप केले. पत्रकार मोहिनी जाधव या बदलापूर पोलीस स्टेशनला रीतसर तक्रार करण्यासाठी गेल्या असता त्यांना तक्रार करण्यापासून परावृत्त करण्यासाठी पोलिसांनी दबाव टाकला पण मोहिनी जाधव या आपल्या निर्णयावर ठाम राहिल्या. शेवटी पोलिसांनी नाईलाजास्तव FIR दाखल केला परंतु वामन म्हात्रे यांचा अटकपूर्व जामीन कोर्टाने नामंजूर करूनही त्यांना अद्याप अटक करण्यात आलेली नाही. असे असताना आता बदलापूर प्रकरणात वार्तांकन करणाऱ्या पत्रकारांना दोषी ठरवून त्यांच्यावर गुन्हे दाखल करण्याची मोहीम बदलापूर पोलिसांनी सुरू केली आहे. श्रद्धा ठोंबरे या महिला पत्रकारावर लोकांच्या भावना भडकावल्याचा गुन्हा दाखल करून त्यांना पोलीस ठाण्यात हजर राहण्याची नोटीस बजावण्यात आली आहे. रेल्वे पोलिसांनी सुद्धा पत्रकारांना टार्गेट करायला सुरुवात केली आह.
म्हात्रे यांचा अटकपूर्व जामीन कल्याण न्यायालयाने दोनदा तर मुंबई उच्च न्यायालयाने एकदा फेटाळूनही वामन म्हात्रे यांना पोलीस अटक करत नाही आहेत. ज्या शाळेत मुलींवर अत्याचार झाला त्या शाळेच्या व्यवस्थापनाला पोलीस पाठीशी घालत आहेत परंतु वार्तांकनाचं काम करणाऱ्या पत्रकारावर गुन्हे दाखल करून त्रास देण्याचं काम चालू आहे. बदलापुरातील पोलिसांचे एकूण वर्तन बघता त्यांची ही कृती संताप जनक आणि निषेधार्य आहे. बृहन्मुंबई युनियन ऑफ जर्नालिस्ट(BUJ) मागणी करीत आहे की, कर्तव्यावर असणाऱ्या पत्रकारांना पूर्णपणे कायद्याचे संरक्षण प्राप्त व्हावे. त्यांना काम करताना राजकीय शक्ती किंवा पोलीस यापासून संरक्षण मिळावे. पत्रकारांना त्रास देण्याचे पोलिस प्रशासनाने ताबतोब थांबवावे. तसेच मुंबई उच्च न्यायालयाने वामन म्हात्रे यांचा अटकपूर्व जामीन नामंजूर केलेला आहे त्यामुळे वामन म्हात्रे यांना ताबडतोब अटक करण्यात यावी. तसेच, वामन म्हात्रे यांच्या अटकेला होत असलेल्या दिरंगाईबद्दल बीयूजे चिंतेत आहे. कल्याण सत्र न्यायालयाच्या आदेशाविरोधातील त्यांचे अपील उद्या मुंबई उच्च न्यायालयात होणार आहे. वामन म्हात्रे यांच्यावर कारवाई करण्यात आणखी विलंब झाल्यास माध्यमांना धमक्या देणारे सत्ताधारी पक्षाचे राजकारणी सुरक्षित असल्याचा संदेश जाईल. स्वतंत्र पत्रकार आणि युट्युबर्सविरुद्ध पोलिसांची धमकावणारी कारवाई त्वरित थांबली पाहिजे. अशी मागणी BUJचे सचिव इंद्र कुमार जैन यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे केली आहे.
0 टिप्पण्या