कोल्हापूरच्या संगीतसूर्य केशवराव भोसले नाट्यगृहाला ८ ऑगस्ट रोजी रात्री आग लागली. या नाट्यगृहाची वास्तू खुद्द छत्रपती शाहू महाराजांच्या पुढाकारानं बांधण्यात आली. संगीत, रंगभूमीची बीजंही याच वास्तूत रुजली होती. अशा या ऐतिहासिक नाट्यगृहाच्या उभारणीकरिता शासनाकडून २० कोटींची आर्थिक मदत देणार असल्याची मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी घोषणा केली असून ऐतिहासिक बाज कायम ठेवून पूर्वी होतं तसं नाट्यगृह युद्धपातळीवर पुन्हा उभारण्याची ग्वाही देखील शिंदे यांनी दिली. राजर्षी छत्रपती शाहू महाराजांनी रोमच्या धर्तीवर संगीतसूर्य केशवराव भोसले नाट्यगृह भक्कमपणे उभारलं होतं, हे नाट्यगृह कोल्हापुरातील ऐतिहासिक नाट्यगृह आहे. या नाट्यगृहाशी कलाकार, रसिक आणि कोल्हापुरकरांचं जिव्हाळ्याचं नातं होतं. या भावनांचा विचार करून हे नाट्यगृह लवकरात लवकर उभारण्यासाठी प्रयत्न करण्यात येतील. या ऐतिहासिक नाट्यगृहासाठी शासनाकडून २० कोटींची आर्थिक मदत देणार अशी घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी कोल्हापूर येथे केली. त्यांनी आगीने नुकसान झालेल्या भागाची पाहणी केली.
यावेळी मुख्यमंत्री म्हणाले, ८ ऑगस्ट रोजी केशवराव भोसले नाट्यगृह आगीत जळून खाक झालं ही अतिशय दुर्देवी घटना आहे. हे नाट्यगृह युध्दपातळीवर कोल्हापुरवासियांसाठी पुन्हा उभे करण्यासाठी महानगरपालिकेने तयार केलेल्या आराखड्यानुसार २५ कोटी रूपयांची गरज आहे. नाट्यगृहाचा विमा ५ कोटींचा होता. उर्वरीत रक्कम शासनाकडून दिली जाईल. यावेळी कोल्हापूर जिल्ह्याचे पालकमंत्री हसन मुश्रीफ, राज्य उत्पादन शुल्क मंत्री शंभूराज देसाई, राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष राजेश क्षीरसागर, महाराष्ट्र कृषी शिक्षण व संशोधन परिषदेचे उपाध्यक्ष प्रकाश आबीटकर, जिल्हाधिकारी अमोल येडगे, विशेष पोलीस महानिरीक्षक सुनील फुलारी, कोल्हापूर महानगरपालिका आयुक्त डॉ. के. मंजूलक्ष्मी, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी कार्तिकेयन एस., पोलीस अधीक्षक महेंद्र पंडित तसेच विविध विभागांचे अधिकारी, स्थानिक कलाकार उपस्थित होते.
उपस्थित माध्यमांशी संवाद साधून त्यांच्यामार्फत त्यांनी कोल्हापूरमधील नागरिकांना आवाहनही केले. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले, नाट्यगृहे अनेक असतात पण काही नाट्यगृहांशी कलावंत आणि श्रोत्यांचं जिव्हाळ्याचं नातं असतं. जशा कोल्हापूरवासियांच्या या नाट्यगृहाशी भावना जोडल्या आहेत त्याप्रमाणे आमच्याही भावना जोडल्या गेल्या आहेत. अनेक कलावंताची मागणी आहे की, हे नाट्यगृह जसं पूर्वी होतं तसंच पुन्हा उभं राहावं. मदतीसाठी मला खूप फोन आले, खूप मेसेजेस आले. शासन हे सर्वसामान्यांना न्याय देणारं असून कलावंत आणि श्रोत्यांचादेखील आदर करणारं शासन आहे. ते पुढे म्हणाले, स्थानिक कलावंतांशी संवाद साधल्यानंतर नाट्यगृहाशी भावनिक नातं किती घट्ट होतं याची एक प्रचिती येते. नुकसानग्रस्त झालेल्या नाट्यगृहासाठी उच्चस्तरीय चौकशी समिती नेमली जाईल असे आश्वासनही त्यांनी यावेळी दिले. ते म्हणाले, याबाबत फॉरेन्सिंक विभाग व पोलीस विभाग या घटनेची चौकशीही करीत आहेत. परंतु हे नाट्यगृह पुन्हा उभे राहणं हे महत्त्वाचं आहे. चौकशी होईल आणि जे दोषी असतील त्याच्यावर पुढे कारवाईही होईल.
1912 मध्ये राजर्षी छत्रपती शाहू महाराजांनी युरोपमधील इटलीला भेट दिली होती. या दौऱ्यात राजर्षी शाहू महाराजांना रोम शहरातील ऑलिम्पिक मैदान तसंच त्यालगत नाट्यगृह दिसलं. असंच नाट्यगृह उभारण्यासाठी शाहू महाराजांनी पुढाकार घेऊन कोल्हापुरात नाट्यगृह तसंच क्रीडांगण उभारलं. त्याचप्रमाणे करवीर नगरीच्या खासबागेत कुस्ती मैदान उभारलं. हा त्यावेळच्या पॅलेस थिएटरचा आणि आताच्या संगीतसूर्य केशवराव भोसले नाट्यगृहाचा सुमारे 110 वर्षांचा इतिहास आहे. गेल्या शंभर वर्षांहून अधिक काळ याच मंचावर मराठी रंगभूमीच्या अनेक कलाकारांनी आपली कला सादर करून नाव कमावलं आहे. कोल्हापुरात नाट्यगृहाची उभारणी झाल्यानंतर 1921 मध्ये संगीतसूर्य केशवराव भोसले तसंच बालगंधर्व यांनी संयुक्त मानापमान या नाटकात भूमिका साकारली होती. तसंच मराठी रंगभूमीत ज्या प्रसिद्ध नाटकांची रसिक मनावर छाप सोडली, त्यातील अश्रूंची झाली फुले, वाहतो ही दुर्वांची जोडी, सूर्यास्त, तो मी नव्हेच, जंगली कबूतर, इथे ओशाळला मृत्यू, एका लग्नाची गोष्ट आदी नाटकांचे विक्रमी प्रयोग झाले. आमने-सामने या नाटकाचा शेवटचा प्रयोग या ठिकाणी रंगला होता. कोल्हापूरच्या केशवराव भोसले नाट्यगृहाला पाय लागले नाही, असा एकही कलाकार तंत्रज्ञ नाही. केशवराव भोसले, चंद्रकांत गोखले, प्रभाकर पणशीकर, जयमाला शिलेदार, निळू फुले, विक्रम गोखले, अशोक सराफ, मंगला बनसोडे, विठाबाई नारायणगावकर, जगदीश खेबुडकर, दादा कोंडके, आशा काळे, उषा चव्हाण, उषा नाईक, पद्मा चव्हाण, लक्ष्मीकांत बेर्डे, प्रशांत दामले, प्रशांत दळवी, सुधा चंद्रन, भरत जाधव आदी दिग्गज कलाकारांनी सादरीकरण केलंय. केशवराव भोसले नाट्यगृहाच्या भिंती, विंगा, सभागृह आणि संपूर्ण परिसरानं या कलावंतांच्या अजोड सादरीकरणाचं संचित जपून ठेवलं. इतकंच नाही, साक्षात शाहू महाराजांची पायधूळ या नाट्यगृहाला लागली होती.
0 टिप्पण्या