वादग्रस्त म्हणून चर्चेत असलेल्या मे. अदानी पोर्टस अँड लॉजिस्टीक रेल्वे प्रस्तावीत मालगाडी प्रकल्प विश्रांतीनंतर पुन्हा चर्चेत आला आहे. अष्टमी ते आगरदांडा रेल्वे मालगाडी प्रकल्पाचे काय झाले ? याची पुन्हा नव्याने चर्चा सुरू झाली आहे. प्रस्तावीत रेल्वे प्रकल्प होणार हे अधिक स्पष्ट झाले. मात्र रेल्वे संघर्ष समितीच्या कोणत्याच मागण्या निवेदनावर अद्याप समाधानकारक तोडगा नाही. मोबदला किती यांसह नोकरी अन्य सुविधांवर प्रचंड गाफीलता आहे. दुसरीकडे वरकस पट्टयातील कांडणे खुर्द, बुद्रुक गावानजीकच्या सुपीक भातशेती जमिनी वगळून रेल्वे मार्ग खाडी पट्टा जंगलातून जावा. त्यावरच्या मुद्द्यांवर मार्ग काढला जाईल असे स्पष्ट आश्वासन खा सुनिल तटकरे यांच्या समोर अदानी ग्रुपच्या अधिकाऱ्यांनी दिले होते. ते आश्वासन न पाळता शेतकऱ्यांच्या सातबाऱ्यावर परस्पर नोंदणी टाकल्याने प्रकल्पग्रस्त शेतकरी प्रचंड आक्रमक झालेत. त्यामुळे मे. अदानी पोर्टपुढे संबधित प्रशासन झुकले असल्याचा गंभीर आरोप संघर्ष समितीचे विभागीय नेते विनायक धामणे यांनी केला.
मुरुड व इतरत्र सर्वच शेतकऱ्यांच्या सातबाऱ्यावर नोंदी टाकण्यात आल्या, मार्ग बदलला की नोंदी रद्द होतील. अधिसूचनेनुसार नोंदी टाकल्या जातात. तरीही संबंधीत शेतकऱ्यांचे म्हणणे प्रस्ताव पुन्हा एकदा एमआयडीसी, मे अदानी प्रशासनाला पाठविण्यात येईल अशी प्रतिक्रिया प्रांताधिकारी ज्ञानेश्वर खुटवड यांनी दिली तर कांडणे खुर्द, बुद्रुक, हाळ, भालगाव सर्व विभाग शेतकऱ्यांचे समाधान होईल अशी स्पष्टता नसल्याने आता नेमके काय होईल ? याकडे पुन्हा एकदा सर्वांचे लक्ष लागले आहे. मे. अदानी पोर्टची रेल्वे मालगाडी प्रकल्प होणार की नाही, मार्ग बदलणार का ? याला शेतकऱ्यांच्या सातबारा नोंदीने तूर्तास पूर्णविराम मिळाला. बहुचर्चित कांडणे खुर्द, बुद्रुक हद्दीतील सुपीक जमिनी वगळून जंगल मार्गाने रेल्वे मार्ग नेण्यात यावे. अशी शेतकऱ्यांची सुरुवातीपासून मागणी आहे, त्यात तांत्रिकदृष्ट्या फारसा अडथळा नाही. यावर खा सुनिल तटकरे यांच्या उपस्थितीत सादरीकरण झाले. मार्ग बदलण्यावर आम्ही अभ्यास करतो, तोडगा निघत नाही तोपर्यंत शेतकऱ्यांच्या सातबाऱ्यावर कोणत्याच नोंदी टाकल्या जाणार नाही असे स्पष्ट आश्वासन मे अदानीच्या अधिकाऱ्यांनी दिले होते. मात्र मे अदानीसमोर काही दिवसांपूर्वी प्रशासन झुकला असल्याचे समोर आल्याने शेतकऱ्यांनी संताप व्यक्त केला आहे.
कांडणे खुर्द, बुद्रुक हद्दीतील असंख्य शेतकऱ्यांच्या सातबारा व फेरफार वर ई पेन्सिलने नोंदी टाकण्यात आल्याने विभागीय शेतकरी कमालीचे आक्रमक झाले आहेत. खा सुनिल तटकरे यांची शेतकऱ्यांनी भेट घेतली. भेटीत अधिकाऱ्यांजवळ बोलून नोंदी काढण्यात येतील असे ठोस आश्वासन तटकरे यांनी दिल्याची माहिती विनायक धामणे, प्रकाश कांबळे यांनी दिली. प्रत्यक्षात नोंदी काढण्यात न आल्याने अखेर प्रकाश कांबळे यांनी ग्रामस्थांच्या वतीने आमरण उपोषणाचा ईशारा दिल्याने एकच खळबळ उडाली आहे. शेतकऱ्यांना नोटीस काढल्या. नोटीसीची मुदत १५ दिवस असताना, त्यावर हरकती घेतल्या असता नोंदी टाकण्यात आल्या, असा गंभीर आरोप प्रकाश कांबळे यांनी प्रांताधिकारी रोहा यांना आमरण उपोषण संदर्भात दिलेल्या निवेदनात केला आहे. ७ दिवसाच्या आत सातबारावरील नोंदी न हटविल्यास विभागीय शेतकरी प्रकल्पग्रस्तांच्या वतीने आमरण उपोषणाला बसणार असा ईशारा प्रकाश कांबळे यांनी दिला आहे. आम्हा ग्रामस्थांचा प्रकल्पाला विरोध नाही. परंतू उपजिवीकेचे साधन संपूर्ण भातशेती प्रकल्पात जात आहे. रेल्वे मार्ग गावाच्या मागून जंगलातून अन्य मार्गाने जाऊ शकतो असे निवेदनात नमूद केले आहे. सातबाऱ्यावरील नोंदी आश्वासन दिल्याप्रमाणे तातडीने काढण्यात याव्या अशी मागणी करण्यात आली आहे. यावर अधिसूचनेनुसार नोंदी टाकण्यात आल्यात. तरीही ग्रामस्थांचे म्हणणे पुन्हा प्रस्तावातून संबंधितांना पाठविले जाईल अशी प्रतिक्रिया प्रांताधिकारी ज्ञानेश्वर खुटवड यांनी दिली. दरम्यान, उपोषणकर्ते शेतकरी प्रकाश कांबळे नेमकी काय भूमिका घेतात, प्रशासन लागलीच काय मार्ग काढतो ? हे पाहावे लागणार आहे.
0 टिप्पण्या