Top Post Ad

नागरिकांनी अफवांवर तसेच अपुर्ण माहितीवर विश्वास ठेवू नये

  •  *शिवडी क्षयरोग रूग्णालयात क्षय रूग्णांवर सर्वोत्तम उपचारासाठी बृहन्मुंबई महानगरपालिका प्रयत्नशील*
  • *नागरिकांनी अफवांवर तसेच अपुऱया माहितीवर विश्वास ठेवू नये - महानगरपालिका प्रशासनाकडून आवाहन*

 


बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या शिवडी क्षयरोग रूग्णालयात दिवसाला दोन रूग्णांचा मृत्यू या आशयाच्या बातम्या विविध वर्तमानपत्रांमध्ये प्रकाशित झाल्या आहेत. या बातम्यांच्या अनुषंगाने जनमानसामध्ये गैरसमज निर्माण होऊ नये यासाठी बृहन्मुंबई महानगरपालिका प्रशासनाकडून खालीलप्रमाणे स्पष्टीकरण करण्यात येत आहे. 

शिवडी स्थित क्षयरोग रूग्णालय समुहाचे संचालन हे बृहन्मुंबई महानगरपालिकेकडून करण्यात येते. मुंबई शहर व उपनगरे तसेच आसपासच्या महानगरपालिका क्षेत्रातून येणाऱ्या क्षयरूग्णांना दाखल करून घेत, त्यांच्यावर उपचार करण्यासाठी हे एकमेव रूग्णालय आहे. त्यामुळे विविध शासकीय तसेच खासगी रूग्णालयांकडूनदेखील गंभीर स्वरूपाचे  क्षयरूग्ण भरतीसाठी या रूग्णालयाकडे संदर्भित केले जातात. गंभीर परिस्थितीतील सर्वच रूग्णांना सर्वोत्तम वैद्यकीय उपचार देण्यासाठी क्षयरोग रूग्णालय प्रशासनाकडून सर्वतोपरी प्रयत्न केले जातात. या रूग्णांचे प्राण वाचवण्यासाठी महागड्या औषधांसह अधिकाधिक परिणामकारक उपचार पुरविण्यात येतात.

शिवडी क्षयरोग रूग्णालय समुहाची सक्रिय रूग्णशय्या क्षमता ६३९ आहे. त्यापैकी ८० टक्क्यांपेक्षा जास्त  रूग्णशय्या सतत वापरात असतात. तसेच दरदिवशी सरासरी ७० ते १०० क्षयरूग्ण बाह्य रूग्ण विभागात तपासले जातात. तर अंदाजे १५ ते २० रूग्णांना पुढील उपचारासाठी भरती केले जाते. रूग्णालयातील उच्च शिक्षित व दीर्घ अनुभवी डॉक्टर्स, परिचारिका आणि चतुर्थ श्रेणी कामगार यांच्यासह संपूर्ण रूग्णालय प्रशासन क्षयरूग्णांचे प्राण वाचवण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करतात. 

क्षयरोग रोखण्यासाठी केल्या जाणाऱ्या अथक आणि नवीन प्रयत्नामुळे क्षयरोग रूग्णांना त्यांच्या घरानजीक उपचार मिळण्यासाठी विविध ठिकाणी क्षयरूग्ण समूळ उपचार केंद्र (Dots / Dots Plus Centers) अंतर्गत बाह्यरूग्ण कक्ष उभारण्यात आले आहेत. या विकेंद्रीकरणामुळे अनेक क्षयरूग्ण जे चालू फिरू शकतात, ते क्षयरोग रूग्णालयात न येता जवळच्या बाह्यरूग्ण विभागात जाणे पसंत करतात. याचाच अर्थ क्षयरोग रूग्णालयात येणारे क्षयरूग्ण हे बहुतांशपणे गंभीर अवस्थेत आणि आजाराच्या शेवटच्या टप्प्यात उपचारासाठी दाखल होतात. क्षयरोगामुळे अशा रूग्णांची दोन्ही फुफ्फुसे अनेकदा निकामी झाल्याचे आढळून येते. तसेच अनेक रूग्ण वैद्यकीय प्राणवायूवर अवलंबून असतात. 

रूग्णालय प्रशासनाकडून सर्वोत्तम वैद्यकीय उपचार पुरविण्यात आले तरी, काही रूग्ण गंभीर असल्यामुळे उपचाराला प्रतिसाद देत नाहीत. त्यांना औषधाची मात्रा लागू होत नाही. तसेच काही रूग्णांना मधूमेह, एचआयव्ही यासारखे अन्य आजारही असल्यामुळे क्षयरोगावर उपचार करताना अडचणी येतात. पुरूष क्षयरूग्णांमध्ये मद्य आणि अन्य व्यसनांचे प्रमाण अधिक असल्यामुळे असे रूग्ण औषधोपचारास प्रतिसाद देत नाहीत. अनेकदा सहव्याधींमुळे औषधाला दाद न देणे आणि फुफ्फुस निकामी होणे यासारख्या कारणांमुळे उपचाराला प्रतिसाद मिळत नाहीत. त्यामुळे वैद्यकीय उपचारांची पराकाष्ठा करूनही काही रूग्णांना वाचवण्यात अपेक्षित यश येत नाही. 

उपरोक्त वस्तुस्थिती लक्षात घेता, सर्व नागरिकांना तसेच प्रसारमाध्यमांना महानगरपालिका प्रशासनाच्या वतीने नम्र विनंती करण्यात येते की, शिवडी रूग्णालयात क्षयरोग रूग्णांना उपचार देण्यासाठी सर्वोत्तम प्रयत्न केले जातात. तसेच अनुभवी डॉक्टर्स, परिचारिका आणि कर्मचाऱ्यांचा चमू हा रूग्णांच्या सेवेत अविरतपणे कार्यरत आहे. त्यामुळे क्षयरूग्णांच्या मृत्यूविषयक प्रकाशित बातम्यांच्या आधारे नागरिकांनी कोणतेही गैरसमज करून घेऊ नयेत. तसेच रूग्णालय प्रशासनाच्या समर्पित कामगिरीविषयी कृपया कोणतीही शंका बाळगू नये, असे विनम्र आवाहन करण्यात येत आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

 READ / SHARE  / FORWARD 
JANATA  NEWS  xPRESS

निरंतर सेवेच्या आर्थिक मदतीकरिता 
for Donation
G pay 8108603260 

संपादक: सुबोध शाक्यरत्न  
M : 8108658970

Email- pr.janata@gmail.com