बारावी उत्तीर्ण विद्यार्थ्यांना दरमहा सहा हजार रुपये, डिप्लोमाधारक विद्यार्थ्यांना दरमहा आठ हजार रुपये, तर पदवीधर युवकांना दरमहा दहा हजार रुपये स्टायपंड देण्याची घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली आहे. आषाढी एकादशीच्या निमित्ताने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पंढरपुरात विठुरायाची सपत्नीक शासकीय महापूजा केली. यावेळी त्यांनी पंढरपूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या वतीने आयोजित कर्मयोगी सुधाकरपंत परिचारक कृषी पंढरी महोत्सवाचं उद्घाटन कार्यक्रमात ही घोषणा केली.
आपल्या सरकारने महिलांसाठी लाडकी बहीण योजना आणली. लोकांनी आमच्यावर टीका केली की, लाडक्या बहिणीसाठी योजना आणली, पण लाडक्या भावांचं काय? लाडक्या भावांकडेही आमचं लक्ष आहे. आम्ही त्यांच्यासाठीही एक योजना आणत आहोत. जे तरुण बारावी पास झाले आहेत, त्यांना दरमहा सहा हजार रुपये, डिप्लोमाधारक तरुणांना आठ हजार, तर पदवीधर तरुणांना महिन्याला १० हजार रुपये दिले जातील. हे तरुण वर्षभर एखाद्या कारखान्यात अप्रेन्टिसशिप करतील, तिथे त्यांना कामाचा अनुभव मिळेल आणि त्या अनुभवाच्या जोरावर त्यांना नोकऱ्या मिळतील. एक प्रकारे आपण कुशल कामगार तयार करत आहोत. राज्यसह देशातील उद्योग जगताला कुशल तरुण पुरवणार आहोत, यासाठी सरकार पैसे भरणार आहे. इतिहासात पहिल्यांदाच एखाद्या सरकारने अशी योजना आणली असून याद्वारे बेरोजगारीवर तोडगा निघणार असल्याचा विश्वास मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केला.
रोजगार प्रोत्साहन कार्यक्रम योजना या नावाने ही योजना ३ डिसेंबर १९७४ रोजी सुरू झाली आहे. काळानुरूप तिच्यात बदल होत गेले. आणि देण्यात येणाऱ्या मानधनामध्येही वाढ होत गेली. ९ जुलै २०२३ च्या जी.आर नुसार ही योजना पुन्हा नव्याने कार्यरत करण्यात आली. मात्र मुख्यमंत्री महोदयांनी या योजनाेचे नाव बदलून मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना करून त्याला पुढे लाडका भाऊ असा प्रेमळ शब्द वापरून लोकांमध्ये प्रचार करण्यात आला आहे. राज्यातील बेरोजगार तरुणांना इंटर्नशिपच्या संधी उपलब्ध करून देण्यासाठी महाराष्ट्र सरकारने मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना सुरू केली आहे. या योजनेचा उद्देश तरुण व्यक्तींची रोजगारक्षमता आणि कौशल्य वाढवणे, त्यांना स्पर्धात्मक नोकरीसाठी तयार करणं आहे. व्यावहारिक प्रशिक्षणाद्वारे उमेदवारांची रोजगारक्षमता वाढवणे, हे या योजनेचं उद्दिष्ठ आहे.
मुख्यमंत्री जनकल्याण कक्षसह कौशल्य, रोजगार, उद्योजकता आणि नवोपक्रम विभागाद्वारे ही योजना राबविली जाईल. योजनेचा लाभ घेणारा उमेदवार 18 ते 35 वयोगटातील असावा. 12 वी पास / ITI/ डिप्लोमा / ग्रॅज्युएशन/ पोस्ट ग्रॅज्युएशन यांपैकी शिक्षण पूर्ण केलेलं असावं. तसेच उमेदवार महाराष्ट्राचा रहिवासी असावा, असे निकष ठेवण्यात आले आहेत. मुख्यमंत्री युवा कार्य शिक्षण योजनेअंतर्गत इंटर्नशिप ही सहा महिन्यांची असेल. इंटर्नला त्यांच्या शैक्षणिक पात्रतेनुसार थेट लाभ हस्तांतरण (DBT) स्वरूपात मासिक स्टायपेंड मिळणार आहे. यालाच लाडका भाऊ योजना म्हटलं गेलं आहे. यानुसार 12 वी पास तरुणांना दरमहा 6 हजार रुपये, आयटीआय आणि डिप्लोमा केलेल्या विद्यार्थ्यांना 8 हजार रुपये आणि पदवीधर आणि पदव्युत्तर तरुणांना 10 हजार रुपये मिळतील.
ही योजना म्हणजे शिळ्या कढीला ऊत आणण्याचा प्रकार असल्याची टीका काँग्रेस नेते अतुल लोंढेंनी केलीय. तर सरकारनं बेरोजगारांची थट्टा चालवलीय, अशा शब्दांत विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवारांनी सरकारवर निशाणा साधलाय.
यंदाच्या अर्थसंकल्पात लाडका भाऊ, लाडकी बहीण योजना मांडण्यात आली. अजित पवार आणि जयंत पाटील यांन आतापर्यंत ६ ते ७ वेळा अर्थसंकल्प मांडला. मात्र, कधीही बहीण आणि भाऊ यांच्यासाठी यांचा विचार करण्यात आला नाही. परंतु, हा सगळा लोकसभा निवडणुकीच्या निकालाचा परिणाम आहे. मतदारांनी मते व्यवस्थित दिली तर बहीण आणि भाऊ सर्वांना आठवतील. मलाच एकच काळजी आहे, ती म्हणजे महाराष्ट्राची आर्थिक स्थिती काय आहे. महाराष्ट्र देशातील दुसऱ्या आणि तिसऱ्या क्रमांकाचे राज्य होते. मात्र, नियोजन मंडळाने काही दिवसांपूर्वी जाहीर केलेल्या यादीत महाराष्ट्राची ११ व्या क्रमांकावर घसरण झाली. महाराष्ट्राच्या डोक्यावर जवळपास ८० हजार कोटींची कर्ज आहे. एक लाख १० हजार कोटींचं कर्ज हे वेगळे आहे, आर्थिकदृष्ट्या आपले राज्य मजबूत राज्य होते. आता ते राहिले नाही. दरडोई उत्पन्न घटले आहे,- शरद पवार
0 टिप्पण्या