Top Post Ad

खेटरं पुजेची वेळ आली आहे.....!!

संविधान धोक्यात आहे हे समजल्यामुळे मतदान प्रस्थापित राजकीय पक्षांना करा म्हणून फतवा काढणा-या विचारवंतांची बुद्धी आता कुठं गेली पेंड खायला.??   तुम्ही विचारवंत आहात, तुम्हाला जगात घडणाऱ्या घडामोडीं वरुन भविष्याचा अदमास घेता येतो असा तुमचा दावा आहे आणि म्हणून तुम्ही २०२४ च्या लोकसभा निवडणुकी मध्ये कुणाला मते द्यावीत आणि कुणाला देऊ नयेत असा पवित्रा घेतला आणि आम्ही शहाणे आहोत. विचारवंत आहोत असे समाजाला दाखविण्याचा प्रयत्न केला...!!  २०२४ ची लोकसभा संपल्यानंतर मुंबई उपनगरी मधील पवई येथील गरीबांच्या ७०० झोपड्या ऐन पावसात  अतिक्रमणाच्या सबबीखाली तोडण्यात आल्या. त्या ७०० कुटुंबाचा आक्रोश तुम्हाला ऐकू आला नाही, त्या कुटूंबाचे हाल आपणांस दिसले नाही. सामाजिक बांधिलकी म्हणून, मानवता म्हणून प्रस्थापित राजकीय पक्षाकडे तुम्ही मागणी केल्याचा कोणताच अर्ज, निवेदन किंवा  सह्या करुन फतवा काढला नाही...!! 


 अतिक्रमण धारक भूमीहीन शेतकरी, आणि अतिक्रमण धारक घरांच्या नोटीस काढून त्यांना पिक घेण्यापासून आणि घरांचे अतिक्रमण हटवून त्यांना बेदखल करण्याची कार्यवाही सरकारकडून केल्या गेली त्या गरीबांच्या जगण्यातील असहाय्य अवस्था तुम्हाला दिसली नाही. त्यांच्या जगण्या मरण्याच्या परिस्थिती बदल तुमच्या मनात थोडीशीही करुणा निर्माण झाली नाही तुम्ही विरोधी पक्षांना  सह्यांचे निवेदन देऊन सहज सांगू शकले असते परंतु  तुम्ही तसे केले नाही...!!  नागपूर येथील दीक्षा भूमीवर अंडरग्राउंड पार्किंगच्या नावाखाली दीक्षा भूमी उध्वस्त करण्याची कृती केल्या गेली. आजही तिथं पावसाचे पाणी तुंबुन दीक्षाभूमी येथील स्तुपाला धोका निर्माण झाला आहे. त्या ऐतिहासिक वारस्याला धोका निर्माण झाला तरीही विचारवंत जागा झाला नाही.त्याबाबत आपणं काहीच बोलतं नाही. सरकार दरबारी सह्याचे निवेदन देण्याची साधी बुद्धी विचारवंत म्हणवून घेणाऱ्या लोकांना सुचत नाही.?? 

संविधान धोक्यात आहे हे फक्त निवडणूक आली तेव्हाच तुम्हाला कळतेय.महाराष्ट्रातील विधानपरिषदेच्या निवडणुकीत कॉंग्रेस पक्षाच्या ८ आमदारांनी भाजपला मतदान करुन संविधानाचा गळा घोटला, लोकशाहीचा मुडदा पाडला. त्या संदर्भात पुरोगामी म्हणून टेंभा मिरविणा-या नेत्यांना तुम्ही जाब विचारला नाही. त्या संदर्भात सुद्धा विचारवंत म्हणवून घेणारे सह्या करुन फतवा काढू शकले नाही...!!  संशोधन करणाऱ्या विद्यार्थ्यांना स्कॉलरशिप, फेलोशिप मिळतं नाही म्हणून बार्टीचे विद्यार्थी रस्त्यावर येऊन लढतं होते तो आक्रोश तुम्हाला ऐकू आला नाही, ती तरुणांची असहाय्य अवस्था विचारवंतांना दिसली नाही.त्या संदर्भात अर्ज, निवेदन, सह्यांचा फतवा काढल्याचे ऐकू आले नाही, व्वा रे विचारवंत.?? 

मी मुंबई मध्ये बसुन नामांतर केले ती चुक होती. अशा प्रकारचे विधान शरद पवार यांनी केले आहे. नामांतर केले ही चुक होती म्हणणा-या दगाबाज नेत्याला जाब विचारण्याची हिम्मत विचारवंत करतील का.?  समाजाच्या एकाही प्रश्नावर आपणं बोलतं नाही, व्यक्त होतं नाही, समाजाची एकही समस्या आपणांस दिसतं नाही.समाजाचा आक्रोश आपणांस ऐकू येत नाही अश्या मुक्या, बहि-या,संवेदना शुन्य विचारवंतांनी ऐन निवडणुकीच्या काळात सह्या करुन फतवा काढावा आणि आंबेडकरी विचारांच्या राजकीय पक्षांना मते देऊ नये असा पवित्रा घ्यावा हे घरभेदी पणाचे लक्षणं आहे...!!   लोकसभेमध्ये तुम्ही समाजाला भुल देण्यात यशस्वी झाले हे पुन्हा होऊ नये म्हणून तुमच्या नाकर्तेपणाचा पाढा वाचावा लागला आहे...!!  

महाकाव्यात दाखला आहे की, रावणाची सोन्याची लंका जळून राख झाली ती बिभीषणाच्या फितुरी मुळे...!!  सोन्याची लंका वाचवता आली असती, जर रावणाने बिभीषणाचा बंदोबस्त केला असता तर...!!  इतिहासात दाखला आहे छत्रपती शिवाजी महाराजांनी रयतेचे राज्य निर्माण करण्यासाठी आपल्याच समुहातील गैरवर्तनी रांझ्याच्या पाटलाचे हातपाय कलम केले होते. जावळीच्या मो-यांचा आणि मराठा सरदारांचा बंदोबस्त केला होता...!!  ज्यांच्या कडे सामाजिक बांधिलकी नाही. बुद्धाची करुणा नाही. वैचारिक प्रामाणिकता नाही. अशा संवेदना हीन स्वतः ला आंबेडकरी विचारवंत म्हणवून घेत निवडणुकीच्या काळात राजकीय सल्ले द्यायला आले तर त्यांची खेटरं पुजा केली पाहिजे. विधानसभा तोंडावर आहे. आणि आंबेडकरी विचारधारेचे राजकीय पक्ष संपवण्यासाठी मनुवादी राजकीय पक्ष आणि नेतृत्व घरभेदी कामाला लावणार असे संकेत मिळतं आहेत...!! 

आंबेडकरी समुहाने खेटरं पुजेची तयारी केली पाहिजे...!! 

@.. भास्कर भोजने.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

 READ / SHARE  / FORWARD 
JANATA  NEWS  xPRESS

निरंतर सेवेच्या आर्थिक मदतीकरिता 
for Donation
G pay 8108603260 

संपादक: सुबोध शाक्यरत्न  
M : 8108658970

Email- pr.janata@gmail.com