लोकसभा २०२४च्या निवडणुकीत रिपब्लिकन जनतेने सर्वच स्तरावर प्रस्थापित नेतृत्व नाकारल्याचे दिसत आहे. कारण संविधान बदलण्याचा धोका हा या निवडणुकीचा गैम चेंजर फॅक्टर ठरला. असे असले तरी रिपब्लिकन जनतेच्या हाती मात्र काहीही आलेले नाही. रिपब्लिकनमधून एकही चेहरा विशेष करून महाराष्ट्रातून लोकसभेत गेला नाही. त्यामुळे येणाऱ्या विधानसभा निवडणुकीत रिपब्लिकनांचा चेहरा दिसला पाहिजे या उद्देशाने रिपब्लिकन जनतेची एकजूट होणे गरजेचे आहे. त्याचा प्रयत्न आम्ही भंडारा येथून केला आहे आणि संपूर्ण महाराष्ट्रात ही रिपब्लिकन ऐक्याची वज्रमूठ बांधण्यासाठी आम्ही प्रयत्नशील असल्याचे प्रतिपादन चंद्रशेखर टेंभूर्णे यांनी केले. या करीता एकीकृत रिपब्लिकन समितीच्या माध्यमातून अनेक रिपब्लिकन नेत्यांची भेटी घेण्यात आल्या असून मागील महिन्यात अनेक रिपब्लिकन नेत्यांसोबत आणि त्यांच्या प्रतिनिधींसोबत नागपूरात बैठक संपन्न झाली. त्यानंतर आज मुंबईत नायगाव येथे दुसरी बैठक संपन्न झाली. या बैठकीत रिपब्लिकन सोशालिस्ट पार्टीचे -डॉ. सुरेश माने, आजाद समाज पार्टी - प्रदेशाध्यक्ष आनंद लोंढे, राजेंद्र गवई गटाचे आनंद खरात, राजरत्न आंबेडकर गटाचे - सिद्धार्थ सपकाळ यांनी आपला पाठिंबा दर्शवला. त्यामुळे येणाऱ्या विधानसभेच्या निवडणुका जाहिर होईपर्यंत सर्वच गटा-तटाचे नेते या एकीकृत समितीमध्ये सहभागी होतील असा आशावादही टेंभूर्णे यांनी व्यक्त केला.
एकीकृत रिपब्लिकन समितीच्या वतीने मुंबई मराठी पत्रकार संघ येथे १७ ऑगस्ट रोजी प्रसार माध्यमांना याबाबत माहिती देण्यात आली. यावेळी टेंभुर्णे याच्यासोबत अमृत बनसोड, गर्जना जनक्रांती संघटनेच्या रेशम भोयर, रोशन जांभुळकर, डॉ. सुरेश खोब्रागडे, प्रा.रमेश जांगळे, आसित बागडे, दिलीप वानखेडे, विजय भोवते, शिवदास गजभिये, संजीव भांबोरे आणि राजेश मडामे आदी मान्यवर उपस्थित होते.
बहुजन समाज शासनकर्ती जमात व्हायला हवे असे भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे स्वप्न होते. तेच स्वप्न साकार करण्याचे ध्येय उराशी बांधून आम्ही नागपूर, भंडारा येथून मुंबईत आलोय. राज्यातील प्रत्येक जिल्ह्यातील आंबेडकरी जनतेला आणि नेत्यांना एकाच विचारपीठावर आणण्याचे काम एकीकृत रिपब्लिकन समितीने सुरु केले आहेत. त्यास उत्तम यश येत आहे. याचा फायदा आगामी विधानसभा निवडणुकीत नक्कीच होईल. आज रोजी राज्यात ५० पेक्षा अधिक प्रभावशाली आंबेडकरवादी संघटना आहेत. ज्या लोकसभा, विधानसभा, स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत आपले उमेदवार उभे करीत असतात. मात्रआंबेडकरी मतांची विभागणी होत असल्याने एकही गट आपल्या उमेदवारांची अमानत रक्कम सुद्धा वाचवू शकत नाही. ही दुर्दैवाने वस्तुस्थिती आहे. राखीव जागेवरही तीच परिस्थिती आहे.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी स्थापन केलेल्या रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया या राष्ट्रीय पक्षाची सध्या वाताहत झाली आहे. तो पक्ष गटातटात विखुरला गेला आहे. पक्षाची अनेक शकले पडली आहेत. याच संधीचा फायदा घेऊन आंबेडकरी समाजातील समूहांवर अन्याय अत्याचार होत आहे. आगामी विधानसभा निवडणुकीत समाजाला एकसंघ ठेवण्यासाठी गटातटात विखुरलेल्या आंबेडकरी नेत्यांचे ऐक्य व्हावे यासाठी या सर्व नेत्यांना एकाच व्यासपीठावर आणण्याचा प्रयत्न सुरू केला आहे. जर हे आंबेडकरी नेते एकत्र आले नाही तर त्यांच्या घरासमोर बसून आंदोलन करण्यात येईल. तसेच येणाऱ्या निवडणुकीत जनजागृती करून त्यांना कायमचे घरी बसवण्याचे कामही जनतेच्या माध्यमातूनच केले जाईल असा इशाराही टेंभुर्णे यांनी दिला.
नागपूरहून आलेल्या गर्जना जनक्रांती संघटनेच्या रेशम भोयर आपले मत व्यक्त करताना म्हणाल्या नोकरीतील आरक्षण खाजगीकरणाच्या नावाने संपवण्यात आले आहे. सुप्रीम कोर्टाने आरक्षणात वर्गीकरण करून पुन्हा एसटी, एससीचे आरक्षण धोक्यात आलेले आहे. विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती दिल्या जात नाहीत. मागासवर्गीय महिलांवर तर दिवसेंदिवस अत्याचार वाढतच आहेत. त्यांना न्याय मिळत नाही. तर दुसरीकडे सामाजिक दुही वाढत असून अन्याय, अत्याचाराचे प्रमाण वाढतच आहे. अशा अनेक समस्या असून सुद्धा लोकसभेत किंवा विधानसभेत राखीव जागेवर निवडून येणारे प्रतिनिधी याविरोधात आवाज उठवत नाहीत. आंबेडकरी समाजाच्या किंवा इतर मागास समाजाच्या प्रश्नाला वाचा फोडण्यासाठी आंबेडकरवादी पक्षाचे प्रतिनिधी संसदेत किवा विधानसभेत गेल्याशिवाय एसी, एसटी तसेच इतर मागासवर्गीय समाजाच्या समस्या सुटू शकणार नाही हे धडधडीत सत्य समाजासमोर आले आहे. काँग्रेस, राष्ट्रवादी, काँग्रेस, भाजप, शिवसेना किवा इतर पक्षाकडून राखीव जागेतून निवडून येणारे प्रतिनिधी हे आंबेडकरी समाजाचे प्रतिनिधित्व न करता ज्या पक्षाच्या तिकीटवर निवडून आलेत त्याच पक्षाचा प्रोटोकॉल राबविण्यात मग्न असतात. यामुळे आंबेडकरी समाजाचे प्रश्न आजही भिजत घोंगडयासारखे जसेच्या तसे पडून आहेत. आंबेडकरी समाजाला विविध कल्याणकारी योजनांवरील निधी दिवसेंदिवस कमी केल्यामुळे समाजात नाराजी पसरलेली आहे. स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवात समाज मागे पडत आहे म्हणून राज्यात आंबेडकरवादी सर्व गटांना एकत्रित करून राज्यात एक शाश्वत आंबेडकरवादी पक्ष स्थापन करणे आवश्यक असल्याचे मत भोयर यांनी व्यक्त केले.
0 टिप्पण्या