मुंबई काँग्रेसच्या जनआक्रोश मोर्चाला परवानगी नाकारून भाजप सरकारकडून अदानीलाच संरक्षण - खासदार वर्षा गायकवाड.
स्मार्ट मीटर व वीजदर वाढीविरोधातील मुंबई काँग्रेसच्या मोर्चाची अडवणूक, नेत्यांना पोलीस स्टेशनमध्ये बसवून ठेवले.
अंबानींच्या लग्नातील व्हीआयपी वऱ्हाड्यांना त्रास नको म्हणून मुंबईकरांच्या प्रश्नावरील मोर्चावर सरकारकडून दडपशाही.
स्मार्ट मीटर आणि वीज दरवाढ विरोधात मुंबई काँग्रेसने आयोजित केलेल्या जनआक्रोश मोर्चाला पोलिसांनी परवानगी नाकारून जनतेचा आवाज दडपण्याचा प्रयत्न केला. काँग्रेसच्या नेत्यांना बीकेसी पोलीस स्टेशनमध्ये थांबवून ठेवले तर मोर्चात सहभागी होण्यासाठी येणाऱ्या बसेस व वाहनेही अडवली. शांततेच्या मार्गाने मोर्चा काढण्याचा संविधानाने अधिकार दिलेला आहे आणि तो कोणीही हिरावून घेऊ शकत नाही. सरकारच्या आदेशाने पोलिसांनी मुंबई काँग्रेसचा मोर्चा अडवण्याचा प्रयत्न केला पण कोणतीही शक्ती जनतेचा आवाज दाबू शकत नाही. मुंबई काँग्रेसच्या जनआक्रोश मोर्चाला परवानगी नाकारून भाजपा सरकारने अदानीला संरक्षण दिले, असा आरोप मुंबई काँग्रेसच्या अध्यक्ष खासदार प्रा. वर्षा गायकवाड यांनी केला आहे.
जनआक्रोश मोर्चाबद्दल बोलताना प्रा. वर्षा गायकवाड म्हणाल्या की, भारतीय जनता पक्ष प्रणित शिंदेंचे तानाशाही सरकार जनआक्रोशाला प्रचंड घाबरते. जनतेला न्याय मिळावा यासाठी मुंबई काँग्रेसने मित्रजीवी सरकार आणि अदानी कंपनीविरोधात आंदोलन केले. घरगुती वीजदरांत वाढ आणि स्मार्ट मीटरच्या विरोधातील जनक्षोभ रोखण्यासाठी सरकारने पोलिसांना पुढे करुन दडपशाही करण्याचा प्रयत्न केला. अंबानींच्या घरच्या लग्नात येणाऱ्या व्हीआयपी वऱ्हाडींना त्रास होऊ नये म्हणून मोर्चासाठी आलेल्या बसेस अडवण्यात आल्या, बीकेसी परिसरामध्ये मोर्चा आणण्यापासून थांबवण्यात आले. अदानींना संरक्षण देण्यासाठी अंबानींच्या लग्नाचा पोलीसांनी हवाला दिला. सर्वसामान्य जनतेच्या समस्यांपेक्षा अंबानींचे लग्न अधिक महत्त्वाचे आहे का? महायुती सरकारला गोरगरिबांच्या दुःखाचे काही सोयर सुतक नाही कारण हे सरकार मुठभर धनदांडग्यासाठीच काम करते हे आम्ही वारंवार सांगत आहोत. वीज दरवाढ व स्मार्ट मीटरला सर्वसामान्य मुंबईकरांचा तीव्र विरोध असल्याने जनतेचा आवाज बुलंद करत स्मार्ट मीटर योजना व वीज दर वाढ रद्द करावी या मागण्यांसाठी मुंबई काँग्रेसचा मोर्चा होता. भाजपा सरकारने अदानीला वाचवण्याचा कितीही प्रयत्न केला तरी मुंबईकरांच्या हक्कासाठी मुंबई काँग्रेस पुन्हा रस्त्यावर उतरण्यास मागेपुढे पाहणार नाही. महायुती सरकारच्या दडपशाहीचा मुंबई काँग्रेस निषेध करत आहे, असेही वर्षा गायकवाड म्हणाल्या.
भाजपा सरकारने पोलीसांच्या माध्यमातून अनेक अडथळे आणले तरी शेवटी या दडपशाहीला न जुमानता जनआक्रोश मोर्चा बीकेसीमधील अदानी कंपनीवर धडकला. यावेळी अदानी कंपनीच्या अधिका-यांना भेटून निवेदन दिले. प्रा. वर्षा गायकवाड यांच्या नेतृत्वाखालील या जनआक्रोश मोर्चात, विधानसभेचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार, माजी मंत्री नसीम खान, अस्लम शेख, आमदार भाई जगताप, डॉ. अमरजितसिंह मनहास, सरचिटणीस सचिन सावंत, संदीप शुक्ला, प्रनील नायर, कचरू यादव,अखिलेश यादव, अजंता यादव यांच्यासह हजारो कार्यकर्ते उपस्थित होते.
0 टिप्पण्या