कोकणातील आंबेडकरी चळवळीमधील साहित्यिक - कलावंत चळवळीचा चेहरा असलेल्या अपरान्त साहित्य कला प्रबोधिनीच्या वतीने राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय, राज्यस्तरीय पुरस्कार प्राप्त झालेल्या कोकणातील साहित्यिक, कलावंतांच्या सत्कार सोहळ्याचे आयोजन क्रांतीभूमी महाड येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक सभागृह येथे प्रबोधिनीचे कार्याध्यक्ष प्रा. आनंद देवडेकर यांच्या अध्यक्षतेखाली करण्यात आले होते. कार्यक्रमाच्या स्वागताध्यक्षस्थानी अपरान्त साहित्य कला प्रबोधिनी, रायगड जिल्ह्याचे अध्यक्ष डॉ. संजय खैरे होते. विचारमंचावर प्रबोधिनीचे केंद्रीय अध्यक्ष व जेष्ठ साहित्यिक ज. वि. पवार, सरचिटणीस सुनील हेतकर, संदेश पवार, कोषाध्यक्ष दीपक पवार, उपाध्यक्ष भावेश लोखंडे, संजय गमरे, मार्गदर्शक 'सोनबा' कार रमाकांत जाधव, सामाजिक कार्यकर्ते आणि सुरबानाना टिपणीस यांचे नातू मिलिंद टिपणीस आदी मान्यवर उपस्थित होते. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शाहीर गंगाधर साळवी आणि प्रबोधिनीचे सरचिटणीस सुनील हेतकर यांनी केले . प्रारंभी पत्रकार दीपक पवार, मारुती सकपाळ, गीतांजली साळवी व स्थानिक शाहीर कलावंतांनी आपापली गीते सादर केली. कार्यक्रमाला बहुसंख्य साहित्यिक, कलावंत आणि नागरिकही मोठ्या संख्येने उपस्थित होते.
प्रमुख पाहुणे आंतरराष्ट्रीय कीर्तीचे छायाचित्रकार पद्मश्री सुधारक ओलवे आपल्या भाषणात म्हणाले, महाड ही क्रांतीभूमी आहे. या क्रांतीभूमीत डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी क्रांती घडवली. अजून तीन वर्षांनी महाडच्या सत्याग्रहाला शंभर वर्ष पूर्ण होतील. त्यानिमित्ताने पाणी आणि जाती यांचा सहसंबंध आपण अभ्यासायला हवा, अपरान्त प्रबोधिनीचे काम खूप चांगले चालले आहे. त्यामधून नवनवे साहित्यिक, कलावंत घडावेत. त्यांनी सामाजिक प्रश्नांचा अभ्यास करुन नवे नवे विचार मांडले पाहिजेत, असे ते म्हणाले. तर साहित्यिक ज. वि. पवार यांनी आपल्या भाषणात महाडमध्ये होणाऱ्या तिसऱ्या संगीतीची तयारी खूप चांगल्या प्रकारे करुन ही संगीती ऐतिहासिक केली पाहिजे, असे सांगितले. तसेच महाडच्या सामाजिक ऐतिहासिक व राजकीय पार्श्वभूमीचाही उल्लेख केला. तसेच बार्टी मार्फत डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्यावरील सर्वभाषिक कविता संग्रह- खंड प्रकाशित करण्यात येणार आहे, त्यासाठी सर्वांनी एक कविता माझ्याकडे ईमेल वर पाठवावी, असे आवाहन केले.
अध्यक्षीय भाषणात प्रा. आनंद देवडेकर यांनी अपरान्त साहित्य कला प्रबोधिनीने सुरू केलेला साहित्य कलेचा जागर हा पुढच्या काळात सीमारेषा ओलांडूनही पुढे जाऊ शकेल. त्यासाठी सर्वांनी एकजुटीने प्रयत्न करणे आवश्यक आहे, तसेच आपली वैचारिक भूमिका आणि बांधिलकी ठाम असायला हवी. त्यात कोणतीही तडजोड करता कामा नये, हे लक्षात घ्यायला हवे. आता तिसरी सम्यक साहित्य कला संगीती महाडच्या क्रांतीभूमीत होणार आहे. त्याचीही योग्य तयारी स्थानिक कार्यकर्त्यांनी करण्याची आवश्यकता असल्याचे प्रतिपादन केले.
कार्यक्रमाच्या प्रारंभी डॉ. बाबासाहेब आंबेडकर व तथागत भगवान गौतम बुद्ध यांच्या प्रतिमांसमोर अभिवादन करून, दीपप्रज्वलन करण्यात आले. तद्नंतर उपस्थित सर्व मान्यवर पाहुणे व संस्थेचे पदाधिकारी यांचा सन्मान करण्यात आला. प्रमुख पाहुणे पद्मश्री सुधारक ओलवे यांचा साहित्यिक ज. वी. पवार यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. तसेच ज. वी. पवार यांना आंतरराष्ट्रीय पुरस्कार मिळाल्याबद्दल सुधारक ओलवे यांच्या हस्ते त्यांचा सत्कार करण्यात आला. तसेच साहित्यिक डॉ. श्रीधर पवार, शाहीर मारुती सकपाळ , इंजि. अनिल जाधव, कलावंत अशोक चाफे, कवी प्रा. सिद्धार्थ गोपाळ तांबे, लेणी संवर्धक प्रफुल्ल पुरळकर, कवयित्री स्नेहा विठ्ठल कदम, अभिनेता निवेदक निलेश पवार, कलावंत चंद्रकांत घाडगे , साहित्यिक दीपक पाटील, कवी सुदत्ता गोठेकर यांचा प्रबोधिनीच्या वतीने सुधारक ओलवे यांच्या हस्ते विशेष सत्कार करण्यात आला. प्रारंभी, सरचिटणीस संदेश पवार यांनी कार्यक्रमाचे प्रास्तविक करतांना संस्थेच्या कामाचा आढावा घेतला. स्वागताध्यक्ष डॉ संजय खैरे यांनी उपस्थितांचे स्वागत केले. सर्व सत्कारमुर्तीनी समयोचीत मनोगत व्यक्त केले.
0 टिप्पण्या