बार्कलेज आणि समर्थनम ट्रस्ट फॉर दि डिसेबल- मुंबई या संस्थेच्या माध्यमातून शुक्रवार २७ सप्टेंबर रोजी कर्मवीर भाऊराव पाटील कॉलेज, पीकेसी रोड, सेक्टर 15-ए, जुहू नगर, वाशी, नवी मुंबई, या ठिकाणी गरजु बेरोजगार तरुण तरुणींकरिता तसेच अपंग व्यक्तींकरिता साठी रोजगार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. या मेळाव्यामध्ये २५हून अधिक कंपन्या आणि आस्थापना त्यांच्याकडे विविध नोकरीच्या भूमिकांसह संभाव्य मानव संसाधन नियुक्त करण्यासाठी पुढाकार घेत आहेत. २००हून अधिक उमेदवारांना विविध डोमेन आणि सेक्टर्स इत्यादींमध्ये नियुक्त करण्यात येणार असल्याचे विविध कंपन्या आणि आस्थापनांनी आश्वासन दिले असल्याची माहिती संस्थेचे जितेंद्र कर्णिक यांनी दिली. मुंबई मराठी पत्रकार संघ येथे याबाबत अधिक माहिती देण्याकरिता त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी संस्थेचे अनेक कार्यकर्ते उपस्थित होते.
हा रोजगार मेळावा विविध ग्रामीण पार्श्वभूमीतील अपंग व्यक्तींसाठी एक समान व्यासपीठ प्रदान करतो ज्यांना संधींची गरज आहे त्यांच्यासाठी आवडीची नोकरी निवडण्याचे हे माध्यम म्हणून काम करीत आहे. समर्थनमला रोजगाराच्या माध्यमातून सक्षमीकरणावर ठाम विश्वास आहे आणि प्रतिभावान उमेदवारांच्या समूहातून अधिक संधी उपलब्ध करण्याची विनंती विविध आस्थापनांना करण्यात येते. उमेदवारांच्या निवडीनंतर संस्थेची यामध्ये कोणतीही भूमिका अथवा सहभाग रहात नाही. संस्था केवळ कंपनी आणि मानव संसाधन यांची भेट घडवून आणण्याचे माध्यम म्हणून काम करते. निवडीनंतर कंपनी किंवा आस्थापनात काम करण्यासाठी जाणे किंवा पुढील काही वाटचालीबाबत संस्था कोणतीही मध्यस्थी करीत नाही. संस्थेच्या माध्यमातून आजपर्यंत अनेक जॉब फेअरचे आयोजन करण्यात आले आहे. ज्यामध्ये १५,०००हून अधिक तरुण तरुणींना रोजगारांची संधी उपलब्ध झाली आहे. तरी सर्व गटातील तरुण तरुणींनी तसेच अपंग व्यक्तींनी या फेअरमध्ये सहभागी होऊन रोजगाराची संधी निवडावी असे आवाहन कर्णिक यांनी यावेळी केले.
रोजगार मेळाव्याच्या अधिक माहितीकरिता 6364867808
0 टिप्पण्या