Top Post Ad

दूध भेसळ: थकलेल्या आणि वाकलेल्या कायद्याची गोष्ट !


  दुधातल्या भेसळीचा गेल्या अर्ध शतकात संपूर्ण देशात विक्रम वेताळ झाला आहे. प्रत्येक एपिसोडला हा वेताळ विक्रमाच्या मानगुटावर बसतो एक गोष्ट सांगतो आणि उडून जातो. अगदी तसंच देशभरात 365 दिवस ही दूध भेसळ सुरू आहे. एखाद्या मोठ्या अपघातानंतर तिची चर्चा होते तेव्हा तावातावाने कायद्याचं चर्वण होतं, नियमांची आणि शिक्षेची घुसळण होऊन दूध भेसळ करणाऱ्यांच्या कशा नांग्या ठेचायच्या यावर तावा तावाने बोलले जातं. आदेशाने फायली भरतात मात्र कागद फायलीतच कुजतात, परत विक्रम मोकळा वेताळ पाठीवर बसेपर्यंत पुन्हा एकदा दुधाच्या भेसळीचा हाहाकार दिसतो, पुन्हा वेताळ विक्रमाच्या पाठीवर बसतो. पुन्हा दूध भेसळीची चर्चा सुरू होते, हा पाठ शिवणीचा खेळ गेली अर्धशतक भारतात लोकशाहीच्या नावानं अव्याहतपणे सुरू आहे. आठवण यासाठी झाली की महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांनी परवा दात ओठ चावत डोळ्यात राग दाखवत दूध भेसळी विषयी अजिबात कुणाची गय केली जाणार नाही हा विषय फार शक्तीने आणि ताकतीने घ्यावा लागेल, असं बजावलं. परंतु ज्यांना बजावायचं त्यांच्या चेहऱ्यावरून एकही माशी उडाली नाही. याचाच अर्थ दूध भेसळीचे गारदी आणि पारधी हे कोणी बाहेरचे नाहीत तर ते व्यवस्थेमधले शुक्राचार्य असल्याचं स्पष्ट असूनही आजही कायदा वाकलेला आणि झुकलेलाच आहे. याच भान राज्यकर्त्यांना का होत नाही, असा सवाल दूध भेसळीच्या निमित्ताने पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे.

   खरंतर 1960 साली भारतात अन्नपदार्थ भेसळी विषयीचा फार मोठा लेखाजोखा पार पडला. मूळ कायद्यांचे संशोधनात्मक कार्य होऊन अनेक कलमं लावली गेली, अनेक उपाययोजना सुचवल्या गेल्या, मात्र या भेसळीच्या साखळीमध्ये झारीतले शुक्राचार्य इतके बलदंड आणि ओळखीचे, जवळचेच सहजासहजी आटोक्यात न येणारे असल्यामुळे ही भेसळ चहापत्ती पासून डाळीपर्यंत, केरोसीन, डिझेल, पेट्रोल पासून सोन्यापर्यंत, टाचणी पासून तर थेट दुधापर्यंत असा कोणता पदार्थ नाही की ज्या पदार्थाला भेसळ नाही. अगदी काल-परवापर्यंत ज्या गोष्टी अतिशय वाटत होत्या त्या कोंबडीच्या अंड्यामध्ये आणि तांदळाच्या दाण्यामध्ये सुद्धा प्रचंड मोठी भेसळ अलीकडच्या काळात शास्त्रज्ञांनी आणि जाणकारांनी पुराव्यानिशी सिद्ध केली आहे. एक जमाना होता की भेसळ ही एक दोन टक्क्या पुरती मर्यादित होती. दुधात पाणी हे तर भेसळेच परिमाणच होतं, अर्थात त्याचे परिणाम तेवढे घातक नव्हते मात्र आता तांदळाचा दाणाच प्लास्टिक पासून बनतो, कोंबडीचे अंड ही प्लास्टिक व्हर्जन सापडतं, त्याचे मानवी शरीरावर प्राणीमात्रावर मुक्या बहिऱ्या जीवांवरती आणि एकंदरतच जैवसाखळी वरती काय परिणाम होत असतील याची कल्पनाच न केलेली बरी.

 भिवंडीत परवा एक कारखानाच सापडला, ज्या कारखान्यात मोठ्या जनावरांच्या चरबीपासून चक्क तूप बनवलं जात होतं. ही चरबी वितळवून त्यावर प्रक्रिया करून अगदी दिसायला आणि चवीला हुबेहूब तूप मोठ्या ब्रँडेड कंपन्याच्या नावे बाजारात विकले जात होते. अर्थात हे तूप फक्त खाण्यापुरतं नव्हे तर ते अनेक औषधांमध्ये, खाद्यपदार्थांमध्ये आणि अन्नसाखळीमध्ये वापरलं जात होतं. त्याचे परिणाम किती भयंकर असतील हे मिसळणाऱ्याच्या बापजाद्याला ही कळणार नाहीत, त्याचे सेवन करून ज्यांनी दुर्धरातील दुर्धर आजार तारुण्यात ओढून घेतले त्यांनाच ही भेसळ म्हणजे काय, त्याचा अंदाज येईल. एखाद्या औषधाची मेडिकल रिएक्शन ऍलर्जी काय असते ही कुणी कुणाला सांगू नये. ज्याने भोगली, ज्याने अनुभवली त्यालाच ती माहित आणि म्हणून अन्न भेसळीचा कायदा हा वाकलेला, झुकलेला अजिबात चालण्यातला नाही. तो परवडणारा नाही. किमान या देशात एक तरी कायदा असायला हवा की ज्याची दहशत हवी. जगभरात अनेक देशांमध्ये अन्नसाखळीचा कायदा हा अतिशय कठीण सशक्त आणि ताठ मानेचा आहे. आणि म्हणून फक्त भारतच नव्हे जगभरातल्या अनेक खाद्य वस्तू या देशांच्या एअरपोर्ट आणि बंदरांमधून अक्षरशः लाथ मारून परत हाकलून देण्यात येतात. भारतातून जाणारा हळदीपासून मिरचीपर्यंत आंब्यापासून तर दुग्धजन्य पदार्थांपर्यंत अशा अनेक गोष्टी आहेत की ज्या प्रगत देशांमधून सीमेवरूनच हाकलून दिल्या जातात. याचा अर्थ अनेक देशांमध्ये पक्का माल होत असताना कच्च्या मालाच्या इंडस्ट्रीवर प्रचंड पहारा आहे. भारतासारखे नायजेरिया केनिया सारखे अनेक विकसनशील आणि गरीब देश म्हणूनच जगभरातल्या कच्च्या मालाचे विष गेली शतकभर आपल्या अंगा खांद्यावरती पचवत आहेत.

   जोवर ही भेसळ तांदळात खडे, डाळीत कमी दर्जा, चांगला दर्जा ची भेसळ, केरोसीन मध्ये नाफ्ता, मिठाई, डिझेल, पेट्रोलमध्ये केरोसीन अशा पद्धतीची भेसळ होती तोवर ठीक होतं. मात्र ज्या दुधाचा संबंध जन्मलेल्या जीवाशी अगदी जन्मल्या जन्मल्या येतो ते दूध कोणत्याही परिस्थितीमध्ये नराधमांच्या तस्करांच्या आणि भेसळ वाल्यांच्या हातातून जर वाचवता आलं नाही तर अशा देशाला जगातल्या कुठल्याच संकटापासून वाचण्याची स्फूर्ती मिळणार नाही. पाकिस्तान आणि चीनची तर गोष्टच वेगळी. स्वयंभू भारतात सर्वात प्रथम ह्या भेसळ सम्राट शत्रूंपासून येणाऱ्या प्रत्येक पिढीच संरक्षण केलं पाहिजे. त्यांना अस्वस्थ केले पाहिजे की तुमच्या ओठापर्यंत येणारा घास हा विषमुक्त आहे. हे स्वतंत्र भारताचे पहिल्या दहा कर्तव्यांपैकी एक कर्तव्य आहे आणि हे कर्तव्य नीट्स पाळलं गेलेलं आजतागायात तरी नजरेसमोर नाही.
   दुधातली भेसळ ही पाण्यापर्यंत होती, तोपर्यंत ती डिग्रीत कळत होती. खरंतर शेतकऱ्याचं दूध डेरीत घेत असताना सगळ्या पद्धतीची यंत्रणा जागरूक आणि उपस्थित आहे. शेतकऱ्यांनी डेअरीवर आणलेल्या थेंबा थेंबाचे परीक्षण होत आहे, त्याचा दर्जा लिहिला जातो, त्यात पाण्याचे प्रमाण किती आहे ते एका सेकंदात त्याच्या खात्यावर जमा होत आणि त्यानुसार त्याला लिटर मागे पैसे मिळतात. एखाद्या शेतकऱ्याने दहा लिटर दूध डेअरीत घातलं म्हणजे त्याला दहा लिटरचे पैसे मिळाले असे नाही. या दहा लिटरमध्ये ज्यापासून लोणी, तूप, चीज या साऱ्या गोष्टी बनतात त्यासाठी लागणारे फॅट्स किती आहेत आणि त्या पाण्याचे प्रमाण किती आहे, यावरही त्याचा दर ठरतो, हे अर्ध्या जगाला आजही माहित नाही. 

मात्र त्यापुढे लगेचच दुसऱ्या पायरीवरच या दुधातल्या भेसळीची सुरुवात होते. कारण त्या पुढच्या तपासण्या ह्या रामभरोसे आहेत. अगोदर डेअरीची दुसरी पायरी त्यातील अनेक वस्तू काढून घेते आणि केवळ दुधासारखा पांढरा दिसणारा एक पदार्थ थैल्यांमध्ये भरून तो सर्वसामान्यांसाठी बाजारात येतो. खरं तर तिथूनच दुधाच्या भेसळीची सुरुवात होते, असाच गैरसमज आजही भारतात आहे. मात्र हा गैरसमज पूर्णपणे बकवास, खोटा आणि माहीत असूनही दुर्लक्ष होत असलेला आहे. कारण दुधाचे भेसळ ही थेट गाई म्हशीच्या उदरातूनच होत आहे. गेले 30-40 वर्ष उभ्या देशभरात विशेषत: महाराष्ट्रातल्या दूधगंगेत टॉक्सिन नावाचं एक इंजेक्शन गाई म्हशींना सर्रासपणे टोचलं जातं. या इंजेक्शनच्या प्रभावात गाई म्हशींचं दूध वाढतं. ज्या पद्धतीने फळधारणा न होणाऱ्या आंबा झाडाला मोठ्या प्रमाणात कल्टार नावाचे इंजेक्शन टोचण्याचं फॅड कोकण किनारपट्टीत आला आहे. तशाच पद्धतीचे विघातक थोडासा जवळचा फायदा दिसणारे मात्र गाई म्हशींच्या जीवावरही बेतनारं आणि पुढच्या पिढ्यांना केवळ टॉक्सिन नावाचं विष पुरवणारं हे इंजेक्शन भेसळीचा पहिला टप्पा आहे. हे इंजेक्शन बनवणाराही, त्याला परवानगी देणाराही प्रशासन, शासन हे आपलंच आहे आणि आपणच दिलेल्या विषाच्या वापराच्या या परवानग्या गेले कित्येक पिढ्या बरबाद करत आहेत. मात्र हे थेट मान्य करण्याची वृत्ती प्रवृत्ती अलीकडे लोकशाहीतल्या राज्यांमध्ये मत स्वातंत्र्यात राहिलेली दिसत नाही.
   
दुधातील जवळजवळ 80 टक्के भाग काढून झाल्यानंतर हे दुधासारखे दिसणारा पदार्थ दूध म्हणून बाजारात येतो. त्यात मोठ्या प्रमाणावरती पहिली गाठ पडते ते युरियाशी. हा तोच युरिया जो आपण शेतात घालतो. हे टोटली रासायनिक खत आहे. त्याचा उपयोग दुधाचा रंग, दुधाची जाडी, दुधाचा फेस आणि दुधातील वाढ यासाठी केला जातो. नव्हे केला जात होता आता तर भेसळीचा वेग आणि पद्धती अधिक संशोधित होत चालले आहेत. इकडे भेसळ रोखणारा कायदा गुडघे टेकून लाचारासारखा जमिनीवरती सरपटत असताना भेसळ सम्राटांच्या आयडिया आणि संशोधनं मात्र एकापेक्षा एक सरस ठरू लागली आहे. आता तर थेट वॉशिंग पावडर, युरिया अशा काही गोष्टी कढईमध्ये परतून त्यापासून एक स्वतंत्र दूधच बनवलं जात. तर काहीजण हे मिश्रण मोठ्या प्रमाणावर डेअरीतून आलेल्या दुधामध्ये मिसळतात आणि हे बटवडे पहाटेच्या काळोखात वाटले देखील जातात. शेकडो प्रकरणे अशी आहेत की दिवसाढवळ्या हे कारखाने गल्लीबोळात चालताना दिसतात. म्हशीं, गाईंच्या तबेला मध्ये निघालेला दूध वाटपापूर्वी त्यातही भेसळ होते आणि म्हणूनच यावेळची भेसळ ही पिढ्यानपिढ्या होणाऱ्या पाण्याच्या भेसळीपेक्षा थेट जीवाशी संबंध असणारी आहे. त्यावर अतिशय सशक्त आणि दहशत निर्माण करेल असा कायदा हवा. दुर्दैवाने लोकशाहीत माणसांचा समूह मारला तरी सुद्धा फाशीची शिक्षा नाकारली जाते. तिथे एकटा दुकटा दूध पिऊन दीर्घ आजाराने मेला तर त्याची कोण दाद फिर्याद घेतो, ही परिस्थिती असताना काही ठिकाणी रासूका सारख्या कायद्यांचे प्रयोग झाले. मात्र कोर्टाच्या टेबलांवरती हे असे कायदे टिकत नाहीत, हाही आजवरचा इतिहास आहे आणि म्हणून आता महाराष्ट्र या गोष्टीत आघाडीवरती आला आहे. भारतातल्या अनेक कायद्यांच्या बाबतीत महाराष्ट्राने पहिले पाऊल टाकले आहे. त्यात विशेषतः दूध भेसळी विषयीचा आता एक अतिशय कडक कायदा येतो आहे. सर्वसामान्य माणसाने भेसळी विरोधात कायदा हातात घेण्यापूर्वी जर हा कायदा खरोखरच रस्त्यावर आणि कोर्टाच्या टेबलावरती टिकला तरच अन्यथा भेसळीच्या विरोधात एक मोठी दंगल नजीकच्या काळात बघायला मिळेल.

  • कैलाश म्हापदी
  • 9320673747

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

 READ / SHARE  / FORWARD 
JANATA  NEWS  xPRESS

निरंतर सेवेच्या आर्थिक मदतीकरिता 
for Donation
G pay 8108603260 

संपादक: सुबोध शाक्यरत्न  
M : 8108658970

Email- pr.janata@gmail.com