Top Post Ad

प्रशासकीय अनास्थेमुळे बेस्ट बससेवा बंद होणार?


  मुंबईकर जनतेला गेले ७५ वर्षाहून अधिक काळापासून मिळणारी बेस्ट बससेवा ही अत्यावश्यक सार्वजनिक वाहतूक सेवा बंद पडण्याची दाट शक्यता निर्माण झाली आहे. मुंबईकर जनतेसाठी हा अतिशय चिंतेचा विषय आहे. बेस्ट बससेवा ही मुंबईची जीवनवाहिनी आहे. मुंबईच्या कानाकोपऱ्यात बेस्टची ही अत्यावश्यक सेवा अल्पदरात नियमितपणे सुरू राहणे ही प्रवासी आणि मुंबई शहराची मुलभूत गरज आहे. मात्र मुंबई महानगर पालिका प्रशासन आणि राज्य शासनाच्या जाणिवपूर्वक दुर्लक्षितपणामुळे ही सेवा बंद होण्याच्या मार्गावर आहे.  याकरिता बेस्ट बचाओ (BEST BACHAO) अभियान सुरू करण्यात येत आहे. हे अभियान कोणत्याही राजकिय पक्षाशी संबंधित नसून हा मुंबईकर जनतेचा - मुंबईकर जनतेसाठी बेस्टची अल्पदरात सार्वजनिक वाहतूक सेवा अबाधित राखण्याकरिता लढा आहे. मुंबईतल्या प्रवासी संघटना, मुंबईकर नागरीकांसाठी काम करणाऱ्या एन.जी.ओ., सामाजिक कार्यकर्ते, हाऊसिंग असोसिएशन्स व अश्या इतर संघटनांच्या मदतीने मुंबईकर जनतेपर्यंत पोहचून बेस्टची अत्यावश्यक सेवा अल्पदरात सातत्याने मुंबईकर नागरीकांना मिळत रहावी, यासाठी बेस्ट बचाओ (BEST BACHAO) अभियानामार्फत प्रयत्न करण्यात येईल अशी माहिती या आंदोलनाचे निमंत्रक शशांक राव यांनी आज प्रसार माध्यमांना दिली. 

मुंबई मराठी पत्रकार संघ येथे आयोजित पत्रकार परिषदेत याबद्दल अधिक माहिती देतांना ते म्हणाले, मुंबई महानगरपालिका कायदा, १८८८ प्रमाणे मुंबई महानगरपालिका "बेस्ट उपक्रमाच्या" माध्यमातून गेले ७५ वर्षाहून अधिक काळापासून मुंबईकर जनतेला अविरत प्रवासी वाहतूक सेवा प्रदान करत आहे. मुंबईकर जनतेला नियमितपणे बेस्टची चांगली सेवा देण्याकरिता बेस्ट उपक्रमाकडे स्वमालकिच्या किमान ३३३७ बसगाड्या कायम राखणे आवश्यक आहे. आयुष्यमान संपलेल्या बसगाड्यांच्या बदल्यात नवीन बसगाड्या विकत घेण्यासाठी आवश्यक आर्थिक निधी बृहन्मुंबई महानगरपालिकेने बेस्ट उपक्रमाला द्यायचा आहे. परंतु २०१९ नंतर बृहन्मुंबई महानगरपालिकेकडून बेस्ट उपक्रमाला आयुष्यमान संपलेल्या बसगाडयांच्या बदल्यात नवीन बसगाड्या विकत घेण्यासाठी कुठलाही निधी देण्यात आलेला नाही. परिणामी बेस्ट उपक्रमाचा स्वमालकीच्या बसगाड्यांचा बसताफा आजघडिला केवळ १०८५ (३३%) इतकाच शिल्लक राहिलेला आहे. ३१ मार्च, २०२५ रोजी बेस्ट उपक्रमाकडे स्वमालकीच्या फक्त ७६१ बसगाड्या शिल्लक राहतील व ३० नोव्हेंबर, २०२५ ला बेस्ट उपक्रमाकडे स्वमालकीच्या फक्त २५१ (८%) बसगाड्या शिल्लक राहतील. आणि आपोआपच ही सेवा ठप्प होईल याकरिता बेस्ट बचाओ अभियानच्या माध्यमातून  मुंबईत पश्चिम उपनगर, पूर्व उपनगर व शहर विभाग अश्या तीन सभा तातडीने घेण्यात येतील व तेथून बेस्ट बचाओ (BEST BACHAO) अभियानाची पुढील दिशा ठरविण्यात येईल. या पैकी पश्चिम उपनगराची सभा गुरूवार, दि. १८ जूलै, रोजी मुंबई गोरेगाव  आरे रोड येथील  केशव गोरे स्मारक हॉल येथे सांयकाळी ६ वा. आयोजित करण्यात आली आहे. या सभांमध्ये वाहतूक तज्ञ, मुंबईतल्या प्रवासी संघटना, मुंबईकर नागरीकांसाठी काम करणाऱ्या एन.जी.ओ., सामाजिक कार्यकर्ते, हाऊसिंग असोसिएशन्स व अश्या इतर संघटनांच्या प्रतिनिधींना आमंत्रित करीत असल्याचेही राव म्हणाले. 

१) दि बॉम्बे ट्रामवेज कंपनी लिमिटेड या खाजगी कंपनीला मुंबई महानगरपालिकेने ९ कोटी ४२ लाख रूपये मोजून विकत घेतल्यामुळे सद्याचा बृहन्मुंबई विद्युत पुरवठा आणि परिवहन उपक्रम (बेस्ट उपक्रम) दिनांक ७ ऑगस्ट, १९४७ पासून मुंबई महानगरपालिकेचा अविभाज्य भाग असून, मुंबई महानगरपालिका कायदा, १८८८ प्रमाणे बेस्ट उपक्रमाच्या नावाने असलेली सर्व संपत्ती मुंबई महानगरपालिकेची संपत्ती असल्याने बेस्ट उपक्रमाबद्दल असलेले सर्व दायित्व व जबाबदारी मुंबई महानगरपालिकेची आहे.

२) मुंबई महानगरपालिका कायदा, १८८८ च्या कलम ४ प्रमाणे बेस्ट उपक्रमाचे नियंत्रण करणारे बृहन्मुंबई विद्युत पुरवठा आणि परिवहन समिती (बेस्ट समिती) आणि महाव्यवस्थापक है महापालिका प्राधिकरणे आहेत, सदर कायद्याच्या कलम ५० प्रमाणे मुंबई महानगरपालिका बेस्ट समितीचे निर्माण करते, तसेच कलम ६० अ प्रमाणे मुंबई महानगरपालिका राज्य शासनाच्या मान्यतेने महाव्यवस्थापकाची नेमणूक करते आणि बेस्ट उपक्रमाचा एकूणच कारभार मुंबई महानगरपालिका कायदा, १८८८ प्रमाणे चालविण्यात येतो

३) बेस्ट उपक्रमाकडून मुंबईकर जनतेला देण्यात येणाऱ्या सार्वजनिक प्रवासी वाहतूक व बीज पुरवठा या कर्तव्यांचा उल्लेख मुंबई महानगरपालिका कायदा, १८८८ च्या कलम ६३ मध्ये करण्यात आला असून, सदर कायद्याच्या कलम ३ (मम) नुसार बेस्ट उपक्रम म्हणजे जनतेला सार्वजनिक प्रवासी वाहतूक पुरविण्यासाठी व विद्युत पुरवठ्यासाठी महानगरपालिकेने संपादन केलेले, संगठीत केलेले, रचना केलेले, सुस्थितीत राखलेले, वाढवलेले, व्यवस्थापन केलेले किंवा चालवलेले सर्व उपक्रम असून, अशा प्रत्येक उपक्रमासाठी निहित केलेली किंवा असलेली सर्व स्थावर व जंगम मालमत्ता व हक्क यांचा समावेश होतो, म्हणजेच बेस्ट उपक्रमाच्या नावाने असलेली सर्व संपत्ती मुंबई महानगरपालिकेचीच संपत्ती आहे.

४) बेस्ट उपक्रमाचा अर्थसंकल्प हा मुंबई महानगरपालिकेचा क अर्थसंकल्प असून, सदर अर्थसंकल्पात आधिक्य निर्माण झाल्यास, तो निधी महापालिकेच्या निधीमध्ये समाविष्ट करण्याची तरतूद कलम ४६० (लल) नुसार असून तूट निर्माण झाल्यास, महापालिकेच्या इतर अर्थसंकल्पातून सदर तूट भरून काढून रूपये १ लाख शिल्लक ठेवण्याची तरतूद कलम १३४ नुसार आहे.





टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

 READ / SHARE  / FORWARD 
JANATA  NEWS  xPRESS

निरंतर सेवेच्या आर्थिक मदतीकरिता 
for Donation
G pay 8108603260 

संपादक: सुबोध शाक्यरत्न  
M : 8108658970

Email- pr.janata@gmail.com