बडी और लंबी जिंदगी
आज त्याला जाऊन १२ वर्षे झाली. त्याची गाणी ऐकताना,पिक्चर बघताना असे वाटतच नाही की तो आपल्यात नाही.एका संपूर्ण पिढीला वेड लावले होते त्याने.अमिताभचा उदय झाला आणि सलीम जावेदने त्याच्यासाठी लिहिलेले असंख्य डायलॉग्स आमच्या पिढीला तोंडपाठ झाले. राजेशचे सिनेमे त्यामानाने नंतर बघितले पण तो प्रचंड आवडून गेला.
राजेश खन्नाचे डायलॉग्स या विषयावर मी कधी लिहीन असे वाटलेच नव्हते. फार प्रसिद्ध झाले नाहीत त्याचे डायलॉग्ज. आनंद आणि अमर प्रेम सोडल्यास त्याचे कोणतेही डायलॉग तुम्हाला पटकन आठवणार नाहीत.तो मुख्यतः प्रसिद्ध होता त्याच्या गाण्यांसाठी, त्याच्या दिसण्यासाठी,त्याच्या ठेवणीतील खास लकबींसाठी, त्याच्या मनमोहक हास्यासाठी आणि त्याच्या नयिकांवर प्रेम करण्याच्या स्टाईलसाठी. राजेश खन्नाच्या गाण्यांवर अनेकदा लिहून झाले आहे आज त्याच्या काही निवडक डायलॉग्जवर लिहायचा विचार आहे. त्याचे काही डायलॉग्ज माणसाने कसे जगावे,कसे वागावे, कसे बोलावे याचे धडे देतात.जे डायलॉग्ज मला पट्कन आठवले त्यावर लिहीत आहे.काही काही डायलॉग तर कोणाच्या लक्षातही नसतील.
"सफर" मध्ये *मैं मरने से पहले मरना नही चाहता..* असे म्हणणारा राजेश आयुष्य नायक जगण्यासारखी किती आसुसलेला आहे हे एका वाक्यात सांगून जातो. "नमक हराम" मध्ये त्याचा एक डायलॉग आहे.*कभी किसी मजदूर को उसके नाम से बुला.बिक जायेगा रे...* मालकाने आपल्याला नावाने हाक मारली ही गोष्ट गरीब कामगारासाठी खूप महत्त्वाची असते. मालक आणि मजूर यांच्यातील नातेसंबंध कसे घट्ट करायचे हे त्यात सांगितले आहे.ज्या पद्धतीने राजेश "बिक जायेगा रे.." म्हणतो तसे फक्त तो आणि तोच म्हणू शकतो निष्ठूर जगामध्ये अश्रूंना काही किंमत नसते हे कटू सत्य तो सांगतो.अमर प्रेममधील त्याच्या फेमस डायलॉगमध्ये *"...सलाईन वॉटर I mean नमकीन पानी के अलावा कुछ नही है.. इसीलिए इन्हे पोछ डालो पुष्पा I hate tears.."* "प्रेम नगर" मध्ये हेमा मालिनीवर अतिप्रसंग करणाऱ्या मनमोहनला तो धुवून काढतो आणि त्या वेळेस दारूच्या नशेत त्याला एक सल्ला देतो. स्त्रीचा होकार असेल तर किंवा नकार असेल तर कसे वागावे हे तो सांगतो..*ब्लडी फूल, जो लडकी हां कहे उसे छोडना नही और जो ना कहे उसे छूना नही चाहे वो बाजार की गुडिया क्यूँ ना हो.. अंडरस्टँड* आपले प्रेम व्यक्त करण्यासाठी शब्द सापडत नाहीत अशा गोंधळात पडलेल्या तमाम प्रियकरांना "दाग" मधली त्याची डायलॉगबाजी मदतीस येऊ शकते.
*"इसी तरह देखते रहे एक दुसरे के आँखोमें और खामोशी वो सब कुछ कह दे जो जुबां कह ना सके.*
मला काही कळले नाही असे शर्मिला त्याला म्हणते त्यावर त्याचे उत्तर समर्पक आहे.
*लब्जों पे मत जाओ मतलब समझ गई ना.*
"धनवान"मध्ये त्याचा व्यावसायिक प्रतिस्पर्धी असलेल्या पिंचू कपूरला तो बाजारातून उठवतो. त्यावेळी राजेशच्या तोंडी एक डायलॉग आहे
*"असल चीज पैसा है जागीरदारसाब असल चीज अपना माल घाटे पर बेचने की ताकत है "*
धंद्यात पैसे कमवण्यासाठी कधी कधी नुकसान सहन करावे लागते.हा खूप मोठा नियम आहे. शेअर बाजारात याला स्टॉप लॉस म्हणतात.ही कन्सेप्टच राजेश खन्नाने सांगितली आहे.
"अवतार" मध्ये आपल्याला आपल्या मुलांनीच घरातून बाहेर काढल्यामुळे प्रचंड दुःख झालेला आणि मुलांविषयी असलेले प्रेम पूर्णपणे आटलेला अवतार किशन त्याने जबरदस्त रंगवला होता. मुलगा गुलशन ग्रोव्हरची गाडी बंद पडते आणि मेकॅनिक असलेला राजेश खन्ना ती रिपेअर करून देतो. मुलगा बापाला गृहीत धरतो आणि गाडी सुरू करतो. त्याच्यासमोर उभा राहून तो गाडी थांबवतो आणि *"फिफ्टी रुपीज प्लीज. मुफत की मजदुरी करना मैने छोड दिया है.* असे सांगतो. मुलांविषयी असलेले ममत्त्व टोकाचे वाईट अनुभव आल्यानंतर आड येऊ देऊ नये हा एक धडा आहे...
"आनंद" हा चित्रपट मृत्यू नजरेसमोर असताना आनंदी कसे राहावे याचा वस्तुपाठ आहे.*बाबूमोशाय जिंदगी बडी होनी चाहिये लंबी नही..* एकच वाक्य पण खच्चून भरलेला भावार्थ.
*जब तक जिंदा हूं तब तक मरा नहीं... जब मर गया साला मैं ही नहीं...* असे हसत हसत सांगणाऱ्या *मौत तो एक पल है.* असे म्हणत मृत्यूची व्याख्या अगदी सोपी करून टाकणाऱ्या हिंदी चित्रपटसृष्टीतील पहिला सुपरस्टार राजेश खन्नाच्या आयुष्यात १८ जुलै २०१२ दुपारी दीडच्या सुमारास अखेरचा तो पल आला आणि...
राजेश खन्ना अफाट यशस्वी कारकीर्द जगून आणि त्यानंतरच्या आयुष्यात अनेक चढ-उतार पचवून आपली "बडी आणि लंबी" जिंदगी संपवून अनंताच्या प्रवासासाठी निघून गेला.
आनंद देवधर
१८/०७/२०२४
................................................................
राजेश खन्नाचा ‘आराधना’ हा चित्रपट मी माझी मोठी बहिण नूतन हिच्या सोबत चिंचपोकळी येथील जयहिंद सिनेमात पाहिला तेव्हा मी फक्त ८ वर्षांचा होतो. चांगला वाईट चित्रपट समजण्याचे ते वय नव्हते. पण तरीही ‘आराधना’ मला मनापासून आवडला होता. राजेश खन्ना माझ्या गळ्यातील ताईत बनला होता. किंबहूना, ‘आराधना’नंतरच देशात राजेश खन्ना नावाचे तुफान आले. ते तीन चार वर्षे घोंघावत राहिले. १९६९ ते १९७१ या दोन वर्षात या तुफानाने बॅक टू बॅक १७ सुपर हीट सिनेमा दिले. त्यातील १५ तर सोलो होते. त्याच्या लोकप्रिय सिनेमांची ही यादी पहाः
आराधना, डोली, बंधन, इत्तेफाक, दो रास्ते, खामोशी (१९६९) सफर, कटी पतंग, दी ट्रेन, सच्चा झूठा, आन मिलो सजना (१९७०) मर्यादा, गुड्डी, दुश्मन, अंदाज, आनंद, हाथी मेरे साथी, (१९७१) बावर्ची, अपना देश, अमर प्रेम, अनुराग (१९७२)
राजेश खन्नाला थांबविणे तेव्हा कोणालाही शक्य नव्हते. ’पुष्पा आय हेट टियर्स…’ (अमर प्रेम)
‘कोई लडकी अगर हा कहें तो उसे छोडना नहीं और कोई ना कहें तो उसे छूना नहीं। चाहें वह बाज़ार की गुड़िया क्यों ना हो। यह हमारा उसूल हैं। समझे? यू ब्लडी फूल।” (प्रेमनगर) राजेश खन्नाचे ते लाजवाब डायलॉग आजंही नजरेसमोर जसेच्या तसे उभे राहतात. राजेश खन्नाला जी अफाट लोकप्रियता लाभली ती आजपर्यंत कोणालाही लाभली नाही. पण वैयक्तिक जिवनात मात्र हा शापित राजहंस सदैव दुःखीच राहिला. विशेषतः त्याच्या लोकप्रियतेला उतरती कळा लागल्यानंतर सुरु झालेली त्याची तगमग त्याच्या मृत्यूनंतरच थांबली. राजेश खन्नाचा आज १२ वा स्मृतीदिन. त्याच्या मधूर आणि पवित्र स्मृतीस भावपूर्ण आदरांजली.
-नरेंद्र वि. वाबळे
संपादक ‘शिवनेर’
0 टिप्पण्या