सरकार एकीकडे उद्योगांना पूरक वातावरण निर्माण करीत असल्याच्या घोषणा करीत आहे. मात्र ग्रामीण भागातील मूलभूत सुविधांची परिस्थिती पाहता सरकारच्या घोषणा पोकळ असल्याचे सिद्ध होत आहे. परिणामी, खराब रस्ते व अपुऱ्या सुविधांच्या कारणांवरून कंपन्या महाराष्ट्र सोडून चालल्या आहेत. हिंजवडी आयटी पार्कचे काम २५ वर्षांपूर्वी सुरू झाले. रस्ते, पाणी, वीज, घनकचरा व्यवस्थापन या मूलभूत सुविधा आता कमी पडत आहेत. पार्कमध्ये एकूण 139 आयटी कंपन्या कार्यरत आहेत, जिथे 2,17,412 कर्मचारी काम करत आहेत. गेल्या काही वर्षांत आयटी पार्कचा विस्तार करण्यात आला. मात्र, मूलभूत सुविधांमध्ये कोणतीही वाढ झालेली नाही. जुन्या पायाभूत सुविधांची अवस्था दयनीय आहे. उद्यानातील रस्ते अरुंद आणि दयनीय अवस्थेत आहेत. येथे वाहतूक कोंडी ही रोजचीच बाब झाली आहे. पुण्यातील वाहतूककोंडी तसेच इतर प्रश्नांमुळे अनेक आयटी कंपन्यांनी दुसरीकडे स्थलांतरित होण्याचा निर्णय घेतला. मागील दहा वर्षांत तब्बल ३७ आयटी कंपन्या हिंजवडी राजीव गांधी इन्फोटेक पार्कमधून बाहेर गेल्या असल्याचा उद्योग संघटनेने दावा केला आहे. . त्यामुळे बेरोजगारीचे प्रमाण वाढतच आहे.
एकीकडे सरकारी कंपन्या, आस्थापनांची सर्व प्रमुख कार्यालये गुजरातला वळवण्यात आली आहेत तर काही त्या वाटेवर आहेत. तर आता खासगी कंपन्यांनीही गुजरातची वाट धरली आहे. पुण्यातील क्रेन कंपनी गुजरातला स्थलांतरित होत आहे. त्यामुळे जवळपास ४०० कर्मचाऱ्यांवर रोजगार गमावण्याची वेळ आली आहे. मुळशी तालुक्यातील धनवेवाडी येथे युनायटेड क्रेन प्रायव्हेट लिमिटेड ही क्रेन कंपनी आहे. व्यवस्थित रस्ता नसल्याचे कारण देत कंपनीने महाराष्ट्रातील प्रकल्प बंद करून गुजरातला जाण्याचा निर्णय घेतला आहे. मागील बारा वर्षांपासून पुण्याच्या पौड धनवेवाडी रस्त्यावर ही कंपनी काम करत होती. या परिसरात रस्त्याची प्रचंड दुरवस्था झाली आहे. सरकार दरबारी रस्ते दुरुस्तीसाठी पाठपुरावा करण्यात आला. मात्र सरकारकडून कंपनीच्या मागण्यांकडे दुर्लक्ष करण्यात आले. वारंवार विनंती करूनही सरकारने कुठलाच प्रतिसाद दिलेला नाही. त्यामुळे कंपनीची गैरसोय होत आहे. कंपनीत अवजड क्रेन बनवल्या जातात. रस्त्याच्या दुरवस्थेमुळे कंपनीत मोटर ट्रक किंवा कंटेनर येणे खडतर बनले आहे. कंपनीसह स्थानिक नागरिकांनीही रास्ता दुरुस्तीसाठी अनेक प्रयत्न केले, मात्र त्यांच्या मागण्यांनाही प्रशासनाकडून वाटाण्याच्या अक्षता लावण्यात आल्या. सरकारच्या याच अनास्थेमुळे क्रेन कंपनी आपला पुण्यातील प्रकल्प बंद करून गुजरातला जात आहे.
हिंजवडीतील राजीव गांधी इन्फोटेक पार्क गेल्या 10 वर्षांत 37 कंपन्यांनी सोडल्याचा दावा हिंजवडी इंडस्ट्रीज असोसिएशनने केला मात्र महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाने (एमआयडीसी) संघटनेचा दावा फेटाळून लावला. याशिवाय एमआयडीसीने असोसिएशनकडून ३७ कंपन्यांची यादी मागवली आहे. दरम्यान, या विषयावर राज्य सरकारच्या यंत्रणेची उच्चस्तरीय बैठक अद्याप व्हायची आहे. एमआयडीसीच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, हिंजवडी आयटी पार्कमध्ये नवीन कंपन्यांसाठी जागा उपलब्ध नाही. त्यामुळे नवीन कंपन्यांचे अर्ज फेटाळले जात आहेत.
0 टिप्पण्या