मुंबईकरांच्या समस्यांकडे महायुती सरकार लक्ष देत नाही, महानगरपालिकेत प्रशासन राज सुरु असून प्रशासनाच्या मदतीने मुंबईकरांच्या कष्टाच्या पैशांवर दरोडा टाकला जात आहे. वाढीव दराने टेंडर काढून त्यातून टक्केवारी कमावली जात आहे. नालेसफाई घोटाळा, शिक्षण खात्यात घोटाळा, खड्डे बुजवण्याच्या कामात घोटाळा, आता तर कुकर घोटाळाही केला आहे. महायुती सरकार हे कंत्राटदार, बिल्डर यांच्यासाठी काम करते, मुंबईकरांसाठी नाही. काँग्रेस पक्ष मुंबईकरांचे प्रश्न हाती घेऊन आवाज उठवत आहे. मुंबईची जनता महायुती बरोबर नाही हे लोकसभा निवडणुकीने दाखवून दिले आहे. आता विधानसभा निवडणुकीतही मुंबईतील जनता या महाभ्रष्ट महायुती सरकारला घरचा रस्ता दाखवेल हा विश्वास प्रदेश काँग्रेसचे सरचिटणीस व प्रवक्ते सचिन सावंत यांनी व्यक्त केला. मुंबई न्याय यात्रेबद्दल पत्रकार परिषदेच्या सुरुवातीला काँग्रेस प्रवक्ते आणि माध्यम समन्वयक सुरेशचंद्र राजहंस यांनी आतापर्यंत झालेल्या यात्रेबद्दल थोडक्यात माहिती दिली. या पत्रकार परिषदेला काँग्रेस प्रवक्ते सचिन सावंत, सुरेशचंद्र राजहंस, मुंबई काँग्रेसचे खजिनदार संदीप शुक्ला, शकील चौधरी उपस्थित होते.
मुंबईकरांना भेडसावत असलेल्या समस्या, मुद्दे, प्रश्न घेऊन मुंबई काँग्रेसच्यावतीने न्याय यात्रा आयोजित केली होती. या यात्रेची माहिती सचिन सावंत यांनी पत्रकारांना दिली. यावेळी ते पुढे म्हणाले की, मागील ७ दिवसांमध्ये कुलाबा, मुंबादेवी, मलबार हिल, सायन कोळीवाडा, वांद्रे पश्चिम, खेरवाडी, वांद्रे पूर्व, चांदिवली, ओशिवरा, कुर्ला या विधानसभा मतदार संघातून ही न्याय यात्रा निघाली. न्याय यात्रेला मुंबईकरांनी चांगला प्रतिसाद दिला, स्थानिक लोकांशी संवाद साधत त्यांच्या समस्या जाणून घेण्याचा आम्ही प्रयत्न केला. जनतेमध्ये महायुती सरकारविरोधात तीव्र संताप आहे, नाराजी आहे याची लोकांशी बोलताना प्रचिती आली.मुंबईतील विविध मतदारसंघात एसआरएच्या योजना अनेक वर्षांपासून प्रलंबित आहेत, या लोकांना भाडे मिळत नाही, योजनेचे बिल्डर बदलले जातात पण एसआरएचे प्रकल्प काही मार्गी लागत नाहीत. मलबार हिल, वांद्रे पश्चिम भागातील SRA प्रकल्प २५ वर्षांपासून प्रलंबित. मोकळ्या जागा नाहीत, खेळाचे मैदान नाही, रस्त्यांवर खड्डे पडले आहेत. नालेसफाई व्यवस्थित केली नसल्याने पावसाचे पाणी घरांमध्ये शिरते.झोपडपट्टी भागात पिण्याचे पाणी मिळत नाही, शौचालयांची अवस्था बिकट आहे.पवईतील भीमनगर झोपडपट्टीतील जवळपास ६०० गोरगरिब कुटुंबाच्या झोपड्या पोलीस बंदोबस्तात तोडल्या, यावेळी महिला, मुले यांना पोलिसांनी मारहाण केली. भीमनगर प्रकरणाला तीन महिने झाले अजून दोषी अधिकाऱ्यांवर कारवाई झालेली नाही आणि या ६०० कुटुंबांचे पुनर्वसनही झालेले नाही, नुकसान भरपाईही दिलेली नाही. बिल्डरांसाठी मलबार हिल, गिरगाव, ताडदेव, खेतवाडी या भागातील आठ मंदिरे पाडली आहेत.प्राचिन मंदिरे पाडून बिल्डरांच्या घशात जागा घातल्या जात आहेत. यामागे कोणता बिल्डर, मंत्री आहे हे मुंबईकरांना माहित आहे, असेही सावंत म्हणाले.
0 टिप्पण्या