दिनांक ५ जून रोजी जागतिक पर्यावरण दिन जगभरात मोठ्या उत्साहात साजरा होणार आहे. पर्यावरण दिन म्हणजे केवळ एकमेकांना शुभेच्छा देणे नव्हे तर त्या दिवशी प्रत्येकाने पर्यावरणाकरिता पुरक असे कार्य करणे होय. तसेच भविष्यातही असे कार्य करण्यासाठी कटिबद्ध राहणे. या उद्देशाने मागील अनेक वर्षांपासून इको फ्रेन्डली लाईफ संस्था पर्यावरण जनजागृतीसह वृक्षलागवड व संगोपनाचे कार्य करत आहे. या वर्षी देखील संस्थेच्या माध्यमातून येणाऱ्या पर्यावरण दिनापासून भारतभर सुमारे ७०० कोटी झाडे लावण्याचा महासंकल्प करण्यात आला आहे.
या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री मा.एकनाथजी शिंदे यांच्याशी सविस्तर चर्चा करण्यात आली. सदर चर्चेमध्ये संस्थेने ठरवलेल्या "एकच विचार एकच लक्ष, भारतभर ७००कोटी वृक्ष" या उपक्रमाचे गांभिर्य माननिय मुख्यमंत्री यांना लक्षात आणून दिले. व मुख्यमंत्री महोदयांनी या उपक्रमास संपूर्ण सहभागासह सहकार्याचा प्रतिसाद दिला. ठाणे, साताऱ्यासह महाराष्ट्रातील उर्वरीत सर्व जिल्ह्यांमध्ये या उपक्रमाला सहाय्य करण्याचे सुतोवाच त्यांनी केले. ठाणे जिल्ह्यामध्ये १० लाख फळझाडे व साताऱा जिल्ह्यामध्ये ७ लाख फळझाडे इको फ्रेन्डली लाईफ या संस्थेच्या माध्यमातून लागवडीखाली आणण्यासाठी संबधित विभागांना या कार्याकरिता लागेल ती मदत करण्यात येईल असे सूचित केले. शिवाय मा.मुख्यमंत्र्यांनी इतर फळझाडांसोबतच बांबूसारख्या बहुपयोगी आणि व्यावसायिकदृष्ट्या उपयुक्त झाडांच्या लागवडीचा विचार संस्थेने करावा असे आपले मत मांडले.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिलेल्या या प्रतिसादाबद्दल संस्थेतर्फे आभार मानन्यात येत आहेत. तसेच यामध्ये सर्व सरकारी प्रशासकीय आस्थापनांचा सहभाग मिळावा यासाठी ठाणे जिल्हा नियोजन अधिकारी वैभव कुलकर्णी यांची भेट घेण्यात आली. त्यांच्याबरोबर याबाबत सविस्तर चर्चा करण्यात आली. त्यांनीही या उपक्रमाकरिता योग्य ते सहकार्य करण्याचे आश्वासन दिले आहे. ठाणे जिल्हा वनरक्षक विभागाचे संतोष रास्ते (भारतीय वन सेवा) यांनीही या उपक्रमाला रोपे देण्याची तयारी दर्शवली. ग्रामिण वर्षाला होणारी सहा लाख झाडांची वृक्षतोड टाळण्यासाठी भविष्यात मोठ मोठ्या कंपन्यांचा सीएसआर फन्ड या उपक्रमाकरिता गावे दत्तक घेऊन ग्रामिण शेतकऱ्यांना कसा मिळेल याकरिता प्रयत्न करण्याबाबत महत्त्वाचे मार्गदर्शन केले.
भारतातील केंद्र सरकारसह सर्व राज्य सरकारे, स्वायंत्त संस्था, संघटना, शैक्षणिक संस्था, सहकारी संस्था, सरकारी व निमसरकारी संस्था, गृहनिर्माण संस्था व सर्वसामान्य जनता विद्यार्थी तरुण तरुणीं याना कृती कार्यात सहभागी होण्याकरिता संस्थेच्या माध्यमातून आवाहन करण्यात येत आहे. स्वतःला व पुढच्या पिढीला तापमानाच्या व प्रदूषणाच्या महा संकटातून वाचवणे, जीवनमरणाचा प्रश्न समजून घेणे याकरिता प्रत्येकाने यात सहभागी होणे गरजेचे आहे. अन्यथा येणाऱ्या काळात मनुष्यप्राण्यासह संपूर्ण सृष्टी नष्ट झाल्याशिवाय राहणार नाही. याकरिता संस्थेच्या माध्यमातून येणाऱ्या पर्यावरण दिनी म्हणजेच दिनांक ५ जून २०२४ रोजी ठाण्यातील मुरबाड तालुक्यातील म्हसा या गावी या उपक्रमाअंतर्गत वृक्षारोपण कार्यक्रमाची नांदी करण्यात येणार आहे. या महाउपक्रमात गांभिर्याने मोठ्या संख्येने विद्यार्थी आणि पर्यावरण प्रेमी जनता सहभागी होणार आहे.
0 टिप्पण्या