सत्ताधारी पक्षाकडूनच प्रक्षोभक विधाने करून धार्मिक तेढ निर्माण करणाचा प्रयत्न होत आहेत. लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधींना जीवघेण्या धमक्या, FIR दाखल पण कारवाई काहीच नाही. याबाबत राज्य सरकारला कारवाईसाठी निर्देश देण्याच्या मागणीसाठी काँग्रेसच्या शिष्टमंडळाने राजभवनावर राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन यांची भेट घेतली. या शिष्टमंडळात काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, विधिमंडळ काँग्रेस पक्षाचे नेते बाळासाहेब थोरात, विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार, CWC सदस्य आणि प्रदेश कार्याध्यक्ष नसीम खान, मुंबई काँग्रेसच्या अध्यक्षा खा. वर्षा गायकवाड, विधान परिषद गटनेते सतेज बंटी पाटील, माजी मंत्री आ. अस्लम शेख, राज्यसभा खासदार चंद्रकांत हांडोरे, आमदार भाई जगताप, आमदार अमिन पटेल, प्रदेश सरचिटणीस सचिन सावंत, प्रवक्ते सुरेशचंद्र राजहंस, आदी उपस्थित होते.
भाजपा महायुती सरकारच्या काळात सत्ताधारी पक्षाचे आमदार, खासदार व नेतेच खुले आम गुंडगिरी करत आहेत. कायदा व सुव्यवस्थेची परिस्थिती अत्यंत गंभीर आहे. सत्ताधारी नेते पोलिसांनाच धमक्या देत असल्याने कारवाई होते नाही. महिला व मुलींच्या अत्याचारात मोठी वाढ झालेली आहे, बदलापूरमधील चिमुकल्यांवर अत्याचार, कोल्हापुर जिल्ह्यात दोन समाजात तेढ निर्माण करण्याचा प्रकार झाले. धार्मिक तेढ निर्माण करणारी चिथावणीखोर विधाने केली जात आहेत परंतु महायुती सरकार या गुंडगिरीला लगाम घालण्यात अपयशी ठरले आहे. महामहिम राज्यपाल यांनीच आता हस्तक्षेप करून कारवाई करण्याचे निर्देश सरकारला द्यावेत, अशी मागणी मुंबई काँग्रेसच्या अध्यक्ष खासदार वर्षा गायकवाड यांनी यावेळी केली.भाजपा युती सरकारने भ्रष्टाचाराचा कळस गाठला आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यातही भ्रष्टाचार केला आहे. लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांना भाजपा महायुतीच्या नेत्यांनी जीवघेण्या धमक्या दिल्या आहेत, याप्रकरणी गुन्हे दाखल करण्यात आले पण त्यांच्यावर काहीच कारवाई होत नाही. राहुल गांधी यांच्याबद्दल जी भाषा वापरली आहे ती अत्यंत निषेधार्ह, आक्षेपार्ह व संवैधानिक पदाचा अपमान करणारी आहे. विरोधी पक्ष नेत्याचा सन्मान राखण्याची आपली परंपरा व संस्कृती राहिली आहे पण सत्ताधारी पक्षाचे नेते विरोधी पक्षनेत्याच्या जीवाला धोका पोहचवावा अशी विधाने करत आहेत. सत्ताधारी पक्षाचे काही नेते जाणीवपूर्वक दोन समाजात तेढ निर्माण करून धार्मिक वातावरण बिघडवण्याचे काम करत आहेत. राज्यातील शांतता भंग करण्याचा प्रयत्न सुरु असताना राज्याचे मुख्यमंत्री, गृहमंत्री, दोन्ही उपमुख्यमंत्री काहीच कारवाई करत नाहीत हे अत्यंत दुर्दैवाचे आहे. काँग्रेसच्या शिष्टमंडळाने राज्यातील सद्य परिस्थितीची माहिती राज्यपाल महोदयांना दिली. यासंदर्भात योग्य ती कारवाई करु असे आश्वासन राज्यपाल महोदयांनी दिले असल्याचेही खासदार वर्षा गायकवाड यांनी सांगितले.
0 टिप्पण्या