१० ऑगष्ट २०१३ रोजी मी नाशिकहून धुळ्यासाठी निघालो, मध्येच नंदाचा फोन आला म.टा.ला बातमी आहे कॉ. शरद पाटीलांना अर्धांगवायूचा झटका आला आहे ते अॅडमिट आहेत, तुम्ही आता त्यांना भेटूनच या. तिच्या बोलण्यातील काळजी आणि व्याकुळता मला कळली होती. कारण बाबुराव बागूल आणि शरद पाटील यांची मैत्री व त्यांचे येणे जाणे या विषयी नंदा जास्तच सजग होती. मी हि आता आपण कॉ. पाटलांना भेटलेच पाहिजे असे ठरवुनच धुळ्यात गेलो. एम. के. वाघ सरांनी त्यांच्या जवळच्या कार्यकत्यांना फोन करून माहिती मिळवली तर कळले त्यांना घरी नेलेले आहे. मग सरळ घरी जाण्याचे ठरवीले धुळ्यातील वाडीभोकर रोड वरिल असंतोष हा टुमदार असा बंगला कोणाला माहीत नाही. बरोबर नामदेव शिरसाठ मयूर मास्टर होतेच. जातांना मास्टर टेलर यांनी त्यांच्या आठवणी सांगितल्या. कॉम.तथा अप्पा माझ्याकडेच कपडे शिवतात तसेच नॉनव्हेज कधीकधी माझ्या कडून बनवलेले आवडीने खातात.
आम्ही पोहचलो तेव्हा कॉ. पाटील कॉटवर पडून कोणाशी तरी फोनवर बोलत होते. डाव्या हाताला सलाईन लावल्याची पट्टी होती. त्यावेळी त्यांच्याजवळ भाकपचे कॉ. श्रावण शिन्दे, सि.पी.एम.चे.कॉ.राव होते. फोनवर ही ते जातीअंताची लढाई व त्याबाबतीत त्यांचे लिखाण याबाबत सांगत होते. पुढे फोन बंद झाला. मी ओळख करून दिली, खरतर आता त्यांना माझा संदर्भ आठवत नव्हता. कारण मध्ये बराच काळ भेट नव्हती. दोघं डाव्या पुढाऱ्यांना त्यांनी त्यांच्या शैलीत फटकारले. तुम्ही मला बघायला आला नाहीत तर तुमचा यात राजकीय उद्देश आहे वगैरे. पुढे मी बोलता झालो, त्यांनी सांगितले मी मार्क्सचा अनुयायी आहे, परंतु मार्क्सवर टीकाही करतो. आंबेडकरांचाही अनुयायी आहे त्यांच्यावरही टीका करतो. आंबेडकरवाद्यांनी भक्ती म्हणून आंबेडकरवादाकडे पाहू नये तर आंबेडकरानंतर आम्ही त्यात काय भर घालतो हे बघितले पाहिजे. जातीअंताची लढाई करताना किवा जाती घालवण्यासाठी आंबेडकरांनी उपाय सुचवला नाही हे मी मांडतो. त्यावेळेस डॉ. कसबे पासून सर्वांना मी आंबेडकरांवर टिका करतो असे वाटते आणि आंबेडकरवाद्यांनाही तसेच वाटते. डाव्यांनाही मी मार्क्स वर टिका करतो असे वाटते. वर्ग जात, नष्ट केल्याशिवाय समाजवाद येणार नाही, हे खर आहे. तर मग वर्ग नष्ट झाल्यावर जाती नष्ट करता येतील हे म्हणणे चुकीचे आहे.
कॉ सिताराम येचुरी म्हणतात समाजवाद आल्यावर जाती नष्ट करू. असो- जाती नष्ट केल्याशिवाय समाजवाद येईलच कसा ? हे येचुरींना कळत कसे नाही. ते म्हणाले कॉ. ज्योती बसू यांनी निधनाच्या काही दिवसापूर्वी एका मुलाखतीत स्पष्ट केले की, समाजवाद हे स्वप्न आहे प्रॅक्टिकली किवा प्रत्यक्षात ते शक्य नाही, म्हणजे एवढे दिवस सत्तेवर असणाऱ्या माणसाने असे सांगावे हेच मुळी घातक आहे. डाव्यांकडे जाती निर्मुलनासाठी कार्यक्रम नाही. मी त्याचे तत्वज्ञान मांडतो आहे, त्यावर ते साधे बोलत नाहीत किवा मी जे मांडतो ते खोडूनही काढत नाहीत, असे तळमळीने ते बोलत होते. मेनस्ट्रीमचा संपादक बंगाली ब्राम्हण आहे त्यांने माझा लेख छापला नाही. त्यासाठी दिल्ली विद्यापिठाच्या दलित मुलांनी संपादकाच्या कार्यालयावर मोर्चा नेला, डॉ. वानखेडे यांनी त्या मुलांना हा घडलेला प्रकार सांगितला म्हणजे आज हि मला वाळीत टाकले जात आहे असे ते म्हणाले "फिडेलकेस्ट्रो"ला मी पत्र पाठवले आहे लोकशाही, समाजवादाच्या मांडणीसाठी त्याने जर मला क्यूबात बोलवले तर मी याही - अवस्थेत क्यूबात जाईन. हे सांगताना त्यांचा नेहमीचा करारी चेहरा मला दिसला, आवाजात बदल जरी झालेला असला तरी धार मात्र तीच होती.
धुळ्यात सायकलीवर फिरणारे कॉ. शरद पाटील आम्हास माहित आहेत. शरिर जरी थकलेले होते तरी स्मरण आणि मांडणीत फरक दिसला नाही. आंबेडकरवाद्यांनी भक्ती करू नये, असे ते म्हणाले. त्यावेळी मी त्यांना म्हणालो आंबेडकरवादी भक्तीने आंबेडकरवादाकडे कधीच बघत नाहीत, तुम्ही ज्यांना आंबेडकरवादी समजता त्यांनी आंबेडकरवादाशी कधीच फारकत घेतली आहे. नसता ते शिवसेनेबरोबर गेले नसते किंवा धर्मावादी पक्षाशी हातमिळवणी केली नसती. मी प्रस्तापित दलीत नेतृत्वाविषयी बोलतो आहे, हे लक्षात आल्यावर त्यांनी एक गोष्ट मात्र सांगितली, "त्यांना वगळून चालणार नाही" मी म्हटले त्यांचे कॉन्ट्रीब्यूशन आम्ही मान्य करतो. परंतु त्यांना घेऊनच लोकांना पुढे जाता येईल असे काही नाही. कारण त्यांना टाळूनच लोकांनी 'खैरलांजीचे आंदोलन केल्याचे त्यांच्या निर्दर्शनास आणले, रमाबाई आंबेडकर नगर, घाटकोपर हत्याकांडाची लढाई दलितांनी त्यांना टाळूनच यशस्वी केली. हे ज्यावेळेस त्यांच्या लक्षात आणून दिले त्यावेळेस त्यांनी ते मान्य केले. परंतु ते हे म्हटले, यांना बरोबर जर घेतलं नाही तर ते खोडा घालतील. त्यांना मी थोडे ताजे उदाहरण दिले, धुळ्यातील डॉक्टर आंबेडकर चौकातील बुद्ध विहारच्या उद्घाटनासाठी धुळ्यातीलच नाहीतर महाराष्ट्रातील कोणताही दलित पुढारी नव्हता, लोकांनी त्यांना टाळून ज्येष्ठ सामान्य कार्यकर्त्यांच्या हस्ते उद्घाटन केले. म्हणजे दलित जनता ही आंबेडकरवादी आहे. ती भक्तीने आंबेडकरवादाकडे पाहत नाही हे त्यांच्या लक्षात आणून दिले. ही बाब खरंच समाधानकारक आहे, असे ही ते म्हटले.
पाचव्या खंडाचे लिखाण चालू आहे ते मी पूर्ण करणार असे ते सांगत होते. बेछली हत्याकांडातील आरोपीची झालेली सुटका, रणवीर सेनेचा प्रमुख व त्याची हत्या बिहार सरकारने त्याचे सरकारी इतमामाने केलेले संस्कार, त्यात दलित पुढाऱ्यांची भूमिका, ही लक्षात आणून दिल्यावर त्यांनी नाराजी व्यक्त केली. सचिन माळी यांनी पाठवलेलं पत्र मला वाचायला दिले. हे पत्र सचिनने मला जेलमधून लिहिले आहे असे सांगितले. जातीअंताची लढाई विषयी माझी मांडणी लोकांना मान्य होत आहे, असे ते म्हटले. तास दीड तासाच्या चर्चेत ते रमले होते. त्राण नसतानाही आमच्याशी बोलत होते. थोडं थकल्यासारखं जाणवल्यामुळे आम्ही निरोप घेतला. आमचा हात हातात घेऊन तुम्ही आलात म्हणून बरे वाटले असे सांगितले. ननुबाई गावीत बाजूलाच असल्यामुळे त्यांच्यावर नजर ठेवून होत्या. जाताना त्यांच्याकडे वळून चौकशी केली. त्यावेळी त्या म्हटल्या अशा चर्चाच त्यांच्यावर उपचार आहेत अशा चर्चा करण्यास त्यांच्याजवळ कोणीच नाही आज ते तुमच्या चर्चेत रमले होते अशा त्या म्हटल्या. मीच त्यांची काळजी व सेवा करते. ज्या माणसाने माणसात आणले, आयुष्य दिले, दृष्टिकोन दिला त्यांची सेवा करण्याचा आनंद होतो, असेही त्या म्हटल्या. राजू गायकवाड यांनी इतर माहिती दिली. मी निरोप घेतला. १९८६ साली मी औरंगाबाद सोडून धुळ्यात आलो. १९८४ पर्यंत मी धुळ्यात होतो. या आठ वर्षाच्या काळात मात्र कॉ. पाटील यांच्याशी संबंध आले. कधी कधी मतभेदही झाले परंतु त्यांच्या मांडणी व अभ्यासाविषयी आदरच राहिला. त्यांनी उजवा हात जो हातात दिला होता त्यांच्या स्पर्श आज ही तसाच जाणवतो.
या महान विद्वान माणसांचं जन्मशताब्दी वर्ष सुरू होत आहे. त्यानिमित्त विनम्र अभिवादन.
अॅड. नाना आहिरे
95116 87178
0 टिप्पण्या