शहीदांच्या स्मारकाच्या उदघाटनाकरीता क्रिकेटवीर सचिन तेंडूलकर यांना अनेकदा पोस्टाने रजिस्टर पत्रे पाठवण्यात आली आहेत. मात्र सचिन तेंडूलकर यांच्याकडून किंवा त्यांच्या संपर्क कार्यालयातून कोणताही प्रतिसाद आलेला नाही. हा ग्रामस्थांचा अपमान असून ज्या शहिदांचे आईवडील आणि त्यांच्या पत्नी स्वतः सचिन तेंडूलकर यांच्या भेटीसाठी मुंबईत येऊनही त्यांचे देशहिताच्या या कार्याची दखल घेतल्या गेली नाही. आज जर आमच्या विनंतीनुसार सचिन तेंडूलकर यांनी आमची ही छोटीशी मागणी मान्य केली नाही तर यापुढे त्यांच्याशी संपर्क साधण्यात येणार नाही इतकेच नव्हे तर मी माझ्या स्वखर्चाने उभारलेला सचिन तेंडूलकर यांचा पुतळाही काढून टाकून त्या ठिकाणी चंद्रशेखर आझाद, भगतसिंग यांचे पुतळे उभारण्यात येईल असे लोकेंद्र साहू यांनी सांगितले. यापुढे देशसेवेकरिता समर्पित वीर जवानांचा आदर करून त्यांच्या प्रति कृतज्ञतेची भावना तरुण पिढीच्या मनात जागृत करण्याचे काम मी करणार असल्याचेही लोकेंद्र यांनी स्पष्ट केले.
कारगिलमधील शहिद, चीनच्या सीमेवर हौतात्म्य पत्करलेले तसेच पुलवामा मध्ये शहीद झालेल्या अनेक वीर जवानांच्या स्मृती कायम स्मरणात रहाव्या याकरिता छत्तिसगढ राज्यातील माजी सरपंच लोकेंद्र साहू यांनी छोटेसे स्मृतिस्मारक उभारले आहे. याचे काम सध्या प्रगतीपथावर असून यामध्ये सर्व शहिदांचे पुतळे साकारण्यात येणार आहेत. या शहीद स्मारकाचे उद्घाटन आपले आवडते क्रिकेटवीर सचिन तेंडूलकर यांनी करावे अशी इच्छा इथल्या अनेक गावकरी मंडळींची आहे. त्याकरिता तेंडूलकर यांच्याशी संपर्क साधण्याचा सातत्याने प्रयत्न करीत आहोत. मात्र मागील दिड वर्षे पत्रव्यवहार करूनही तेंडूलकर यांच्याशी संपर्क होऊ शकत नसल्याने पत्रकारांच्या माध्यमातून ही गोष्ट तेंडूलकर यांच्यापर्यंत पोहोचावी याकरिता आज पत्रकार परिषद आयोजित करण्यात आली असल्याची माहीती लोकेंद्र साहू यांनी दिली.
लोकेंद्र साहू हे माजी सरपंच असल्याने आणि क्रिकेट प्रेमी तसेच क्रिकेट कोच असल्याने त्यांनी भारतीय क्रिकेट संघात स्थान मिळविण्यासाठी मुंबईत येऊन संघर्ष केला. त्यांचे स्वप्न काही साकार झाले नाही. म्हणून त्यांनी छत्तीसगड राज्यातील बालोद जिल्ह्यातील देवगंहन या गावी स्वतः सरपंच असताना सचिन तेंडुलकर यांच्या प्रेमापोटी त्यांचा पुतळा उभारून तेथे क्रिकेटच्या खेळाचे प्रशिक्षण केंद्रही निर्माण केले. येथील मैदानाला ग्रामपंचायत कडून ग्राम सभेत ठराव करीत सचिन तेंडुलकर यांचे नांव दिले. त्यानंतर आता देशप्रेमापायी वीर बलिदान प्राप्त झालेल्या सैनिकांना आदरांजली म्हणून अनेक शहीद वीरांचे पुतळे साकारून त्यांचे स्मारक तयार केले आहे. मात्र या स्मारकाचे उद्घाटन क्रिकेटवीर सचीन तेंडूलकर यांच्या हस्ते व्हावे यासाठी इथली ग्रामस्थ मंडळीसह लोकेंद्र साहू पुन्हा आग्रही झाले आहेत. याकरिता तेंडूलकर यांच्या कार्यालयाशी अनेकवेळा संपर्क साधण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. मात्र तेंडूलकर यांच्या कार्यालयातून कोणताही प्रतिसाद मिळत नसल्याने साहू आता आक्रमक झाले असून आमची ही छोटीशी मागणी मान्य झाली नाही तर क्रिकेटवीर सचिन तेंडूलकर यांचा पुतळा काढून टाकण्याशिवाय आम्हाला पर्याय नसल्याचे लोकेंद्र यांनी सांगितले.
0 टिप्पण्या