*डाॅ. बाबासाहेब आंबेडकरांनी २० जुलै १९२४ ला बहिष्कृत हितकारिणी सभेची स्थापना केली होती. त्यांनी स्थापन केलेल्या पहिल्या संघटनेच्या शताब्दी वर्ष, वर्धापनदिनानिमित्त आपण सर्वांना कोटी कोटी सदिच्छा!*
*९ मार्च १९२४ ला दामोदर हाल मुंबई येथे केंद्रीय संस्थेच्या स्थापनेसाठी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी बैठक आयोजित केली होती. जेणेकरून अस्पृश्यांच्या समस्यांचे अनुषंगाने आपले दु:ख सरकारपुढे मांडता येतील. त्या संस्थेचे नांव "बहिष्कृत हितकारिणी सभा" असे ठेवण्यात आले होते. त्या बैठकीत बाबासाहेब आंबेडकरांनी संदेश दिला होता की, लोकांना सुशिक्षित करा, त्यांच्यात आपल्या हिन अवस्थेबद्दल चीड उत्पन्न करा आणि त्यांची संघटना निर्माण करा. अर्थात,(Educate, Agitate and Organise) : सुशिक्षित करा, संघर्ष (चेतवा) करा आणि संघटीत करा. ही त्रिसूत्री त्या बहिष्कृत हितकारिणी सभेचे ब्रीदवाक्य ठरले. याप्रमाणे आपणांस शिक्षणच यासाठी घेणे अपेक्षित होते की, संघर्ष कशासाठी करायचा? हे समजून घ्यायचे होते. एकदा संघर्ष कशासाठी करायचा? हे जर जनतेला माहीत पडले तर लोकांना संघटीत व्हायला वेळ लागणार नाही. करिता ज्यांच्यासाठी आपणांस संघर्ष करायचा आहे, त्याचे कारण आपणांस स्पष्टपणे माहीत असणे आवश्यक आहे. त्यासाठी संस्था कायदा १८६० च्या XXI अंतर्गत २० जुलै १९२४ ला बहिष्कृत हितकारिणी सभेची स्थापना करून रितसर नोंदणी करण्यात आली.*
*बहिष्कृत हितकारिणी सभेच्या व्यवस्थापन समितीचे चेअरमन : डॉ. बी. आर. आंबेडकर, सचिव : एस. एन. शिवतरकर, अध्यक्ष : सर चिमनलाल हरिलाल सेटलवाड (एल एल डी), उपाध्यक्ष : नेयेर निस्सीम व जे. पी. व्यास तर कोषाध्यक्ष : एन. टी. जाधव आणि रुस्तुमजी जिनावाला, जी. के. नरिमन, डॉ. आर. पी. परांजपे, डॉ. व्ही. पी. चव्हाण व बी. जी. खेर (सॉलिसिटर) यांची सदस्य म्हणून निवड करण्यात आली होती.*
*उद्देश : वंचित वर्गामध्ये शिक्षणाचा प्रचार प्रसार व्हावा म्हणून विद्यार्थ्यांसाठी आवश्यकतेनुसार वस्तीगृहे, ग्रंथालये, सामाजिक केंद्र आणि अभ्यासवर्गाची निर्मिती करणे अपेक्षित होते. तसेच आर्थिक परिस्थिती सुधारण्यासाठी औद्योगिक आणि कृषी विद्यालय स्थापन करणे व आपल्या समस्यांचे निवेदन सादर करणे अपेक्षित होते. यासाठी अ) सभेने जागा विकत, भाड्याने, लिजवर घेतले पाहिजे. सदरील जागेवर ब) बांधकाम, दुरुस्ती, बदल करण्याचे अधिकार संस्थेकडे राखीव ठेवण्यात आले होते. क) विक्री, सुधारणा, विकास, अदलाबदल, लीज, करारान्वये गहाणखत नष्ट करणे, व्यवस्थित करणे या सर्वांचे व्यवस्थापन करणे अपेक्षित होते. ड) करिता देणग्या स्विकारणे, मिळकत स्विकारणे जेणेकरून सुसंगत कार्य पूर्णत्वास नेण्यासाठी प्रयत्न केले जाऊ शकतील. इ) संस्थांतर्गत हस्तांतरणाचे आवश्यकतेनुसार निर्णय घेतले जातील.*
*ही सभा म्हणजे "बहिष्कृत हितकारिणी सभा" होय ज्यात बोर्ड ऑफ ट्रस्टीज, कौन्सिल ऑफ मॅनेजमेंट व बोर्ड ऑफ कंट्रोल मध्ये अनुक्रमे दहा, सात व पंधरा सदस्य असावेत असे ठरले होते. ज्या सदस्यांना कुठलेही आर्थिक लाभ घेता येणार नव्हते.*
*सदस्यत्वासंबंधी नियमावली : १८ वर्षावरील कुठल्याही स्त्री किंवा पुरुषांना सभेचे सदस्य होता येईल. ज्या व्यक्तींना सदस्य व्हायचे त्यांनी तसा अर्ज दिला पाहिजे. सदस्यत्वाचा अर्ज नाकारायचे की स्विकारायचे ते ठरवायचे अधिकार कौन्सिल ऑफ मॅनेजमेंटने राखून ठेवले होते. बहिष्कृत हितकारिणी सभेच्या विरोधात गैरवर्तन करणा-या सदस्यांस उपस्थित सदस्यातील तीन चतुर्थांश मताधिक्याने अपात्र ठरविण्याचा अधिकार त्या जनरल बाॅडीला असेल.*
*सदस्यांचे वर्गीकरण : १) संरक्षक : आश्रयदाते (Patrons) : वार्षिक ३००० रुपये एकदाच किंवा हप्त्या हप्त्याने जमा करने अपेक्षित होते. २) समर्थक ( Supporters) : वार्षिक २००० रुपये, ३) सहानुभूतीनदार (Sympathisers) : वार्षिक १००० रुपये, ४) आजीवन सदस्य (Life Members) : ५०० रुपये, ६) सहायक सदस्य (Associate Members) : २०० रुपये, ७) सामान्य सदस्य (Ordinary Members) : अ) २५ रुपये, ब) १० रुपये, क) ५ रुपये, ड) दोन रुपये, इ) एक रुपया या प्रमाणे निधी देणा-या सर्व व्यक्तींना या संस्थेचे सदस्य होता येईल. अशाप्रकारे ही सभा चालविण्यासाठी आश्रयदाते, समर्थक, सहानुभूतीनदार, आजीवन सदस्य, सहाय्यक सदस्य तसेच सामान्य सदस्यांची सुद्धा आवश्यकता असल्याचे डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी अधोरेखित केले आहे.*
*या सभेच्या १६ पैकी ४ ट्रस्टी हे मुंबईचे असावेत. कुठल्याही कारणाने रिक्त झालेली जागा ही तीन चतुर्थांश मताने सहा महिन्यात भरण्यात यावी. या सभेतील ट्रस्टी हे महार, मांग, चांभार आणि धेड समाजातील असावेत. चार कोकण, दोन गुजरात, दोन कानरीज आणि उर्वरित आठ सदस्य हे मुंबई प्रांतातील इतर जिल्ह्यातून निवडावेत. स्थायी आणि अस्थायी मालमत्ता ही सभेच्या मालकीची असेल.*
*कौन्सिल ऑफ मॅनेजमेंट ने वार्षिक अंदाजपत्रक मंजुरीसाठी ट्रस्टकडे पाठवावे. गरज भासेल तेव्हा पुरवणी अंदाजपत्रक सादर करावे. मंजूरी मिळाल्याबरोबर त्याची अंमलबजावणी करावी. ट्रस्टींनी कमीत कमी वर्षातून एकदा तरी भेटावे. नवीन वर्ष सुरू झाल्यापासून तीन महिन्यांच्या आत भेटावे. अंदाजपत्रकाच्या संबंधित बोर्ड ऑफ ट्रस्टीजच्या बैठकीला कौन्सिलचे चेअरमन, महासचिव आणि कोषाध्यक्ष यांना उपस्थित राहता येईल. मात्र मत व्यक्त करता येणार नाही. पुढील सभेची किंवा सर्वसाधारण सभेची एक महिना आधी पूर्वसूचना दिली जाईल. सर्व प्रकारच्या मालमत्तेचे संरक्षण करण्याची जबाबदारी ट्रस्टींची असेल. महासचिवांनी वितरित केलेल्या सूचनांवर मत व्यक्त करता येईल. सर्व सुचनांची नोंद ही नोंदवहीत असेल. प्रत्येक बैठकीला एका ट्रस्टींची चेअरमन म्हणून नियुक्ती केली जाईल. जे त्या बैठकीच्या अहवालावर सह्या करतील. महासचिवांनीच सर्व अहवाल लिहिला पाहिजे.*
*अशाप्रकारे डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी स्थापन केलेली पहिले संघटन म्हणजे बहिष्कृत हितकारिणी सभा होय. याचा आधार घेऊन बहिष्कृत समाजातील अनेकांनी संस्था, संघटना स्थापन करण्याचा प्रयत्न केला. मात्र ते चालविण्यामध्ये फारसे यशस्वी झाल्याचे पहायला मिळत नाही. एवढेच नव्हे! तर डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी स्थापन केलेल्या संस्था, संघटनांची सुद्धा त्यांच्या अनुयायांनी तशीच वाताहात केल्याचे पहायला मिळत आहे. ही या चळवळीची शोकांतिकाच म्हणावी लागेल. ही आपल्या अप्रामाणिकतेची पावतीच होय. या सर्व बाबींचा विचार करून २० जुलै १९४२ ला डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी नागपूर परिषदेत वरील त्रिसूत्री संदेशाचा विस्तार करताना सुशिक्षित करा, संघर्ष करा, संघटीत व्हा, आत्मविश्वास बाळगा आणि धीर सोडू नका असा पंचसूत्री संदेश दिला होता. याची अंमलबजावणी करण्यासाठी प्रामाणिकपणे शिस्तबद्ध मार्गक्रमण करावे. आपण सर्वांना या शताब्दी वर्धापनदिनानिमित्त कोटी कोटी सदिच्छा व्यक्त करून थांबतोय.*
- *लेखक : मेश्राम बी. बी.,
- संचालक : फुले शाहू आंबेडकराईट स्टडी सर्कल, राष्ट्रीय कौन्सिल मेंबर ऑफ दि आल इंडिया नाग असोसिएशन (आईना)*
- *संपर्क : ९४२१६७८६२८*
- *stdbbm@gmail.com*
0 टिप्पण्या