राजर्षी शाहू महाराज यांच्या जयंतीच्या शतकोत्तर सुवर्ण महोत्सवी वर्षा निमित्त, सत्यशोधक, साहित्यसम्राट अण्णा भाऊ साठे यांच्या 104 व्या जयंती दिनानिमित्त व "यह आझादी झूठी है, देश की जनता भूखी है!" या ऐतिहासीक घोष वाक्याला ७७ वर्ष पुर्ण होत आहेत, त्या निमित्त लहुजी क्रांती मोर्चा या संघटनेचा ६ वा वर्धापन दिन सोहळा मुंबईतील दिनानाथ मंगेशकर नाट्यगृह, विलेपार्ले या ठिकाणी आयोजित करण्यात आला आहे.
शुक्रवार दिनांक 16 ऑगस्ट रोजी होणाऱ्या या कार्यक्रमाचे उद्घाटन डॉ. मधुकर गायकवाड (मा. अधीक्षक व पथकप्रमुख, मेडीसिन विभाग, जे जे हॉस्पिटल, मुंबई) यांच्या हस्ते होणार असून बामसेफचे राष्ट्रीय महासचिव प्रा. डी. आर. ओहोळ हे या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी असतील. तसेच अॅड. इंजी. अशोक शेल्हाळकर (निवृत्त महाप्रबंधक, माझगाव डॉक) दिपक नारायण लोंढे (संस्थापक अध्यक्ष मांग गारुडी समाज परीवर्तन सामाजिक सेवा संस्था) तसेच संघटनेचे मार्गदर्शन अंकल सोनवणे, प्रा. पी. बी. लोखंडे, प्रा. डी. आर. कसाब प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत. तरी या कार्यक्रमास सर्वांनी मोठ्या संख्येने उपस्थित रहावे असे लहूजी क्रांती मोर्चाचे प्रदेश कार्याध्यक्ष नितीन कांबळे यांनी केले आहे.
१ ऑगस्ट साहित्यसम्नाट अण्णा भाऊ साठे यांचा जयंती दिवस हा मराठी भाषा दिवस म्हणून साजरा झाला पाहिजे. १६ ऑगस्ट १९४७ रोजी 'यह आजादी झूठी है। देश की जनता भुकी है' हा नारा सत्यशोधक अण्णा भाऊ साठे यांना का द्यावा लागला? मातंग जातीमध्ये हजारो संघटना असताना लहुजी क्रांती मोर्चा ही सामाजिक संघटना काढण्याची गरज का भासली. व्यवस्थेकडून राजकीय फायद्यासाठी भावनिक मुद्दे पुढे करत मातंग जात समूहाचा होत असलेला वापर केवळ प्रबोधन आणि जागरण करूनच थांबवू शकतो. अशा अनेक विषयांवर या कार्यक्रमात चर्चा होणार असून याबाबत पुढील आंदोलनाची दिशाही ठरवण्यात येणार असल्याचे नितीन कांबळे यांनी सांगितले. कार्यक्रमाबाबत आज मुंबई मराठी पत्रकार संघात प्रसिद्धी माध्यमांना माहिती देण्यात आली. यावेळी मधुकर जाधव, जयेश जाधव तसेच संघटनेचे अनेक कार्यकर्ते उपस्थित होते.
0 टिप्पण्या