मुंबईतील प्रचलित वानखेडे स्टेडियम हे भारतातील आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियम आहे. हे स्टेडियम १९७५ मध्ये बांधले गेले. या स्टेडियममध्ये पहिला कसोटी सामना भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यात २३ ते २८ जानेवारी १९७५ दरम्यान खेळला गेला होता. त्यानंतर या स्टेडियमवर अनेक क्रिकेट सामने रंगले. पण सध्या प्रचलित असलेले हे स्टेडियम मराठी माणसाच्या अपमानातून उभे राहिले होते.
मुंबईतील सध्या प्रसिद्ध असलेले वानखेडे स्टेडियम उभारण्याआधी मुंबईत आधीपासूनच ब्रेबॉर्न हे एकमेव क्रिकेट स्टेडियम होते. हे स्टेडियम CCI (क्रिकेट क्लब ऑफ इंडिया)च्या अंतर्गत असून मुंबईतील सर्व आंतरराष्ट्रीय सामने या स्टेडियमवर खेळले जायचे. त्या काळी ते खूप प्रसिद्ध स्टेडियम होते. त्यावेळी विजय मर्चंट (माजी क्रिकेटपटू) त्या स्टेडियमचे अध्यक्ष होते. त्या काळात भाषिक आणि धार्मिक आधारावरती क्लब बनवले जायचे आणि त्यामध्ये स्पर्धा व्हायची. त्यामुळे विजय मर्चंट यांच्या मनामध्ये मराठी माणसांबद्दल नेहमी एक कटुता असायची. अनेकांच्या मते त्यांना मराठी माणसांबद्दल खूप राग होता.
१९७२ साली बॅरिस्टर शेषराव वानखेडे हे महाराष्ट्राच्या विधानसभेचे अध्यक्ष होते. वानखेडे खूप हुशार व महाराष्ट्राचे पहिले अर्थमंत्रीदेखील होते. तसेच त्यांना क्रिकेटची खूप आवड होती. त्यामुळे त्यांनी MCA आणि BCCI मधील अनेक पदेदेखील भूषवली होती. शेषराव वानखेडे यांचे हे क्रिकेटप्रेम पाहून आमदार प्रस्ताव घेऊन त्यांच्याकडे गेले आणि त्यांनी आमदारांसाठी एक क्रिकेट स्पर्धा भरविण्याचा आग्रह वानखेडे यांना केला. सर्व आमदारांचा एक प्रदर्शनीय सामना भरविण्याचा प्रस्ताव त्यांना खूप आवडला आणि त्यांनी यासाठी लगेच होकार दिला. वानखेडे यांच्याकडून होकार मिळाल्यानंतर हा सामना ब्रेबॉर्न स्टेडियमवर खेळला जावा यासाठी विजय मर्चंट यांची परवानगी घेण्याचे ठरवण्यात आले.
आमदारांचा प्रदर्शनीय क्रिकेट सामना ब्रेबॉर्न स्टेडियमवर खेळण्याची परवानगी मिळावी, असा प्रस्ताव घेऊन वानखेडेंसोबत काही वरिष्ठ नेते, तसेच काही आमदारदेखील विजय मर्चंट यांच्यकडे गेले. विजय मर्चंट यांनी सर्व ऐकून घेतले; पण त्यानंतर त्यांनी त्या प्रस्तावास मंजुरी देण्यास नकार दिला. त्यावेळी ते म्हणाले की, मी आमदारांच्या मॅचसाठी हे स्टेडियम तुम्हाला देणार नाही. कारण- हे इंटरनॅशनल दर्जाचे स्टेडियम आहे आणि इथे फक्त इंटरनॅशनल मॅच खेळल्या जातात. नकार ऐकून सर्व वरिष्ठ नेत्यांनी त्यांना समजावण्याचा प्रयत्नही केला; पण त्याचा काहीही उपयोग झाला नाही. त्यावेळी त्या ठिकाणी अनेक वाद झाले. शाब्दिक बाचाबाचीदेखील झाली; ज्यात वानखेडे रागात म्हणाले की, तुम्ही देत नाही, तर आम्ही आमचे स्टेडियम स्वतः बांधू. त्यावर मर्चंट यांनी, “तुम्ही घाटी लोक काय स्टेडियम बांधणार?”, या शब्दांत वानखेडे यांना हिणवले.
विजय मर्चंट यांनी केलेला हा अपमान वानखेडेंना सहन झाला नाही. त्याच वेळी त्यांनी ठरवले की, आता काहीही करून मराठी माणसांचे स्टेडियम बांधायचे. काही दिवसांनंतर स्टेडियमचा प्रस्ताव घेऊन वानखेडे तत्कालीन मुख्यमंत्री वसंतराव नाईक यांच्याकडे गेले. पण, त्यावेळी नाईक यांनी मुंबईमध्ये आधीपासून एक स्टेडियम असल्यामुळे तसेच सरकारच्या तिजोरीत नव्या स्टेडियमसाठी पैसे नसल्याने वसंतराव नाईकांनी नकार दिला. पण, वानखेडेंनी हट्ट करून, “तुम्ही फक्त जागा द्या. स्टेडियम बांधण्याची जबाबदारी आम्ही घेऊ आणि स्टेडियम बांधू”, अशी विनंती नाईक यांना केली.
काही दिवसांनंतर वानखेडे यांना नव्या स्टेडियमसाठी जागा मिळाली. मरीन ड्राईव्हजवळ असलेली ही जागा जवळपास सात-साडेसात एकरमध्ये होती. हे स्टेडियम बांधण्याआधी त्यांनी ठरवले की, हे स्टेडियम ब्रेबॉर्नपेक्षा मोठे असायला हवे, याची जबाबदारी त्यांनी शशी प्रभू नावाच्या आर्किटेककडे देण्यात आली. शशी प्रभू यांनी विविध स्टेडियमना भेटी दिल्या आणि प्लॅन तयार केला. अनेकांकडून देणगी गोळा करुन १९७५ साली हे स्टेडियम तब्बल १३ महिन्यात उभारण्यात आले. या स्टेडियमसाठी घेतलेल्या कष्टामुळे या स्टेडियमला वानखेडे स्टेडियम, असे नाव देण्यात आले. तेव्हापासून आतापर्यंत मुंबईतील सर्व आंतरराष्ट्रीय सामने वानखेडे स्टेडियममध्येच होतात.
0 टिप्पण्या