Top Post Ad

पर्यावरण संवर्धनासाठी समर्पित व्यक्तिमत्व पद्मश्री डॉ. (सौ.) जनक पल्टा मॅकगिलिगन

 इंदूरमधील बार्ली डेव्हलपमेंट इन्स्टिट्यूट फॉर रुरल वुमनच्या माजी संचालक आणि इंदूर जिल्हाच्या सानवाडिया गावात शाश्वत विकासासाठी जिमी मॅकगिलिगन सेंटरच्या वर्तमान विद्यमान संचालक  डॉ. (सौ.) जनक पल्टा मॅकगिलिगन यांनी आपल्या मुंबईतील दौऱ्यादरम्यान शाळेतील विद्यार्थ्याना महिला सक्षमीकरण आणि पर्यावरण संवर्धनाचे धडे दिले. दक्षिण मुंबईतील विविध शाळांमधील वि‌द्यार्थ्यांसोबत. तसेच एसएनडीटी महिला वि‌द्यापीठ आणि निर्मला निकेतन कॉलेज ऑफ सोशल वर्क या प्रतिष्ठित संस्थांमध्येही त्यांनी याबाबत संवाद साधला.  आपल्याला सशक्तीकरण, समानता, आणि पर्यावरण संवर्धनासाठी  बहाईची शिकवण कशी उपयोगी पडते याबाबत संवाद साधला. सहयोगी प्रयत्नांचा उद्देश सकारात्मक बदलांना प्रेरणा देणे आणि सशक्तीकरण आणि टिकाऊपणाची संस्कृती वाढवणे आहे. किशोरवयीन युवक, शिक्षण, विश्वास-प्रेरित मूल्ये आणि चांगल्या जगाची दृष्टी यांचे प्रभावी मिश्रण करण्याचे आश्वासन त्यांनी विद्यार्थी वर्गाला दिले. 30 ऑगस्ट  रोजी, मुंबईच्या बहाई केंद्रात आयोजित पत्रकार परिषदेत त्यांनी आपल्या जीवनकार्याबाबत अनेक पैलुंचा उलगडा केला. सामाजिक कार्य करतांना आलेले विविध अनुभव त्यांनी यावेळी सांगितले. यावेळी त्यांच्यासोबत बहाई सेंटरच्या सेक्रेटरी नर्गिस गौर आणि इतर पदाधिकारी उपस्थित होते. 

सौर ऊर्जा तंत्रज्ञानाचा वापर करून निसर्ग व पर्यावरण यांचा समतोल साधत त्यालाच आदिवासींकरिता रोजगाराचे साधन बनवणाऱ्या  पद्मश्री श्रीमती जनक पल्टा मॅगीलिगन या समाजातील प्रत्येक घटकाला मानवतेचा संदेश देत आहेत. आर्थिक, सामाजिक, शैक्षणिक व राजकीय सर्व क्षेत्रांमध्ये महिलांना पुरुषांच्या बरोबरीने हक्क व दर्जा प्रदान करून देणे, विकासाठी संधी उपलब्ध करून देणे, आणि स्त्री-पुरुष असमानता नष्ट करणे, स्त्री सक्षमीकरण केवळ उपदेश देऊनच नाही तर प्रत्यक्षात कृतीद्वारे करणाऱ्या डॉ. जनक पल्टा मॅकगिलिगन या आदीवासी पट्ट्यातील महिला आणि युवतींच्या मसिहा बनल्या आहेत. 

 मध्यप्रदेश इंदौर जिल्ह्यातील सनावडिया गावात असलेल्या 'जिमी मॅगिलिगन सेंटर फॉर सस्टेनेबल डेव्हलपमेंट या संस्थेच्या माध्यमातून आदीवासी गावांमधून आजपर्यंत ५०० गावात सौर ऊर्जा संयंत्रे बसवली. कुकर बसवले. आदिवासी मुलींना स्वयंरोजगारासाठी प्रवृत्त करणे याबाबत मार्गदर्शन करण्यात डॉ. मॅकगिलिगन यांनी आपले आयुष्य खर्ची घातले आहे . डॉ. मॅक गिलिगनच्या नवकल्पनांचा विस्तार सोलर टी स्टॉल्सपर्यंत झाला आहे. संपूर्ण भारतात लाखो चहाचे स्टॉल्स आहेत. चहा बनवण्यासाठी स्वच्छ, शाश्वत सौर ऊर्जेचा वापर केल्याने उद्योगाच्या संधी निर्माण झाल्या आणि वायू प्रदूषण कमी होत आहे. या संस्थेने ४० हजार विद्यार्थ्यांना शाश्वत विकासाचे प्रशिक्षण दिले आहे. सध्या या संस्थेत १ लाख ७८ हजार ६०० विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. डॉ. मॅकगिलिगन या जैविक सेतूचे सह-संस्थापक आणि सोलर फूड प्रोसेसिंग नेटवर्क इंडियाच्या राष्ट्रीय समन्वयक देखील आहेत. १९८५ ते २०११ या कालावधीत म्हणजे २६ वर्षात बार्ली ग्रामीण महिला विकास संस्थेच्या संचालक म्हणून काम केले आहे. आज ७० व्या वर्षीही त्या आपले सामाजिक कार्य अथक परिश्रमाने करीत आहेत. 

समाजातील विविध स्तरांत राहणाऱ्या लोकांनी प्रथमतः आपल्या घरापासूनच कचरा निर्मित होऊ नये म्हणून काळजी घ्यायलाच हवी. सूर्यापासून निर्मित सोलर एनर्जीपासून अन्न शिजविणे, पाणी गरम करणे, वीज निर्मिती करणे या करिता आम्ही गेली ४० वर्षे अथक परिश्रम घेत आहोत. मात्र समाजातील सर्व घटक आजही यात उत्फूर्तपणे सहभागी होत नसल्याने पर्यावरण सुरक्षित ठेवण्याच्या मोहिमेत शिथिलता निर्माण झालेली आहे. याकरिता सोलर एनर्जीची यंत्रे निर्माण करून दुर्गम खेडोपाडी तसेच आदिवासींची वस्ती असलेल्या भागात पोहचवणे गरजेचे आहे.  स्वयंपाक करण्यासाठी जेव्हा लाकडाचा आणि केरोसीनचा मोठा वापर व्हायचा, तेव्हा फक्त श्रीमंत लोकांना केरोसीन घेणे परवडत असे. मात्र गरीब आणि आदिवासी लोकांना त्यातही विशेषतः मुलींना आणि महिलांना जंगलात लाकडे गोळा करण्यासाठी जावे लागत असे. तेव्हा त्या लैंगिक अत्याचाराच्या बळी ठरत होत्या. या महिलांना एकत्र करून त्यांच्यात शिक्षणाची आवड निर्माण करून त्यांना प्रशिक्षित केले. आणि आज त्या उत्तम जीवन जगत आहेत. हे कार्य आता असेच पुढे सुरू रहावे यासाठी समाजातील प्रत्येक घटकाने समर्पित भावनेने हे काम केले पाहिजे असे आवाहन त्यांनी यावेळी केले. 

डॉ. जनक पल्टा मॅकगिलिगन यांचा जन्म 16 फेब्रुवारी 1948 रोजी जालंधर, पंजाब येथे झाला. बार्ली इन्स्टिट्यूटची स्थापना करण्यासाठी त्या इंदूरमध्ये आल्या आणि 1985 ते 2011 या कालावधीत त्यांनी संचालक म्हणून कार्य केले, जिथे त्यांनी आदिवासी आणि ग्रामीण पार्श्वभूमीतील हजारो महिलांना एक बोधवाक्यसह त्यांनी प्रशिक्षण दिले, “ते विद्यार्थी म्हणून बार्लीला येतात पण शिक्षक म्हणून जातात – म्हणजे हे शिकवले की जेव्हा ते त्यांच्या गावात परत जातील तेव्हा ते त्यांच्या ज्ञानाचा प्रसार करतील.” नोव्हेंबर 1988 मध्ये त्यांचे लग्न युनायटेड किंगडममधील मिस्टर जेम्स मॅकगिलिगन (जिमी म्हणून ओळखले जाणारे) ह्यांच्यासोबत झाले, जे आदिवासी आणि ग्रामीण पार्श्वभूमीतील हजारो महिलांना प्रशिक्षित करण्याच्या त्यांच्या प्रयत्नांमध्ये मन:पूर्वक सामील झाले. श्री. जेम्स मॅकगिलिगन यांना ओबीई प्रदान करण्यात आला, ज्याचा अर्थ ऑफिसर ऑफ द ऑर्डर ऑफ द ब्रिटिश एम्पायर आहे. हा पुरस्कार इंग्लंडच्या राणीद्वारे, समाजासाठी महत्त्वपूर्ण योगदान दिलेल्या लोकांना दिला जातो.

2011 मध्ये, बार्ली इन्स्टिट्यूटमध्ये 26 वर्षे सेवा केल्यानंतर, त्या इंदूरपासून सुमारे एक तासाच्या अंतरावर असलेल्या सनावडिया नावाच्या एका छोट्या गावात स्थलांतरित झाल्या, जिथे त्या आता जिमी मॅकगिलिगन सेंटर फॉर सस्टेनेबल डेव्हलपमेंटच्या संचालक म्हणून काम करत आहेत. 2015 मध्ये त्यांना भारत सरकारचा चौथा सर्वोच्च भारतीय नागरी पुरस्कार पद्मश्रीने सन्मानित करण्यात आले. मानवतेच्या सेवेसाठी, विशेषत: आदिवासी आणि ग्रामीण पार्श्वभूमीतील दलित महिलांसाठी समर्पित असलेल्या त्यांच्या जीवन प्रवासाबद्दल त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. साक्षरता, दैनंदिन जीवनात सौर ऊर्जेचा वापर, आरोग्य आणि स्वच्छता आणि इतर अनेक आवश्यक कौशल्यांद्वारे महिलांना सक्षम बनवण्याच्या त्यांच्या प्रयत्नांबद्दलही त्यांनी माहिती दिली, जेणेकरून त्या महिला त्यांच्या आणि त्यांच्या गावांत सुधारणा करण्यात यशस्वी झाल्या.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

 READ / SHARE  / FORWARD 
JANATA  NEWS  xPRESS

निरंतर सेवेच्या आर्थिक मदतीकरिता 
for Donation
G pay 8108603260 

संपादक: सुबोध शाक्यरत्न  
M : 8108658970

Email- pr.janata@gmail.com