थंगलान काय आहे ? ही कथा आहे कोलार गोल्ड फील्डच्या ( KGF ) खाणीत सापडणार सोन,त्यात आम्हाला मिळणारा वाटा आमचं नशीब बदलेल,आमची पिढ्यानपिढ्याची पिडा,दुःख,शोषण संपवेल,आमची अस्पृश्यता नष्ट करेल,आम्हाला सामाजिक मानसन्मान मिळवून देईल,आम्हाला हिंदू धर्मातील वर्ण व जातीव्यवस्थेतून मुक्ती मिळवून देईल अशी आशा ठेवून पिढ्यानपिढ्यापासून उच्च वर्णीय,जातीय राजा,जमीनदार यांच्या नंतर ब्रिटिशांना सोन काढून देणारा,सोन काढण्यासाठी मदत करणारा अस्पृश्य दलित समूह व त्यांचा पराक्रमी,आशावादी नेता थंगलान तर दुसरीकडे स्वतःच्या पूर्वजांची पिढ्यानपिढ्यांची जमीन,त्यात आढळणार सोन,हिंदू धर्मातील वर्ण जातीव्यवस्थेच्या पलीकडे असणारी स्वतःची स्वतंत्र सामाजिक,सांस्कृतीक ओळख,व्यवस्था,विरासत,जीवनपद्धती या सर्वांचे निडरपणे प्रसंगी लढाई करून,स्वतःचे प्राण देऊन अथवा शत्रूचे प्राण घेऊन रक्षण करणारा मातृसत्ताक आदिवासी नागा समूह व या आदिवासी नागा समूहाची शुर पराक्रमी महीला नेता आरथी असे हे वेगवेगळी धारणा,विचारधारा,उद्दिष्ट असलेले दोन समूह व या दोन समूहातील नेत्यांमध्ये पिढ्यानपिढ्यापासून चालू असलेल्या संघर्षाची. पुढे या संघर्षांच नेमक काय होत ? हा संघर्ष थांबतो का ? की तसाच पुढे चालू राहतो ? की आणखी नव काही होत ? या सर्व प्रश्नांची उत्तर जाणून आणि समजून घेण्यासाठी तामिळ चित्रपट सृष्टीतील प्रखर आंबेडकरवादी दिग्दर्शक पा.रंजीत यांचा "थंगलान" हा चित्रपट प्रत्येक भारतीयाने नक्की पहावा.
------------------------------------------
पा_रंजीत दिग्दर्शित आणि अभिनेता चियान विक्रम यांच्या सुरेख अभिनयाने नटलेला हा सिनेमा इतिहासाच्या खोलात जाऊन सत्य बाहेर काढणारा ठरलेला आहे. भारताचा इतिहास हा सिंधू संस्कृतीचा सभ्यतेमध्ये दडलेला आहे. ही सिंधू संस्कृती नंतर नाग लोकांची संस्कृती बनलेली होती. या नाग लोकांचा देश म्हणजे भारत देश आहे आणि या भारताला बुद्धाच्या विचारांचा खजिना लाभलेला आहे. नाग लोकांच्या या देशांमध्ये सिंधू संस्कृती पासून ते तथागत सिद्धार्थ भगवान गौतम बुद्धा पर्यंत 27 बुद्ध होऊन गेले आणि या परंपरेतील शेवटचे 28 वें बुद्ध म्हणजे सिद्धार्थ तथागत गौतम बुद्ध आहेत. यांच्या विचारांचा भारताच्याच नव्हे तर जगाच्या पटलावर प्रभाव पडलेला आहे. या बुद्धाच्या विचारांचा वारसा जपणारे, त्याला संरक्षित करणारे त्या काळात स्त्रिया होत्या. या स्त्रियांना नागणिका म्हणत असत. बुद्धांना नाग लोकांनी जिवंत ठेवलेला आहे. या भारत देशाचे मूळ मालक नागवंशीय लोक आहेत. पा. रणजीत दिग्दर्शित थंगलान चित्रपट हा भगवान बुद्धाच्या विचारांना मानणाऱ्या आणि त्या बुद्धाच्या विचारांचा संरक्षण करणाऱ्या नागनिकाचा प्रभाव कसा होता हा या चित्रपटाचा मुख्य भाग आहे. ही नागणिका बुद्धाचं कसं संरक्षण करते हे या चित्रपटात आवर्जून प्रमुख रूपात दाखवण्यात आलेला आहे.
ब्राह्मण पुरोहित भगवान बुद्धाच्या विचारांना नष्ट करण्यासाठी त्या काळातील क्षत्रिय समजल्या जाणाऱ्या लोकांचा वापर करून बुद्धाच्या विचारांना नष्ट करण्यासाठी प्रयत्न करत असतात हे या चित्रपटात स्पष्ट दाखवण्यात आलेला आहे. याचाच अर्थ बुद्धाची विचारधारा नष्ट करण्यासाठी ब्राह्मणी विचारधारा काम करत आहे आणि या दोघांमध्ये लढाई चालू आहे हे बाबासाहेबांनी सांगितलेलं वाक्य आणि इतिहास आपल्याला आठवला पाहिजे.सोन्याचा खजिना शोधण्यासाठी केलेला प्रयत्न म्हणजेच बुद्धांच्या विचारांचा खजिना आहे. सोन म्हणजेच बुद्धांचे विचार जतन करण्यासाठी नागणिका कशा पद्धतीने ते वाचविण्यासाठी प्रयत्न करते हे यातून दाखविण्यात आलेले आहे. भारताच्या इतिहासात स्त्रिया ह्या रक्षण करणाऱ्या महानायिका आहेत. म्हणूनच भारताच्या कानाकोपऱ्यामध्ये महाकाली, तुळजाभवानी, जगदंबा, अशा विविध देव्या आपल्याला पाहायला मिळतात. ह्या सर्व भारताच्या रक्षण करणाऱ्या महानाईका त्या काळातल्या महाराण्या होत्या.
परंतु ब्राह्मणी व्यवस्थेच्या गुलामगिरीत अडकल्यानंतर आणि ब्राह्मणांच्या हातात इथली व्यवस्था आल्यानंतर स्त्रियांना गुलाम आणि दास बनवण्याचं काम इथल्या व्यवस्थेने केलेलं आहे. ग्रंथ आणि पुराणाच्या माध्यमातून स्त्रियांना गुलाम बनवण्यात आलं आणि त्यांचा दैदिप्यमान इतिहास,लढवय्या इतिहास गडप करण्यात आला. Thangalan हा चित्रपट पाहायचा आणि समजून घ्यायचा असेल तर भारताचा सिंधू संस्कृती पासून ते तथागत भगवान बुद्ध सम्राट चक्रवर्ती अशोक यांच्या पर्यंतचा आणि आजपर्यंतचा इतिहास आपल्याला समजावून घ्यावा लागेल तेव्हाच हा चित्रपट आपल्याला समजू शकतो. महाराष्ट्रात हा चित्रपट प्रदर्शित न होण्याचं काय कारण असू शकतं हे या इतिहासावरून समजू शकतात. कारण महाराष्ट्रात आज ब्राह्मणी व्यवस्थेचे स्तोम माजलेले आहे आणि त्यामुळे हा चित्रपट इथे पाहू दिल्या जाणार नाही हे पा.रंजीतला चांगले समजले असावे
- धम्म प्रकाश त्रिभूवन
-------------------------------------------
काही निरिक्षणे :
01) जमिनीमध्ये दडलेल्या धनाला गुप्तधन असे म्हणतात. हे गुप्तधन प्रामुख्याने सोन्याच्या रूपात आढळून येते आणि त्या गुप्तधनावर कोणता तरी नाग त्याची राखण करत असतो, अशी गोष्ट आपण लहानपणापासून ऐकत आलेलो आहोत; परंतु या मागचा खरा इतिहास असा आहे की, त्या सोन्याचे रक्षण करणारा नाग हा कोणी साप नसून इथले मूल नागवंशीय लोक आहेत.
02) या नागवंशीय लोकांचा प्रमुख ही एक महिला दाखविलेली आहे. याचाच अर्थ असा की नागवंशीय लोक मातृसत्ताक पद्धतीने आपले जीवन व्यतीत करत होते.
03) जम्बूद्विपावरील सामाजिक, सांस्कृतिक आणि धार्मिक संघर्ष हा बुद्धवाद आणि ब्राह्मणवाद यांच्यातला आहे. आताच्या भारतीय व्यवस्थेत सांस्कृतिक संघर्ष हा मुस्लिम विरुद्ध हिंदू असा दाखविल्या जात असला तरीही तो मूळ संघर्ष बौद्ध आणि सनातन ब्राह्मण धर्म यांचे विरोधातला आहे.
04) इथल्या व्यवस्थेमध्ये बुद्ध विचार आणि बुद्ध संस्कृती संपवण्याचे काम ब्राह्मणांनी केलेले आहे. हे काम त्यांना एकट्यांना करणे शक्य नव्हते म्हणून त्यांनी हे काम क्षत्रियामार्फत करवून घेतले आहे. जाती व्यवस्था सुद्धा इथल्या मातीत अशाच पद्धतीने रुजवली गेली आहे.
05) कथेचा नायक हा स्वाभिमान आणि सन्मानाच्या मार्गाने जातो. हा इथल्या मूळ नायकाचा स्वभाव आहे. त्यामुळे भारताचा इतिहास हा नेहमीच रक्तरंजित राहिलेला आहे.
06) थंगलान सिनेमात महिलांच्या आणि पुरुषांच्या शरीरावर विविध आकृती आणि चिन्हे दाखवलेली आहेत. त्यामधून इथल्या इतिहासाचे दाखले मिळतात. एका स्त्रीच्या उजव्या दंडावर पिंपळाचे पान कोरलेले आहे जे बौद्ध संस्कृतीची खूण आहे. त्यातून बौद्ध संस्कृती इथल्या मूळ लोकांनी आपल्या विविध कलामधून जिवंत ठेवल्याचे उदाहरण पहायला मिळते.
07) इथल्या मूळ लोकांना गुलाम बनून त्यांची विविध जातीत विभागणी करून ब्राह्मण आणि क्षत्रीयवर्गांनी त्यांच्याकडून आपले काम करून घेतले; परंतु इथल्या मूळ लोकांना पोटाचा प्रश्न महत्त्वाचा असल्यामुळे त्यांनी आपला इतिहास विसरून शत्रूंना मदत केली. ही मदत करण्याचे एकमेव कारण म्हणजे त्यांच्याकडे उत्पादनाचे साधन नव्हते आणि जे थोडे उत्पादनाचे साधन होते त्यावर गावातील सावकाराची मालकी होती. याच कारणाने त्यांना गुलामी स्वीकारणे भाग पडले.
08) सिनेमात आरती ही नागवंशी तंगलानला आपला इतिहास वारंवार सांगण्याचा प्रयत्न करत असते. खरंतर आरती ही त्याच्यासाठी प्रेरणा आहे आणि त्याचे मूळ अस्तित्व त्याला दाखवून देण्यासाठी ती मार्गदर्शक ठरते.
09) तंगलानच्या मुलाचे नाव असोका असे आहे. हा अशोक विहिरीतून बुद्धाच्या मूर्तीचे तोंड बाहेर काढतो आणि जमीनीत असलेली बुद्ध मूर्ती शोधून त्याला ते तोंड जोडतो. पुन्हा बुद्ध या मातीवर उभा करतो. जमीनीत गाडलेला बुद्ध पुन्हा बाहेर काढतो.
11) नागवंशीय परंपरा आपला इतिहास जिवंत ठेवून बुद्ध विचाराचे रक्षण करते आणि तोच संघर्ष सदर सिनेमात पाहायला मिळतो.
12) ऐतिहासिक संदर्भ सिनेमात वारंवार पाहायला मिळतात.
13) आरतीचे पोट चिरून जेव्हा तिचे रक्त इथल्या जमिनीवर सांडते. तेव्हाच सोने मिळते. याचा लक्ष्यार्थ असा आहे की, नागवंशी यांची अमानुष हत्या केल्यानंतरच या जमिनीतील सोने विरोधकांना मिळाले. नागवंशीय हे इथल्या सोन्याचे आणि विचारांचे रक्षक म्हणून उभे राहतात.
- संतोष शिंदे
0 टिप्पण्या