Top Post Ad

मुंबईकरांचे आरोग्य निरोगी व सुदृढ ठेवण्याकामी स्वच्छता मित्रांचा मोलाचा वाटा


  मुंबई महानगराला स्वच्छ व सुंदर राखून, मुंबईकरांचे आरोग्य निरोगी व सुदृढ ठेवण्याकामी स्वच्छता मित्रांचा मोलाचा वाटा आहे. स्वच्छता मित्रांचे आरोग्य सुस्थितीत राहिले तरच मुंबईकरांचे आरोग्य सुस्थितीत राहील. यासाठी बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या वतीने स्वच्छता कर्मचाऱ्यांसाठी वेळोवेळी आरोग्य तपासणी शिबिरांचे आयोजन केले जाते. याद्वारे स्वच्छता कर्मचाऱ्यांमध्ये आरोग्याबाबत जागृती निर्माण होण्यास मदत मिळते, असे प्रतिपादन महानगरपालिका आयुक्त तथा प्रशासक  भूषण गगराणी यांनी केले.

केंद्र आणि राज्य शासनाच्या निर्देशानुसार, बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या वतीने राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या जयंतीनिमित्त दिनांक १७ सप्टेंबर २०२४ ते दिनांक ०२ ऑक्टोबर २०२४ दरम्यान 'स्वच्छता ही सेवा' पंधरवडा राबवण्यात येत आहे. यावर्षी ''स्वभाव स्वच्छता - संस्कार स्वच्छता'' ही संकल्पना अभियानात राबविण्यात येत आहे. या अंतर्गत बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या २४ प्रशासकीय विभागात आज (दिनांक २८ सप्टेंबर २०२४) विशेष स्वच्छता मोहीम राबविण्यात आली. तसेच स्वच्छता कर्मचाऱ्यांसाठी विभागनिहाय आरोग्य शिबिर भरवण्यात आले. महानगरपालिका आयुक्त तथा प्रशासक भूषण गगराणी, अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त (शहर) डॉ. अश्विनी जोशी यांच्यासह विविध परिमंडळ उप आयुक्त, विभागाचे सहायक आयुक्त या अभियानात सहभागी झाले. स्थानिक बचत गटातील महिला, शालेय आणि महाविद्यालय विद्यार्थी, स्वयंसेवी संस्था, नागरिक संघ तसेच स्वच्छतादूत यांचा अभियानास उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. स्वच्छतेची शपथ ग्रहण करत मुंबई स्वच्छ व सुंदर ठेवण्याचा संकल्प नागरिकांनी केला.

महानगरपालिका आयुक्त श्री. भूषण गगराणी म्हणाले की, स्वच्छता कर्मचारी आपली जबाबदारी अविरतपणे व उत्तमरीत्या पार पडत असतात. ही जबाबदारी पार पाडत असताना बऱ्याच वेळा आरोग्याकडे दुर्लक्ष होते. 'स्वच्छता ही सेवा पंधरवडा' निमित्त विविध उपक्रम राबविण्यात येत आहेत. त्यात स्वच्छता मित्र आरोग्य तपासणी शिबिर हा विशेष उपक्रम महानगरपालिकेच्या वतीने राबविला जात आहे. मुंबई महानगर स्वच्छ ठेवण्यात महत्त्वाची भूमिका बजावणाऱ्या स्वच्छता कर्मचाऱ्यांच्या आरोग्याची काळजी घेतली जावी, हा या उपक्रमाचा प्रमुख हेतू आहे. स्वच्छता कर्मचाऱ्यांच्या आरोग्य विषयक समस्या जाणून घेऊन त्यांच्यावर योग्य ते उपचार करणे, मार्गदर्शन व तज्ज्ञांचा सल्ला उपलब्ध करून देणे, हे महानगरपालिकेचे कर्तव्य आहे. जास्तीत जास्त स्वच्छता कर्मचाऱ्यांनी या आरोग्य शिबिरांचा लाभ घ्यावा. तसेच आपल्या सहकाऱ्यांनाही या शिबिराचा लाभ घेण्याबाबत अवगत करावे, असे आवाहन देखील गगराणी यांनी केले. स्वच्छता कर्मचाऱ्यांनी आरोग्य शिबिराच्या माध्यमातून आज मोठ्या संख्येने प्राथमिक तपासणी करून घेतली. महानगरपालिका कर्मचाऱ्यांबरोबरच स्वच्छ मुंबई प्रबोधन अभियान अंतर्गत कार्यरत स्वयंसेवक, रस्ते स्वच्छता अभियान अंतर्गत कार्यरत कंत्राटी कामगार - कर्मचारी, वाहन चालक यांनी देखील या शिबिरात आरोग्य तपासणी करून घेतली.

बृहन्मुंबई महानगरपालिका कार्यक्षेत्रामध्ये ओला कचरा व सुका कचरा वर्गीकरण करणे बंधनकारक करण्यात आले आहे. त्या अनुषंगाने, स्वच्छता ही सेवा या अभियान अंतर्गत विविध महाविद्यालयीन युवक - युवतींनी, शालेय विद्यार्थ्यांनी ठिकठिकाणी जनजागृती फेरी काढत सार्वजनिक स्वच्छता व कचरा व्यवस्थापनाचा जागर केला. तसेच घरोघरी जाऊन ओला कचरा, सुका कचरा वर्गीकरणाबाबत तसेच सार्वजनिक ठिकाणी कचरा न टाकण्याबाबत जनजागृती केली. महानगर स्वच्छतेला दिशा मिळत असताना मुंबईकर नागरिकांनीही स्वतःहून कचरा वर्गीकरण प्रक्रियेत सहभागी व्हावे, असे आवाहन जनजागृती फेरीच्या माध्यमातून करण्यात आले आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

 READ / SHARE  / FORWARD 
JANATA  NEWS  xPRESS

निरंतर सेवेच्या आर्थिक मदतीकरिता 
for Donation
G pay 8108603260 

संपादक: सुबोध शाक्यरत्न  
M : 8108658970

Email- pr.janata@gmail.com