बदलापूर लैंगिक अत्याचार प्रकरणातील आरोपी अक्षय शिंदेच्या पोलीस चकमकीने (एन्काऊंटर) पुन्हा एकदा १९८० च्या दशकातील पोलीस चकमकींच्या इतिहासाची चर्चा सुरू झाली आहे. १९८० ते २०१० या कालखंडात २०० हून अधिक संशयित आणि आरोपी पोलीस चकमकीत मारले गेले. त्याच पार्श्वभूमीवर मुंबई पोलिसांनी केलेल्या पहिल्या एन्काउंटरचा घेतलेला हा आढावा!
मुंबईच्या किंबहुना स्वतंत्र भारताच्या इतिहासात पोलिसांनी केलेलं पहिलं एन्काउंटर म्हणजे मन्या सुर्वेचं. मनोहर अर्जुन सुर्वे म्हणजेच उर्फ मन्या. मुंबईत झालेल्या या पहिल्या एन्काऊंटरची कहाणी ही देखील तितकीच लक्षवेधी असल्याने नंतर त्यावर हिंदी चित्रपटही आला आणि तो गाजलादेखील. मन्या हे नाव एखाद्या टपोरी गुंडाचं वाटत असलं तरी हा गुंड ‘पदवीधर’ होता. हा सुशिक्षित गुंड तत्कालीन मुंबईत सक्रिय असणाऱ्या विद्यमान टोळ्यांना आव्हान देण्यासाठी आणि त्यांना नामोहरम करण्यासाठी प्रसिद्ध होता. त्याचा जन्म १९४४ साली कोकणात, रत्नागिरी जिल्ह्यात झाला. १९५२ साली तो आपली आई आणि सावत्र वडिलांबरोबर मुंबईत स्थायिक झाला. अनेक वर्षे त्याचे कुटुंब एल्फिन्स्टन रोड आणि लोअर परळ येथील वेगवेगळ्या चाळींमध्ये राहात होते. त्याने आपले शिक्षण मुंबईच्या कीर्ती महाविद्यालयातून रसायनशास्त्र या विषयात ७८ टक्के गुण मिळवून पूर्ण केले होते. त्यानंतरच त्याच्या खऱ्या गुन्हेगारी विश्वातील आयुष्याला सुरुवात झाली.
भार्गव हा मन्याचा सावत्र भाऊ मुंबईत दादर पश्चिमेस असलेल्या आगर बाजारातील गुंड होता. १९६९ साली सुर्वे, भार्गव आणि सहकारी मन्या पोधकर या सर्वांवर दांडेकर नावाच्या व्यक्तीची हत्या आणि सामूहिक हल्ल्याचा आरोप होता. गुन्हेगारी क्षेत्रातील मन्याच्या प्रवासाची सुरुवात याच दांडेकर खून प्रकरणातून झाली. या प्रकरणात त्याला गोवण्यात आले होते असे ‘द रीअल स्टोरी बिहाइंड शूटआऊट अॅड वडाला’ या टाइम्स ऑफ इंडियाने प्रकाशित केलेल्या लेखात म्हटले आहे. तर प्रसिद्ध निवृत्त पोलीस अधिकारी इसाक बागवान यांनी महाराष्ट्र टाइम्समध्ये लिहिलेल्या लेखात मन्या हा त्याच्या भावामुळेच गुन्हेगारी क्षेत्राकडे वळल्याचे म्हटले आहे.
मन्याच्या भावाचा दादरच्या आगर बाजारात मटक्याचा अड्डा होता. दादरमध्ये दबदबा असलेल्या दाते आणि दांडेकर टोळीशी त्याचे व्यावसायिक वैर होते. याच वैमनस्यातून दांडेकरची हत्या करण्यात आली.या खुनाच्या प्रकरणात मन्याचा हात असल्याच्या संशयावरून तत्कालीन पोलिस निरीक्षक दाभोळकर यांनी या दोन्ही भावांना ताब्यात घेतलं. या प्रकरणात न्यायमूर्ती गुप्ते यांनी दोघांनाही जन्मठेपेची शिक्षा सुनावली. त्यांची रवानगी पुण्याच्या येरवडा तुरुंगात करण्यात आली. तिथे त्याने आजारी पडल्याचं नाटक करून पळून जाण्यात तो यशस्वी ठरला. मुंबईत परतल्यावर त्याने दादर आगर परिसरातून वसुली करण्यास सुरुवात केली. या कालखंडात त्याचे वसुलीवरून सुहास भाटकरशी वैर निर्माण झाले होते.
१९७७ साली पोलिसांनी मन्याला पुन्हा पकडले होते. पुण्यातील येरवडा मध्यवर्ती कारागृहात बंदिस्त असताना गुंड सुहास (पोट्या भाई) भाटकर हाही तिथेच होता. या दोघांमधील वाद तसेच सुर्वे याचे तुरुंगातील डावपेच आणि एकूणच त्रास याला कंटाळून तुरुंग प्रशासनाने त्याची रत्नागिरी कारागृहात रवानगी केली होती. तिथे त्याने अन्नत्याग केला त्यामुळे त्याचे वजन सुमारे २० किलोने कमी झाले आणि त्याला स्थानिक सिव्हिल हॉस्पिटलमध्ये हलविण्यात आले. ४ नोव्हेंबर १९७९ रोजी पळून जाण्यासाठी सुर्वेने या संधीचा उपयोग केला आणि नऊ वर्षे शिक्षा भोगून तो मुंबईच्या दिशेने पळाला. मुंबईत परतल्यानंतर सुर्वे याने आणखी एक टोळी तयार केली. धारावीतील शेख मुनीर आणि डोंबिवलीतील विष्णू पाटील हे त्याचे विश्वासू साथीदार होते. १९८० साली मार्च महिन्यात उदय शेट्टी नावाचा आणखी एक गुंड त्याच्या टोळीत सामील झाला.
या टोळीने पहिला दरोडा ५ एप्रिल १९८० रोजी घातला, त्यात त्यांनी ॲम्बेसेडर कार चोरली होती. त्यानंतर करी रोडजवळील लक्ष्मी ट्रेडिंग कंपनीतून ५,७०० रुपये लुटण्यासाठी या वाहनाचा वापर करण्यात आला. १५ एप्रिल रोजी, सुर्वे आणि त्याच्या साथीदारांनी धारावी झोपडपट्टीतील काळा किल्ल्याजवळ शेख मुनीरचा शत्रू शेख अजीज याची हत्या केली. ३० एप्रिल रोजी त्याचा प्रतिस्पर्धी विजय घाडगे याला दादर येथील पोलीस ठाण्यात घेऊन जात असताना त्याने विजय आणि एका पोलीस हवालदाराला भोसकले. त्याने तुरुंगात वाचलेल्या जेम्स हॅडली चेसच्या कादंबरीतूनच याची प्रेरणा घेतल्याचे त्याने पोलीस तपासात सांगितले होते.
पैसे मिळवण्यासाठी तसेच अंडरवर्ल्डमध्ये स्वतःचा दरारा निर्माण करण्यासाठी त्याने सरकारी दूध योजनेतून पैसे लुटण्याचा निर्णय घेतला. या टोळीने दयानंद, परशुराम काटकर आणि किशोर सावंत यांच्यासह माहीममधील बादल बिजली बरखाजवळ कार चोरली आणि गोवंडीजवळ १.२६ लाख रुपयांची चोरी केली. कादंबरीत उल्लेख केल्याप्रमाणे चोरीचे वाहन नंतर वांद्रे येथील नॅशनल कॉलेजजवळ त्यांनी सोडून दिलेले सापडले. सुर्वे याच्या टोळीने केलेल्या आणखी एका प्रसिद्ध दरोड्यामध्ये सायन-ट्रॉम्बे रोडवरील कॅनरा बँकेच्या शाखेतून देवनार येथील ड्यूक अँड सन्स कंपनीचे १.६ लाख रुपये चोरले.
सुर्वे याच्या गुन्हेगारी कारवाया केवळ चोरी आणि दरोडे यांच्यापुरत्या मर्यादित नव्हत्या. अंमली पदार्थांच्या तस्करीतही त्याचा सहभाग होता आणि कित्येक प्रकरणात त्याने शस्त्रांचा वापर केला होता. अवघ्या दोन वर्षांच्या काळात त्याची टोळी इतकी कुप्रसिद्ध झाली की दोन दशकांहून अधिक काळ अंडरवर्ल्डवर राज्य करणाऱ्या पठाणांनी कोकणी भाषिक कासकर बंधू, दाऊद आणि शब्बीर यांची हत्या करण्याच्या उद्देशाने त्याची मदत घेतली होती. या टोळीच्या वाढत्या गुन्हेगारी कृत्यामुळे सुर्वे याच्यावर कारवाई करण्यासाठी पोलिसांवर मोठा दबाव निर्माण झाला आणि त्यांनी त्याच्या गुन्हेगारी कारवायांना आळा घालण्यासाठी ऑपरेशन मन्या सुर्वे हाती घेतले. २२ जून १९८१ रोजी शेख मुनीर याला कल्याणजवळच्या केमिकल कंपनीतून उचलण्यात आले. काही दिवसांनी दयानंद आणि परशुराम काटकर यांना गोरेगाव येथील एका लॉजवर अटक करण्यात आली.
मन्या गुन्हा करण्यासाठी कार चोरी करतो हे कळल्याने पोलिसांनी त्याच्यासाठी कार चोरणाऱ्यालाच ताब्यात घेतलं. ११ जानेवारी रोजी मन्या कोणत्या कारनेच बँक लुटणार त्याची माहिती कारचोराने पोलिसांना दिली. गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक आयझॅक सॅमसन यांच्या नेतृत्वाखाली गुन्हे शाखेचे अधिकारी राजा तांबट, यशवंत भिडे, संजय परांडे, शिर्के आणि इसाक बागवान असं पथक ‘ऑपरेशन मन्या सुर्वे’साठी निघालं. ११ जानेवारी १९८१ रोजी मन्या सुर्वे वडाळ्यातील आंबेडकर कॉलेज जंक्शनवर टॅक्सीने आला. पोलीस दबा धरूनच बसले होते, त्याच्याबरोबर एक महिला होती; ती आधी उतरली आणि चोराने पार्क केलेल्या कारमध्ये जाऊन बसली. मग मन्या उतरला आणि कारच्या दिशेने जाऊ लागला, त्याच वेळी पोलिसांनी त्यांना अडवलं. अनेकजण आपल्या दिशेने येत असल्याचं लक्षात येताच सुर्वेने त्याचे वेबली आणि स्कॉट रिव्हॉल्व्हर बाहेर काढले. मात्र त्याने गोळी झाडण्याआधीच पोलीस अधिकारी राजा तांबट आणि इसाक बागवान यांनी त्याच्या छातीत आणि खांद्यावर पाच गोळ्या झाडल्या आणि सुर्वे याचा मृत्यू झाला. ही चकमक म्हणजे सुर्वे याच्या शहरातील गुन्हेगारीचा शेवट होता. सुर्वे याचा मृत्यू मुंबईतील पहिले ‘रेकॉर्डेड एन्काउंटर किलिंग’ म्हणून ओळखले जाते. १९८० च्या दशकाच्या उत्तरार्धात पोलीस चकमकीत झालेल्या मृत्यूचे प्रमाण वाढले आणि १९९३ च्या मुंबई बॉम्बस्फोटानंतर त्यात अधिकच भर पडली; १९८२ ते २००४ पर्यंत एकूण ६२२ कथित गुन्हेगार पोलीस चकमकीत मारले गेले.
0 टिप्पण्या