Top Post Ad

*लावण्यवती मराठीची जननी: मोडी लिपी!*

मोडी लिपी ही मराठी भाषा लिहिण्यासाठी वापरली जाणारी लिपी आहे, जी महाराष्ट्र राज्यात बोलली जाणारी प्राथमिक भाषा आहे. तिच्या उत्पत्तीसंदर्भात अनेक सिद्धांत आहेत. २१व्या शतकातील मराठी लोकांचे असे विचार व मत आले आहे, की जर मराठी भाषेचे मूळ असलेली मोडी लिपी जर पुन्हा वापरात आणली गेली तर मराठी भाषेचा प्रभाव वाढेल. पण या विषयावर आजपर्यंत महाराष्ट्र शासनाने कोणतेही पाऊल उचलले नाही. भविष्यकाळात या विषयावर ठोस पाऊले उचलले जाईल, अशी आशा व्यक्त केली जात आहे. अलककार- श्रीकृष्णकुमार निकोडे गुरूजी ही ज्ञानवर्धक माहिती येथे देत आहेत... संपादक._


   मोडी लिपी हात न उचलता लिहिली जाते, त्यामुळे वेगाने लिहिणे सोपे जाते. यात अनेक शब्दांची लघुरुपे वापरून कमीतकमी ओळीत सारांश लिहिला जातो. यातली अक्षरांची वळणे गोलाकार असतात, त्यांमध्ये देवनागरीच्या विपरीत काना खालून वर जातो. यामुळे पुढचे अक्षर चटकन लिहिता येते. तसेच प्रत्येक अक्षराची सुरुवात आणि शेवट डोक्यावरच्या रेषेवर होते. मोडी लिपीत चिटणीसी, महादजीपंती, बिवलकरी, रानडी अशी वळणे प्रसिद्ध आहेत. पुढे घोसदार वळण येऊन त्याचा भारतातल्या इतर भागातही प्रसार झाला असे मानले जाते. असंख्य मराठी ऐतिहासिक कागदपत्रे मोडी लिपीत असून इतिहास संशोधनाकरिता मोडी जाणकारांची कमतरता भासते. मोडी लिपी ही मराठी भाषा लिहिण्यासाठी वापरली जाणारी लिपी आहे, जी महाराष्ट्र राज्यात बोलली जाणारी प्राथमिक भाषा आहे. तिच्या उत्पत्ती संदर्भात अनेक सिद्धांत आहेत. २१व्या शतकातील मराठी लोकांचे असे विचार व मत आले आहे, की जर मराठी भाषेचे मूळ असलेली मोडी लिपी जर पुन्हा वापरात आणली गेली तर मराठी भाषेचा प्रभाव वाढेल. पण या विषयावर आजपर्यंत महाराष्ट्र शासनाने कोणतेही पाऊल उचलले नाही. भविष्यकाळात या विषयावर ठोस पाऊले उचलले जाईल, अशी आशा व्यक्त केली जात आहे.
    मोडी लिपीत एक पत्र सवाई माधवराव पेशवे यांनी सेनापती महादजी शिंदे यांस दि.३०-१२-१७८४ रोजी लिहिले होते. मोडी लिपीच्या उगमाबद्दल अनेक मते व मतभेद आहेत. इतिहासाचार्य वि.का.राजवाडे व डॉ.भांडारकरांच्या मते हेमाडपंताने ही लिपी श्रीलंकेतून आणली. परंतु चांदोरकरांच्या मते ती अशोककालातील मौर्यी- ब्राह्मीचाच एक प्रगत प्रकार आहे. वाकणकर व वालावलकरांच्या मते मोडी लिपी ही ब्राह्मी लिपीचाच एक प्रकार असून हात न उचलता लिहिण्याच्या तिच्या वैशिष्ट्यामुळे इतर लिपींपेक्षा वेगळी झाली आहे. ती श्रीलंकेतून आणली गेली असावी अथवा मौर्यी लिपीवरून विकसित झाली असावी, हे म्हणणे त्यांना मान्य नाही. ही लिपी महाराष्ट्रात कमीत कमी ९०० वर्षे वापरात आहे. सर्वांत जुना उपलब्ध मोडी लेख इ.स.११८९ मधील आहे. ते पत्र पुण्याच्या भारत इतिहास संशोधक मंडळाच्या संग्रहात आहे. ती अल्पप्रमाणात का होईना सन १९५०पर्यंत लिखाणात प्रचलित होती. शेवटच्या २-३ शतकात या लिपीत अनेक फेरबदल झालेले आहेत. साधारण इ.स.१७००च्या सुमारास चिटणिसी आणि वळणे ही पूर्णपणे प्रगत झाली. यानंतर त्यात फारसे बदल दिसून येत नाहीत. ऐतिहासिक कागदपत्रांतील ही लिपी क्लिष्ट आणि वाचण्यास कठीण असते. ती पेशवाईकाळात अत्यंत उत्कर्षावस्थेत होती, असे मानले जाते. पेशवे यांच्या दप्तरातील कागदपत्रे, दस्ताऐवज पाहिले असता त्या उत्कर्षाची कल्पना येते. सुबक अक्षर, दोन ओळीतील समान अंतर, काटेकोर शुद्धलेखन हे या लेखनाचे वैशिष्ट्य आहे. छत्रपती शिवाजी महाराजांचा काळ ते उत्तर पेशवाई या काळांतील मोडीवाचनातून मराठी भाषेतील स्थित्यंतरे लक्षात येतात व मराठी भाषेचा प्रवास अभ्यासता येतो. इतिहासाचार्य राजवाडे यांच्या मताप्रमाणे ज्ञानेश्वरी लिहिली जाण्याच्या काळात मोडी संकल्पना महाराष्ट्रात येत होती. याच काळात पहिले मुस्लिम आक्रमण भारतात होत होते. लिखाणाकरिता कागदाचा वापर हा मुस्लिमांनी भारतात सुरू केला असावा, कारण कागज हा फार्सी शब्द असून या अर्थाचा संस्कृत शब्द अस्तित्वात नाही. इतिहासाचार्य राजवाडे ज्ञानेश्वरीतील ओव्यांचा हवाला देतात. देवनागरी अक्षरे आडव्या, उभ्या आणि टोकदार रेषांचा अवलंब करतात, त्यामुळे लिखाणाच्या हस्तलिखित प्रति बनवताना वेग कमी होतो. तर शिकस्तप्रमाणे गोलाकार व एकमेकांना जोडली जाणारी वळणे वापरून मोडी हस्तलिखिताचा वेळ वाचवत होती. विराम चिन्हांचा वापर इंग्रजी भाषाशी ओळख झाल्यानंतरच भारतीय लिपींत सुरू झाला.
   भारतीय टपाल सेवेच्या माय स्टँप योजने अंतर्गत मोडी लिपी राखण्यास एक प्रयत्न केला आहे. चित्रात मराठी हे मोडी लिपीमध्ये छापले गेले आहे. ती १३व्या शतकापासून २०व्या शतकाच्या मध्यापर्यंत मराठी भाषेच्या लेखनाची प्रमुख लिपी होती. महादेव यादव व रामदेव यादव यांच्या राज्यकालात- १२६०-१३०९मध्ये हेमाडपंत- खरे नांव हेमाद्रि पंडित या प्रधानाने मोडी लिपीचा विकास केला. छपाईस अवघड असल्यामुळे मोडी लिपीचा वापर मागे पडला आणि बाळबोध- देवनागरी लिपीचा वापर सार्वत्रिक सुरू झाला. हा वापर सक्तीने करण्याची सुरुवात ईस्ट इंडिया कंपनीच्या अधिकाऱ्यांनी केली. त्यानंतर मात्र दि.१७ जुलै १८०२ रोजी मोडी लिपीतून पहिल्यांदाच मुद्रण करण्यात आले. म्हणूनच आजचा १७ जुलै हा दिवस मोडी लिपीचा प्रथम मुद्रण दिन दरवर्षी साजरा होतो. इ.स.१८०२मध्ये विल्यम कॅरे या मिशनऱ्याने पंडित वैजनाथ यांच्या मदतीने पहिला मोडी लिथोग्राफ श्रीरामपूर बंगाल येथे बनवला. रघु भोसल्यांची वंशावळी, मराठी भाषा व्याकरण, मराठी कोष, नवा करार सन- १८०७. या ग्रंथांची मोडी लिपीत छपाई केली गेली. ए.के. प्रियोळकर यांनी मोडी छपाईचा इतिहास लिहिला. मोडी लिपीचे चार कालखंडांत वर्गीकरण केले आहे- यादवकालीन, शिवकालीन, पेशवेकालीन आणि आंग्लकालीन. यादवकालीन मोडी लिपी लिखाणात अक्षरे एकमेकांच्या अगदीच जवळ व उभी काढली गेली. तीच शिवकालीन शैलीत किंचित उजवीकडे झुकलेली दिसतात. या लिपीला तिरकस वळण, अधिक वर्तुळाकार आणि सुटसुटीत अक्षरे लिहिण्याचा उपक्रम छत्रपती शिवाजी महाराजांचे चिटणीस बाळाजी आवजी यांनी सुरू केला होता. तोपर्यंत लिपी ही टाकाने लिहिली जात असे. असाच प्रयत्न पुढे चालू ठेवून पेशवेकालीन शैलीत ती अगदीच रेखीव, गोलाकार, तिरकस आणि सुटसुटीत लिहिली जाऊ लागली. पेशवेकाळातील लिखाण बोरूने होत असे. १९व्या शतकाच्या उत्तरार्धात इंग्रज राजवटीत फाऊंटन पेनचा वापर सुरू झाला. बोरूने जी प्रत्येक अक्षराला जाडी-रुंदी आणि टोक येत असे, ते या फाऊंटन पेनच्या वापरात शक्य नसल्याने मोडी लिपी अगदीच गुंतागुंतीची व किचकट दिसू लागली. फाऊंटन पेनचा एकच फायदा होता, तो म्हणजे त्यात शाई बराच वेळ टिकून राही. म्हणून सध्याचे मोडी लेखक फाऊंटन पेनच्या कॅलिग्राफीच्या निब्सचा वापर करतात आणि लिखाणात काही प्रमाणात पेशवेकालीन मोडी लिपीचे सौंदर्य आणण्याचा प्रयत्न करतात.
    अलीकडे कर्नाटकात ९व्या शतकातील काही आढळलेले शिलालेख हे मोडी लिपीत असून लिपी शिकस्तामधून निर्माण झाली, या मताचे खंडण करतात. १०व्या शतकात नस्तलीकमधून शिकस्ते लिपी जन्मास आली. शिकस्ता म्हणजे मोडकी नस्तलीक होय. यावरून स्पष्ट होते की मोडी लिपीची संकल्पना ही शिकस्तामधून आली नव्हती. कारण महादेवराव, रामदेवराव किंवा हरपालदेवराव यादवांच्या कारकिर्दीत मराठी लोकांचा श्रीलंकेशी संपर्क आला नव्हता. मात्र मोडी लिपीचे नागरी, गुर्जरी म्हणजे महाजनी आणि बंगाली लिप्यांशी साधर्म्य आहे, हे कोणीही ठामपणे सांगू शकेल.
!! मोडी लिपी प्रथम मुद्रण दिनाच्या सर्वांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा !!

                        अलककार- श्रीकृष्णकुमार गोविंदा निकोडे गुरूजी.
                       रामनगर- गडचिरोली, जि. गडचिरोली.
                       फक्त व्हॉट्सॲप- ९४२३७१४८८३.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

 READ / SHARE  / FORWARD 
JANATA  NEWS  xPRESS

निरंतर सेवेच्या आर्थिक मदतीकरिता 
for Donation
G pay 8108603260 

संपादक: सुबोध शाक्यरत्न  
M : 8108658970

Email- pr.janata@gmail.com