एका बाजूला समाजात आत्मनिर्भर होण्याच्या प्रगतीच्या गोष्टी सांगितल्या जातात ,पण त्याच वेळी समाजात जातीय आणि धार्मिक द्वेष वाढेल असे पर्यावरण तयार केले जाते ही खूप मोठी विसंगती आहे. आपले जीवन सुखासमाधाने जगावे वाटणे ही सर्वांची इच्छा असली तरी भोवताली भेदभावाची जळमटे मोठ्या प्रमाणात निर्माण झाली आहेत. त्यामुळे प्रगतीपेक्षा अधोगतीच्या रस्त्याने समाज जात आहे. इतिहासातील अहंकार कुरवाळत जगण्याचे दिवस आता योग्य असणार नाहीत.वर्तमानकाळ चांगला व्हायचा असेल तर तरुण पिढीने धार्मिक द्वेष,हिंसा या पासून अलिप्त राहून बुद्धांच्या विचारांचे अनुसरण करावे. त्याने स्वतःचे व देशाचे मंगल होईल’ असे विचार छत्रपती शिवाजी कॉलेजचे मराठी विभाग प्रमुख प्रा.डॉ.सुभाष वाघमारे यांनी व्यक्त केले .ते सेवा सामाजिक विकास संस्था सातारा यांच्या वतीने आयोजित केलेल्या ‘भगवान गौतम बुद्धांचे विचार आणि व्यक्तिमत्व विकास’ याविषयावर व्याख्यान देताना विद्यार्थ्यांशी बोलत होते. अध्यक्षस्थानी समाज कल्याण सहाय्यक आयुक्त नितीन उबाळे हे होते. या वेळी सेवा सामाजिक विकास संस्था सातारा यांचे अध्यक्ष युवराज भांडवलकर, युवा वक्ते विशाल कांबळे,रमेश भोसले , जगदाळे या मान्यवरांची उपस्थिती होती.
‘अत्त दीप भव’ या बोधवाक्याचा अर्थ सांगताना ते पुढे म्हणाले की मनुष्य जीवनात प्रत्येक व्यक्तीने स्वतः विचार करून आपले चांगले केले पाहिजे. स्वयंप्रकाशित झाले पाहिजे. तथागत गौतम बुद्ध यांनी पंचशील हे खूप आवश्यक मानले. प्रामाणिक व विश्वासू राहणे ,हिंसा न करणे ,कोणतेही नशा वाढवणारे व्यसन न करणे ,व्यभिचार न करणे,चोरी न करणे इत्यादी वचने ही समाजात रुजली तर भारत एक जगातील अतिशय चांगला देश होईल. जीवनात मरेपर्यंत शिक्षण घेत राहिले पाहिजे. बुद्धांचा बहुजन हिताय व बहुजन सुखाय हा मार्ग आहे .पण आज आर्थिक आणि सामाजिक विषमतेने आणि अंधश्रद्धेने देशातील वातावरण प्रदूषित झाले आहे. म्हणूनच वैज्ञानिक दृष्टीकोन बरोबर सामाजिक न्यायासाठी बुद्धाची करुणा खूप आवश्यक आहे. आपण स्वावलंबी न राहता मिळेल तेवढे फुकट खाण्याने माणूस परावलंबी होतो. आणि स्वातंत्र्य,सन्मान हरवून बसतो. म्हणून प्रत्येक माणसाने आळसात न राहता रोजचा दिवस हा कष्टानेच जगला पाहिजे.ज्याने स्वतःचे व समाजाचे हित होईल. कर्मवीर भाऊराव पाटील यांनी स्वतःचे सर्व जीवन समाजाला शिक्षण देऊन स्वावलंबी बनवून रयतेचे सेवक तयार करण्यासाठी समर्पित केले.
आज अनेकजण सुशिक्षित बेकार असल्याने एक प्रकारचे अस्वास्थ्य तरूण पिढी अनुभवत आहे. पोटापाण्याच्या प्रश्नाने हैराण झालेले जीव आज काळजीत दिसतात. पैसे नसल्यामुळे शिक्षण अनेकजण सोडून देत आहेत. याना योग्य दिशा देणारे कर्तबगार नेतृत्व आज दिसत नाही.प्रेमधर्मापेक्षा द्वेष धर्म वाढवणारे लोक समाजात वाढले आहेत. अशावेळी स्वतःचे मन स्थिर करून चांगल्याचा शोध सतत घेत गेले पाहिजे. विद्यार्थ्यांनी प्रतिकूल परिस्थितीत रडण्यापेक्षा जीवनात अडचणीशी झुंज देत हितकारी मार्ग काढलेच पाहिजेत .शासनाच्या विविध स्कॉलरशिपचा लाभ घेऊन परदेशी शिक्षणाच्या संधी समजावून घ्याव्यात. मानसन्मानाने जगण्यासाठी कौशल्यांचा विकास करावा. आजच्या तरुण पिढीने धार्मिक द्वेषापासून दूर राहावं.सर्वधर्मसमभाव प्रेमभाव,आणि करुणा भाव मनात आणि समाजामध्ये रुजण्यासाठी बुद्ध विचारांचा अवलंब करावा .बाबासाहेब आंबेडकर यांच्यासारखे प्रयत्न परिश्रम व बुद्धीचा सदुपयोग घेऊन पुढे जावे.आज शिक्षकाने सदाचारी राहून आपल्या नैतिक प्रभावाने विद्यार्थ्यांना वाईट गोष्टीपासून अलिप्त केले पाहिजे अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. दहावीत पाच विषयात नापास झालेला विद्यार्थी, एका हॉटेलमध्ये काम करणारा एक मुलगा ते रयत शिक्षण संस्थेच्या विविध महाविद्यालयामध्ये प्राध्यापक म्हणून कार्यरत असणारा प्रवास त्यांनी सांगितला. बुद्ध विचारांच्या साथीने महापुरुषांच्या कार्याच्या प्रेरणेतून वाटचाल केल्यामुळे जीवन सुखकर झाल्याची भावना त्यांनी व्यक्त केली.लंडनमध्ये बाबासाहेब यांचे विद्यार्थी दशेतील जीवन जगाला प्रेरणादायी असल्याचे त्यांनी सांगितले.
अध्यक्षीय भाषणात समाज कल्याण सहाय्यक आयुक्त नितीन उबाळे म्हणाले कर्मवीर भाऊराव पाटील विद्यापीठात प्रवेश घेणारा प्रत्येक विद्यार्थी कर्मवीर भाऊराव पाटलांच्या विचारांचा आदर्श घेऊन ते विचार कृतीत उतरवण्यासाठी प्रयत्नशील राहणारा असावा. तसेच विद्यापीठाच्या अत्त दीप भव या ब्रीदवाक्य प्रमाणे स्वयंप्रकाशित होऊन समाजातील आर्थिक सामाजिक आणि धार्मिक विषमतेचा अंधकार दूर करणारा असावा. पूर्वी रयत शिक्षण संस्थेतील तळमळीचे शिक्षकांनी आम्हावर चांगले संस्कार केले त्याने आमची चांगली जडणघडण झाली असे ते म्हणाले.
प्रारंभी छत्रपती शिवाजी महाराज ,डॉ.बाबासाहेब आंबेडकर, लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या प्रतिमेस फुले अर्पण करण्यात येऊन अभिवादन करण्यात आले. समाज कल्याण विभागाचे सहाय्यक आयुक्त नितीन उबाळे यांनी प्रा.डॉ.सुभाष वाघमारे यांचा संविधान भेट देऊन सत्कार केला. सदर कार्यक्रमाचे आयोजन विशाल कांबळे यांच्या सहकार्याने सेवा सामाजिक विकास संस्थेने केले. कार्यक्रमाचे निवेदन विशाल कांबळे यांनी केले. यावेळी सेवा सामाजिक विकास संस्थेत प्रशिक्षण घेणारे सर्व विद्यार्थी व शिक्षक उपस्थित होते.
0 टिप्पण्या