समाजात शांतता प्रस्थापित व्हावी या उद्धेशाने पालि रिसर्च इन्स्टिट्यूट मुंबई या भारताच्या प्राचीन पालि भाषेवर काम करणाऱ्या संस्थेमार्फत भिक्खू यश, महामेवना विहार, श्रीलंका व जागतीक बौद्ध विचारवंत हृषिकेश शरण, दिल्ली यांचे धम्म प्रवचन व व्याख्यान शनिवार दि - 10 ऑगस्ट रोजी मुंबई मराठी ग्रंथसंग्रहालय, दादर पूर्व, मुंबई येथे सायंकाळी 4 वाजता आयोजित करण्यात आले आहे. हा कार्यक्रम सर्वांसाठी खुला आहे. तरी आपणा सर्वांना विनंती आहे की सदर कार्यक्रमास उपस्थित राहून धम्म प्रवचन व व्याख्यानाचा लाभ घ्यावा. असे आवाहन पालि रिसर्च इन्स्टिट्यूट मुंबई तर्फे करण्यात आले आहे. अधिक माहिती करिता 9967692014 या क्रमांकावर संपर्क साधावा
बाबासाहेबांनी त्यांच्या पूर्वघोषणेनुसार १९५६च्या अशोक विजयादशमी दिनी भेदाभेद करणाऱ्या, श्रेष्ठ-कनिष्ठ मानणाऱ्या, कर्मकांडात गुंतलेल्या, ब्राम्हणी हिन्दू वरचष्माने ग्रस्त झालेल्या विषमतावादी धर्माचा त्याग करुन विवेकनिष्ठ मानवतावादी, विज्ञानवादी, समताभिष्ठित अशा बौध्द धम्माचा स्वीकार केला ते करताना त्यांनी प्रथम महास्थवीर चंद्रमणीकडून रीतसर दीक्षा ग्रहण केली. त्यानंतर त्यांनी पाच लाख अनुयायांना धर्मांतरीत केले. त्यापूर्वी त्यांनी बुध्दिस्ट सोसायटी ऑफ इंडिया म्हणजे भारतीय बौध्द महासभा नावाच्या अधिकृत संस्थेची धम्म प्रसारार्थ स्थापना केली. याचा अर्थ त्यांच्या कल्पनेतील हा धम्म आणि त्याचा प्रसार-प्रचार करताना एक जबाबदार संस्था आणि तिच्या मार्गदर्शनातून तयार होणारा भिक्खू वर्ग त्यांना महत्वाचा वाटत होता. धम्मोपदेश करणारा हा वर्ग स्वतंत्र घटक असावा. कारण रोजच्या रोजी-रोटीच्या गंभीर विवंचनेत हरवलेला सर्वसामान्य उपासकांचा वर्ग धम्मनियमांचे नीट उत्कलन आणि पालन करु शकत नाही. त्याकरिता हा भिक्खू वर्ग नियोजीत असावा. हा वर्ग व्यक्तीगत आणि खाजगी जीवनातील राग, लोभ, मोह, माया, लाभ-हानी यांच्या स्वीकृती-विकृती पासून मुक्त होऊन केवळ सेवाभाव, त्याग वृत्तीने, स्वतसाठी नाही, तर इतरांसाठी जगावे या उच्च-उदात्त भावनेने स्वयंप्रेरणेने सेवादान करायला सिध्द झालेला असतो. म्हणून त्याचे अस्तित्व आणि महत्व अपेक्षीत असते,
या वर्गामार्फत धम्म संस्थेचे संवर्धन नि संगोपन करणे उपयुक्त ठरते. हा वर्ग खाजगी, व्यक्तीगत परिवार, त्यातील मानपान या सर्व विकार-विचारापासून अलिप्त असल्याने विविध विचारांचा, धर्म धम्म मतांचा चांगला व तुलनात्मक अभ्यास, अध्ययन करुन समग्र मानवाच्या कल्याणासाठी कटिबध्द झालेला असतो. `हे विश्वचि माझे घर, ऐसी मती जयाची स्थिर, किंबहुना चराचर, आपण जाटला' ही उक्ती ज्ञानेश्वराची नसून मूळ तथागत बुध्दाची आहे. `चरत भिक्खवे, चारिकम्, बहुजन हिताय, बहुजन सुखाय' हे भिक्खूनों! या जगातील जास्तीत जास्त लोकांच्या हितासाठी कल्याणासाठी, तुम्ही सतत भ्रमण करा, एक जागी ठिय्या देऊन राहू नका. मानव कल्याण हाच आपल्या उभ्या आयुष्याचा मूलमंत्र आहे, एकमेव ध्येयधोरण आहे. अशी बुध्द काळापासून शिकवण आणि धम्मादेश देण्यात आला आहे. म्हणून भिक्खुंनी समाजात वावरताना या धम्मादेशाचे सतत पालन, स्मरण आणि चिंतन करीत राहिले पाहिजे. भिक्खुंच्या आचार-विचारातून याचे दर्शन घडले पाहिजे. अशी सात्विक अपेक्षा आहे. तर उपासकांची देखील काही कर्तव्ये आहेत. तेव्हा वर्षावास निमित्त आयोजित या कार्यक्रमास सर्वांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून धम्म श्रवण करावा.
0 टिप्पण्या